सावंतवाडी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेल्या त्या पुण्यभूमीचे प्रेरणाभूमीत रूपांतर करण्याचा निर्धार आज येथे घेण्यात आला. याबाबत अनुयायांनी याठिकाणी बैठक घेतली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३२ मध्ये कुडाळ तालुक्यातील पडवे गावातील मागासवर्गीय समाजातील व्यक्तीला खून खटल्यातून बाहेर काढण्यासाठी आरोपीचे वकीलपत्र घेतले होते. त्यानिमित्ताने त्यांनी तत्कालीन सावंतवाडी संस्थानला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी समाज बांधवांचा मेळावा घेतला होता. हा मेळावा जेथे झाला, तेथे नगरपालिकेने डॉ. आंबेडकर उद्यान उभारले आहे. या स्मृतिस्थळाचे प्रेरणाभूमीत रूपांतर करण्यासाठी जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यकर्ते मोहन जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सावंतवाडी भेटीचा वृत्तांत कथन केला. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी पावले उचलण्याकरिता बैठक आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन भिकाजी वर्देकर, डी. के. पडेलकर, विश्वनाथ कदम, लक्ष्मण निगुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डी. के पडेलकर, कविवर्य जनी कुमार कांबळे, साहित्यिक विठ्ठल कदम, सत्यवान चेंदवणकर, अंकुश कदम, ए. पी. कदम, रमेश कदम, विश्वनाथ कदम, महेश परुळेकर, सुदीप कांबळे, भिकाजी वर्देकर आदींनी मार्गदर्शन केले.
नगरपालिकेने उभारलेल्या स्मृती उद्यानाबाबत पालिकेचे अभिनंदन करून या स्मृती उद्यानाची पार्श्वभूमी भावी पिढीला समजावी, यासाठी कायमस्वरूपी स्मृतिस्थळ उभारण्याचा संकल्प आजच्या बैठकीत सोडण्यात आला. जिल्ह्यातील विविध संघटनांची बैठक घेऊनच कार्यक्रम निश्चित करावा, असे ठरविण्यात आले. त्यादृष्टीने सर्व तालुक्यांची एक संयोजन समिती निवडण्यात आली. समितीच्या तालुका प्रतिनिधींनी आपल्या तालुक्यातील विविध संघटनांशी संपर्क करावा, असा निर्णयही घेण्यात आला.
बैठकीला जिल्ह्यातील सुमारे ६० प्रमुख संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
