करोना निगेटिव्ह अहवाल आणणाऱ्यांनाच रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाच्या होळीच्या सणासाठी मुंबई, पुणे किंवा इतर भागातील प्रतिबंधित क्षेत्रातून येणाऱ्या चाकरमान्यांना बहात्तर तासांपूर्वी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह अहवाल सोबत असणे आवश्यक आहे, असे आदेश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जारी केले आहेत.

चाकरमान्यांनी गावी येऊ नये, म्हणून आवाहन करावे, पूजा, नवस करू आणि प्रसादवाटपही करू नये, पालखी घरोघरी नेऊ नये, नमन-खेळेही करू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

आदेशात म्हटले आहे की, प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील चाकरमान्यांनी थर्मल स्क्रीनिंग आणि ऑक्सिजनची तपासणी करणे बंधनकारक आहे. त्याकरिता नागरी आणि ग्रामीण कृती दलांनी शाळा किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी स्क्रीनिंग सेंटर उभारावीत. या स्क्रीनिंग सेंटरबाबत फ्लेक्सद्वारे जनजागृती करावी. स्क्रीनिंग सेंटरवर नागरिकांमध्ये सर्दी-खोकल्यासारखी लक्षणे आढळल्यास त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठवावे. तसेच सर्दी, खोकला आणि इतर करोनासदृश लक्षणे असलेल्या कोणत्याही नागरिकाला शिमगोत्सवात सहभागी होता येणार नाही. असे नागरिक सहभागी होणार नाहीत, याची दक्षता नागरी आणि ग्रामीण कृती दलांनी घ्यावी, असे बजावण्यात आले आहे.

पन्नासपेक्षा अधिक लोकांची गर्दी होणार नाही, याचीही दक्षता स्थानिक कृती दलांनी घ्यावी. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास तसेच करोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून आल्यास ते पूर्ण क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणजेच कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

चाकरमान्यांना गावी येण्याचे आवाहन करण्याचे आवाहन

मुंबईतील चाकरमान्यांनी होळीसाठी शक्यतो गावी येऊ नये, असे आवाहन त्यांना करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. तरीही त्यांना गावाकडच्या होळीच्या सणाचा आनंद घेता यावा, यासाठी होळीच्या कार्यक्रमाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, फेसबुक आणि वेबसाइट इत्यादी माध्यमांद्वारे उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे गावी न येणाऱ्या चाकरमान्यांना होळीचा कार्यक्रम पाहणे शक्य होईल.

शिमगोत्सवासाठी नियमावली

करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे . तसेच शिमगोत्सवाकरीता मुंबई-पुण्यावरुन नागरिक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सव, होळी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केल्या आहेत.

सर्व मंदिर विश्वस्त व पालखीधारकांनी जवळच्या आरोग्य यंत्रणेकडून आरटीपीसीआर, रॅपिड अँटिजेन टेस्ट करून घ्यावी. सर्व मंदिरांचे विश्वस्त, व्यवस्थापक, पदाधिकारी यांनी मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच स्थानिक ग्रामदेवतेच्या पालखीला रुपे लावणे, सजविणेबंधनकारक राहील. केवळ २५ ग्रामस्थ आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी परंपरेनुसार भेटीसाठी जाईल. पालखी शक्यतो वाहनातून न्यावी. ते शक्य नसल्यास पालखीधारकांनी स्वतः वाहून नेण्यास परवानगी राहील. कोणत्याही परिस्थितीत ५० लोकांपेक्षा जास्त लोक जमा होणार नाहीत, याची दक्षता मंदिर विश्वस्त, व्यवस्थापक, ग्रामस्थ, मानकरी, नागरी आणि ग्रामकृती दल यांनी घ्यावी. याकरिता पालखी दर्शनाच्या वेळा निर्धारित करून देण्यात याव्यात.

पूजा, नवस, प्रसाद… काहीही नाही

नवस, पेढे, हार, नारळ इत्यादी स्वरूपात होळी आणि पालखीची पूजा स्वीकारू नये. तसेच प्रसाद वाटपही करू नये. सहाणेवर पालखी आणि होळीचे दर्शनासाठी प्रत्येक वाडीतील, भागातील लोकांना स्वतंत्र दिवस नेमून द्यावा किंवा या कालावधीत ३-३ तास नेमून द्यावेत, जेणेकरून एकाच वेळी गर्दी होणार नाही. तथापि अशावेळी उपस्थितांनी योग्य ते सामाजिक अंतर ठेवणे आणि मास्क परिधान करणे बंधनकारक राहील. याचे उल्लंघन केलेस स्थानिक प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाईल. उपस्थित सर्वाचे थर्मल स्क्रीनिंग, सर्वांनी हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. सार्वजनिक सुविधांच्या आणि मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व ठिकाणी जसे की, दरवाजाचे हँडल आदींचे वारंवार निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. श्वसनासंबंधित शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल. त्यामध्ये शिंकताना किंवा खोकताना टिश्यू पेपर किंवा हातरुमाल घ्यावा. किंवा हाताच्या कोपराने नाक आणि तोंड पूर्णपणे झाकले जाईल, याची दक्षता घेणे तसेच वापरलेल्या टिश्यू पेपरची योग्य त्या पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. परिसरात धुंकण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल.

पालखी घरोघरी येणार नाही, नमन-खेळे नाहीत

यावेळी पालखी घरोघरी नेता येणार नाही. पालखी गर्दीमध्ये नाचविताही येणार नाही. होळी हा पारंपरिक सण असल्याने करोनाच्या पार्श्वभूमीवर छोट्या होळ्या आणून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत परंपरेनुसार होम करावा. गावात खेळे, नमन इत्यादी लोककलेचे कार्यक्रम करू नयेत. प्रथेपुरते खेळ्यांचे कार्यक्रम २५ ते ५० व्यक्तींच्या उपस्थितीत करावेत. धूलिवंदन आणि रंगपंचमीच्या दिवशी रंग उधळण्याचे टाळावे. छोट्या छोट्या ओळखीच्या समूहामध्ये शक्यतो रंग खेळावेत. मोठ्या आणि अनोळखी समूहामध्ये रंग खेळू नयेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply