रत्नागिरी जिल्हा परिषदेत सर्वसामान्यांना प्रवेश बंद

रत्नागिरी : करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात बाहेरून येणाऱ्यांना प्रवेश करायला आजपासून बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक कामांसाठी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात जाऊ इच्छिणाऱ्यांना करोनाची चाचणी करून निगेटिव्ह अहवाल असेल, तरच प्रवेश मिळणार आहे.

जिल्ह्यात करोना साथीच्या नियंत्रणाचे काम जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग करत आहे. सध्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे करोनाची लागण इतरांना होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून जिल्हा परिषदेत आजपासून करोनाविषयक अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचणी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत केली जाणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी हे जाहीर केले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात पाहुण्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. अभ्यागतांना संपर्क साधावयाचा असल्यास विभागानुसार संपर्क क्रमांक आणि पत्रव्यवहारासाठी ई-मेल यादी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर लाववण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून जिल्हा परिषदेला पाठवायचे टपाल पंचायत समिती स्तरावर एकत्रित करून पंचायत समितीतील एकच कर्मचारी जिल्हा परिषदेत येऊन हे टपाल स्वागत कक्षात देईल. पंचायत समिती स्तरावरून आलेला हा कर्मचारीही टपाल देऊन बाहेरच्या बाहेरच जाईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

इतर कोणत्याही अभ्यागतांना जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. फारच महत्त्वाचे काम असेल तर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर उपलब्ध करून दिलेली अँटिजेन टेस्ट केल्यानंतरच संबंधितांना जिल्हा परिषदेत प्रवेश दिला जाईल. त्यापुढे जिल्हा परिषदेच्या सर्व सभा येत्या ३० एप्रिलपर्यंत ऑनलाइन पद्धतीनेच घेतल्या जाणार आहेत. तसेच जिल्हा परिषदेशी संबंधित पत्रव्यवहार शक्यतो ई-मेलद्वारे करावा, असे आवाहन अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी केले आहे.


जिल्हा परिषदेतील पत्रव्यवहारासाठी ईमेल –

१) ceozprtg@gmail.com

२) dyceogad08@gmail.com

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply