भाजपच्या वर्धापनदिनी बूथ स्तरावर जागृती सभांचे आयोजन

रत्नागिरी : येत्या ६ एप्रिल रोजी भाजपा वर्धापनदिनानिमित्ताने बूथ स्तरावर जागृती सभा आयोजित करण्याचा निर्णय दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपा कार्यकारिणीने घेतला आहे. त्यानुसार विभागातील ८५० बूथवर एकाच दिवशी सभा होणार आहेत.

वेबेक्स अॅपच्या माध्यमातून ही ऑनलाइन सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन होते, तर प्रदेश भाजपा चिटणीस नीलेश राणे यांनी मार्गदर्शन केले. गेल्या दोन महिन्यांतील पक्षाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. बूथ संपर्क अभियान, समर्पणनिधी संकलन कार्यक्रम राबवण्यासाठी निधी संकलन समिती स्थापन करण्यात आली. दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातील ८५० बूथ नजरेसमोर ठेवून जागृती सभांचे आयोजन वर्धापनदिनानिमित्ताने करण्याचे ठरवण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रमही प्रत्येक बूथपर्यंत करण्याचा संकल्प करण्यात आला.

करोनाप्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाबाबत जागृती करण्यासाठी शहरी भागात कार्यकर्त्यांनी सक्रिय होण्याचे निर्देश देण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विविध निर्णयांबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. लशींची उपलबद्धता, अर्थसंकल्पातील विविधतरतुदी, आत्मनिर्भर भारत संकल्पनेला चालना देणाऱ्या योजना, शेतकरी कायद्यात झालेले उपयुक्त बदल, सर्वदूर बाजाराची झालेली उपलब्धता, अडते दलालांचे कमी होणारे महत्त्व आणि अशा अनेक उपयुक्त निर्णयांबद्दल मोदी आणि केंद्र शासनाच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.

राज्यातील महाआघाडी सरकारचा अकार्यक्षमतेबद्दल निषेध ठरावही सभेने मंजूर केला. राज्यातील अत्याचार, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांना अजून न मिळालेली शासकीय मदत, करोनाप्रतिबंधक लॉकडाउन कालावधीची आलेली अतिरिक्त वीजबिले, वीजबिल न भरणाऱ्याची जोडणी तोडण्याचा शासनाने घेतलेला निर्णय याबद्दल निषेध ठराव करण्यात आला. ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले भाजपा सरपंच आणि २९६ सदस्यांचे अभिनंदन करणारा ठराव मंजूर झाला.

कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी संघटित होऊन पक्षाच्या विस्ताराचे काम करावे. वरिष्ठांशी संपर्क ठेवत गावागावात विकासनिधी आणण्याची जबाबदारी आपण स्वीकारली असून जिल्ह्यातील विकासकामांबाबत सूची संकलित करण्याचे काम सुरू करावे, असे निर्देश नीलेश राणे यांनी यावेळी दिले. ग्रामपंचायत निवडणुकीत आपण कुठे कमी पडलो, याबाबत आत्मपरीक्षण करू या. त्रुटी दूर करू या. कोणावरही अन्याय्य होत असेल तर संघटना म्हणून पुढे होऊन अन्याय होऊ नये, यासाठी सजग राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील प्रत्येक बूथपर्यंत संपर्क केला जाईल. व्यापक दौरा मी करणार आहे. सर्व निष्ठावान कार्यकर्त्यांनी नव्या उमेदीने काम करू या. ग्रामपंचायतीतील यश संयत असले, तरी स्वबळावर लढवलेली ही निवडणूक संघटन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे, असे श्री. पटवर्धन म्हणाले. बूथ शक्तिकेंद्रांचे महत्त्व वाढत आहे. ही केंद्रे मजबूत करण्यासाठी सर्व प्रयत्न करून वरिष्ठ नेत्यांना अपेक्षित काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सभेला प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबासाहेब परुळेकर, तिन्ही सरचिटणीस, महिला व युवा मोर्चा अध्यक्ष, सर्व मंडल अध्यक्ष तसेच विविध मंडलातील जिल्हा प्रतिनिधी सहभागी झाले होते. सरचिटणीस राजेश सावंत, सचिन वहाळकर, यशवंत वाकडे यांनी विविध विषय सभेत मांडले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply