कालचा गोंधळ बरा होता

कोकणात सध्या शिमगोत्सव सुरू आहे. या उत्सवाला कोकणात आगळेवेगळे महत्त्व आहे. गणेशोत्सवापाठोपाठ हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. चाकरमानी उत्सवासाठी मुंबई-पुण्यातून किंवा बाहेरगावाहून आपापल्या गावी दाखल होतात. एकमेकांना भेटणे हाच कोणत्याही उत्सवाचा मुख्य उद्देश असतो. मात्र गेल्या वर्षी जगावर आलेल्या करोनाच्या संकटानंतर एकमेकांना कोणी भेटूच नये, हा सर्वांत मोठा नियम होऊन गेला आहे. गेल्या वर्षी उत्सव पार पडल्यानंतर करोनाप्रतिबंधक संचारबंदी आणि इतर नियमांची अंमलबजावणी झाली होती. त्यातून पूर्णपणे सावरले जाण्यापूर्वीच आणि आजाराचे प्रमाण कमी होत आहे, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा आजाराने वेगळ्या स्वरूपात डोके वर काढले. त्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध घालण्याची वेळ आली. गेल्या वर्षी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे किंवा सामाजिक अंतर राखणे हा करोनाविरुद्धच्या लढाईतील उत्तम उपाय असल्याचा शोध लागला नव्हता. काही काळाने तो अस्तित्वात आला. त्याचे अनेक लाभही झाले.

करोनाविरुद्धची ही लढाई लढताना उत्सव साजरे करण्यावर साहजिकच अनेक निर्बंध आले. गणेशोत्सव कोणत्याही उत्साहाविना पार पडला. दिवाळी यथातथाच गेली. आता भारतीय कालगणनेनुसार अखेरच्या महिन्यातील अखेरचा सण साजरा केला जात आहे. त्यावरही निर्बंध आले आहेत. गेल्या वर्षीचा चांगला अनुभव प्रशासनाच्या गाठीशी असतानासुद्धा या वर्षी मात्र कालचा गोंधळ बरा होता, असे म्हणण्याएवढा गोंधळ प्रशासनाने घातला आहे. प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामदैवताची पालखी नाचवणे, ती घरोघरी नेणे अशा काही प्रथा आहेत. इतर वेळी मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्यावे लागते. पण या उत्सवाच्या निमित्ताने देव आपल्या घरी आपल्या भेटीला येतो, अशी भावना असते. म्हणूनच या उत्सवाशी कोकणवासीयांचे जवळचे नाते आहे. मात्र या अनेक प्रथांना प्रशासनाने करोनाचा प्रसार होण्याच्या भीतीने बंदी घातली. ती जारी करताना कोणतीही सुसूत्रता दिसली नाही. अक्षरशः दररोज नवे नवे नियम जारी केले जात आहेत.

सुरुवातीला पालखी घरोघरी नेता येणार नाही, असा नियम जारी करण्यात आला. दोनच दिवसांनी २५ जणांच्या उपस्थितीत पालखी घरोघरी न्यायला परवानगी देणारा आदेश जारी झाला. पुन्हा एकदा पालखी मंदिरातच ठेवण्याचा आदेश निघाला. त्यानंतर करोनाप्रतिबंधक आवश्यक ते नियम पाळून पालखी घरोघरी न्यायला परवानगी देण्यात आली. पण सर्वांत सुरुवातीला पालखी घरोघरी न्यायला बंदी करणारा आदेश जारी राहणार असल्याचेही सांगण्यात आले. दोन परस्परविरोधी आदेश कसे पाळायचे, याचा विचार करण्याच्या संभ्रमात उत्सव अर्धाअधिक पार पडला. ठरावीक दिवशी पालखी मंदिराबाहेर काढली जाते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ती घरोघरी नेली जाते. सतत वेगवेगळे आदेश येत असल्यामुळे नेमके काय करायचे, याचा संभ्रम ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला. काहीजणांनी आदेशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून पालखी घरोघरी नेली.

ज्यांनी आदेशाचे पालन करायचे ठरविले होते, त्यांना आता पालखी न्यायची की नाही, असा संभ्रम पडला. ज्यांना कोकणातील या प्रथा आणि परंपरा माहीत आहेत, ते पुढारी, नेते गप्प बसून राहिले. गेल्या वर्षी अगदी दिवसआड प्रकाशात येणाऱ्या नेत्यांनी सध्या पडद्याआड राहणेच पसंत केले आहे. ज्यांना परंपरांची माहिती नव्हती, ते अधिकारी वरून आलेल्या आदेशांचे निर्गमन करण्यातच व्यस्त राहिले. गृह खात्याचे आदेश कोकणच्या विभागीय आयुक्तांना समजले नाहीत. कोकण आयुक्तांनी आपल्या समजुतीनुसार दिलेले आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना समजले, तसे ‘निर्गमित’ केले. हा सारा गोंधळ सुसूत्रतेच्या अभावी झाला आहे. त्यामुळे जनतेला मनमानी वागण्याची संधीच मिळत असते आणि त्याचा दोष जनतेला देता येणार नाही.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २ एप्रिल २०२१)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा २ एप्रिलचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply