स्वमग्नता दिनानिमित्ताने पोस्टरद्वारे जनजागृती

रत्नागिरी : येथील आस्था सोशल फाउंडेशनमध्ये स्वमग्नता लक्षणांच्या पोस्टरचे अनावरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांच्या हस्ते आजच्या जागतिक स्वमग्नता दिनाच्या निमित्ताने (२ एप्रिल) झाले.

आस्था सोशल फाउंडेशन या दिव्यांगांसाठी समर्पित संस्थेत स्वमग्नता अर्थात ऑटिझमबाबत जाणीवजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यामध्ये ऑटिझम काय आहे, याची माहिती देण्यात आली. ऑटिझमची लक्षणे बघून शक्य तितक्या लवकर ऑटिझमचे निदान होणे आणि पालकांकडून स्वीकार होणे आवश्यक असल्याने या प्रकारची पोस्टर आस्थातर्फे प्रदर्शित करण्यात आली. मान्यवरांना ऑटिझम जनजागृतीबाबत बॅज लावण्यात आले. निळे कपडे परिधान करून ऑटिझमला पाठिंबा दर्शवावा, असे आवाहन करण्यात आले.

पोस्टरच्या अनावरणानंतर इंदुराणी जाखड म्हणाल्या की, “या मुलांमध्ये निसर्गाने एक तरी विशेष गुण दिलेला असतो. तो शोधून आपण त्याला वाव दिल्यास ते खूप पुढे जाऊ शकतील. यापुढे जिल्हा परिषदेत कोणत्याही प्रकारचे पुष्पगुच्छ न स्वीकारता विशेष गरजा असणाऱ्या मुलांनी बनवलेले कृत्रिम फुलांचे पुष्पगुच्छ स्वीकारले जातील, जेणेकरून या मुलांना मदत होईल, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नंदिनी घाणेकर, समाजकल्याण अधिकारी डॉ. यतीन पुजारी, समाजकल्याण दिव्यांग सहाय्यता कक्षाचे श्री. आंबिवले यांनी आस्थाचे कार्य समजून घेतले आणि कार्याचे कौतुक केले.

आस्थाचे कार्यकर्ते संकेत चाळके, कल्पेश साखरकर, श्रीमती संपदा कांबळे, श्रीमती शिल्पा गोठणकर, श्रीमती मयूरी जाधव, श्रीमती अनुष्का आग्रे, श्रीमती संघमित्रा कांबळे आणि आस्थाच्या सचिव श्रीमती सुरेखा पाथरे तसेच फिजिओथेरपिस्ट डॉ. सृष्टी भार्गव यांनी मान्यवरांना आस्थाच्या कार्याबद्दल माहिती दिली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply