सुरेश प्रभू यांच्या संकल्पनेतून साकारली सायकल बँक

मुंबई : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत सुरेश प्रभू यांच्या संकल्पनेतून सायकल बँक साकारली गेली आहे. मानव साधन विकास संस्थेच्या परिवर्तन केंद्राद्वारे नियोजित जनशिक्षण संस्था (सिंधुदुर्ग, गोवा) आणि पुणे विमानतळ प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार सायकली २५० शाळांकडे सुपूर्द करण्यात आल्या.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा ७० टक्के ग्रामीण क्षेत्राने व्यापलेला आहे. परिसरातील माध्यमिक शाळा किंवा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या माध्यमिक शाळांमध्ये आठवी-दहावीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात. शाळेतील २५ ते ३० टक्के विद्यार्थी एसटी बसने शाळेत पोहोचतात. ग्रामीण भागात ठरावीक बस असल्याने वेळेच्या आधी त्यांना शाळेत पोहोचावे लागते. तसेच शाळा सुटल्यानंतर घरी पोहोचायला किती तरी उशीर होतो. अशा मुलांना गोवा आणि पुणे विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या सायकलींचे वाटप करण्याचे ठरले. मानव साधन विकास संस्थानच्या अध्यक्षा सौ. उमा सुरेश प्रभू यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. आठवी ते दहावीच्या मुलींना सायकल द्यायची, असे ठरले. ज्या मुली तीन ते चार किलोमीटर अंतरावरून शाळेत येतात, त्यांना सायकल देण्याचे ठरविण्यात आले. या मुलींनी दहावी झाल्यानंतर सायकल परत शाळेत आणून द्यायची. परत ती सायकल दुसऱ्या गरजु मुलीला देता येईल, अशी सायकल बँकेची योजना आहे.

मुलीला सायकल दिली, तर ती शाळेत वेळेत जाऊ शकते आणि घरी येऊ शकते. त्यामुळे मुलीच्या आईला असणारी काळजी थोडीफार कमी होईल. आठवी ते दहावीच्या मुलींमध्ये शारीरिक परिवर्तन होत असते. सायकल चालवल्याने त्यांचा व्यायाम होतो. त्यामुळे शारीरिक स्वास्थ्य मिळते. व्यवस्थित वापरली, तर सायकल पंधरा ते वीस वर्षे चालते. मुली दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी शहरात जातात. मग सायकल अडगळीत पडते. तसे होऊ नये, म्हणून ती सायकल परत वापरात येऊ शकते, हे लक्षात घेऊन ती शाळेकडे परत द्यावी, अशी कल्पना आहे.

बँकेत ठेवलेली ठेव वापरात येते आणि व्याजाने वाढत राहते. तशीच सायकल बँक म्हणून दहावीनंतर सायकल बँकेत परत येते. सायकलींमध्ये वाढ कशी होणार, असा प्रश्न उद्भवेल. पण सुरेश प्रभू यांनी २५० शाळांमध्ये दहा सायकलींची किंमत शाळेच्या बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवली आहे. सामाजिक जाणिवेतून बँक आपण चालवली पाहिजे. आपल्याकडील वापरात नसलेली सायकल सुस्थितीत शाळेत देता येईल. परिवारातील एक वाढदिवस सायकल देऊन साजरा करता येईल. शिक्षक निवृत्त होताना भेट म्हणून त्यांनी शाळेला सायकल द्यावी. दहावीनंतर शाळेला निरोप देताना माजी विद्यार्थीही सायकल देऊ शकतात. आपण ठरवले तर प्रत्येक मुलाला सायकल उपलब्ध होऊ शकते. सर्व जणांनी सायकल बँकेचे खातेदार व्हावे. गावाचा एक दिवस सायकलचा, शाळेचा असा उपक्रम राबवून सर्वजण या उपक्रमात सहभागी होऊ शकतील. पर्यावरण संतुलनासाठीही अप्रत्यक्षपणे मदत होऊ शकेल.

सुरेश प्रभू यांनी २५० ई सायकल (बॅटरीवर चालणारी) गरजू महिलांना, मुंजाळ फाउंडेशनकडून आणि २००० सायकली शालेय विद्यार्थिनींना उपलब्ध करून दिल्या आहेत. डागडुजीचा खर्च येऊ नये, यासाठी दणकट सायकलींची निवड सौ. उमा सुरेश प्रभू यांनी केली आहे. श्री. प्रभू यांनी ठरवले असते तर कोणालाही सायकल देऊन मोकळे झाले असते, पण विश्वासाने दिलेले दान गरजूपर्यंतच पोहोचले पाहिजे, या कटाक्षानेच प्रत्यक्ष जनशिक्षण संस्थेमार्फत सर्वेक्षण करून मुलींची खात्री करूनच परिवर्तन केंद्रांमार्फत सायकली सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

उपक्रमात सहभागी होण्यासाठी…
सायकल बँकेच्या उपक्रमात सहभागी व्हायचे असल्यास प्रकल्प अधिकारी विलास हडकर (संपर्क क्रमांक ९४२११४६०६२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply