रत्नागिरीत करोनाचे २०, तर सिंधुदुर्गात ४६ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१६ डिसेंबर) २० नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर तेवढेच रुग्ण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज ४६ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर ३७ रुग्ण करोनामुक्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात दोघांचा मृत्यू आज नोंदविला गेला.

रत्नागिरी जिल्ह्यात आज आढळलेल्या २० रुग्णांसह जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आठ हजार ९९३ झाली आहे. आज तपासलेल्या अन्य २०४ जणांचे करोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आजच्या बाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआर – रत्नागिरी ६, गुहागर ३, चिपळूण २, संगमेश्वर १ (एकूण १२). अँटिजेन टेस्ट – रत्नागिरी ३, दापोली ३, गुहगार १, चिपळूण १ एकूण ८. (दोन्ही मिळून एकूण २०). जिल्ह्यात आज २० रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या आठ हजार ५४९ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९५.०६ टक्के आहे. सध्या ७८ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. त्यापैकी २७ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.जिल्ह्यात गेल्या २४ तासांत दोन पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला. दोघेही दापोलीचे असून त्यापैकी एकाचे वय ४४, तर दुसऱ्याचे ७६ वर्षे आहे. या दोघा मृतांमुळे जिल्ह्यात करोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या आता ३२४ आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ३.६० टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नवे ४६ करोनाबाधित आढळले असून, एकूण रुग्णसंख्या पाच हजार ६८० झाली आहे. सध्या ३६२ जण उपचारांखाली आहेत. आज ३७ जण करोनामुक्त झाले असून, जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण करोनामुक्तांची संख्या ५१६१ आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १५१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

सिंधुदुर्गात लसीकरणाचे नियोजन पूर्ण

दरम्यान, करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने नियोजन पूर्ण केले आहे. त्याअनुषंगाने लस देण्याबाबतचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. याविषयी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आज सविस्तर आढावा घेऊन सूचना दिल्या. जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि कर्मचारी यांना प्रथम लस देण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई नर्सिंग ॲक्ट अंतर्गत खाजगी नोंदणीकृत डॉक्टर्स आणि त्यांचे कर्मचारी यांना, कोविडसंदर्भात काम केलेल्या प्रशासनिक अधिकारी आणि कर्मचारी यांना, 50 वर्षांवरील व असांसर्गिक आजारी असलेल्या व्यक्ती याप्रमाणे प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे.

जिल्ह्यात एकूण ५८ शआसकीय आरोग्य संस्था आणि त्यात कार्यरत पाच हजार ३३ अधिकारी, कर्मचारी नोंद केलेले आहेत. मुंबई नर्सिंग ॲक्ट अंतर्गत खाजगी नोंदणीकृत ८४ दवाखान्यातील डॉक्टर्स आणि त्यांचे कर्मचारी मिळून एक हजार ७२ व्यक्ती नोंदलेल्या आहेत. तसेच खाजगी वैद्यकीय सेवा देत असलेल्या ५६९ दवाखान्यातील डॉक्टर्स आणि त्यांचे कर्मचारी काम करीत असून सर्वांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. यानंतर कोविडसंदर्भात काम केलेले प्रशासनिक अधिकारी आणि कर्मचारी, त्यानंतर ५० वर्षांवरील अधिक इतर असांसर्गिक आजारी असलेल्या व्यक्तींना टप्प्याटप्प्याने लस टोचण्यात येणार आहे. या प्राधान्यक्रमानंतर सर्वसामान्य नागरिकांना टप्प्याटप्प्याने लस देण्यात येणार आहे.

लसीकरण कार्यक्रमासाठी शासनाने संकेतस्थळ तयार केले असून त्यात नोंद असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. लस साठवणुकीसाठी आवश्यक शीतसाखळी पुरेशी व्यवस्था केली आहे. तसेच लस टोचणीसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply