रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येत घट, मृतांच्या संख्येत वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत आज (१९ एप्रिल) करोनाबाधितांच्या संख्येत निम्म्याने घट झाली. मात्र मृतांच्या संख्येत वाढ झाली. आज १५ मृत्यू नोंदविले गेले. दरम्यान, जिल्ह्यात रेमडिसिविर इंजेक्शन आणि करोनाप्रतिबंधक लशींचाही पुरेसा साठा असल्याची ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली.

मंडणगड वगळता इतर आठ तालुक्यांमध्ये आज रुग्ण आढळले. त्यातील सर्वाधिक ६३ रुग्ण चिपळूण तालुक्यात होते.

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी २९, दापोली १९, खेड ९, गुहागर ४, चिपळूण ३३, संगमेश्वर ३९, राजापूर १५. (एकूण १४८). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी २४, दापोली २४, खेड १३, चिपळूण ३०, संगमेश्वर १५, लांजा ५. (एकूण १११) (दोन्ही मिळून २५९). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १५ हजार ८८९ झाली आहे.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या दोन हजार ३२ आहे. त्यातील सर्वाधिक १४५ रुग्ण रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात, तर त्याखालोखाल १३० रुग्ण महिला रुग्णालयात दाखल आहेत. ८८६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ३११ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनामुक्तांची एकूण संख्या १२ हजार २२१ झाली आहे. करोनामुक्तीचा दर आज किंचित वाढला असून तो ७६.९१ टक्के झाला आहे.

आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ६८१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत एक लाख १४ हजार ७३७ जणांचा करोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात आज पंधरा जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यात १७ ते १९ एप्रिल या कालावधीत मरण पावलेल्यांचा समावेश आहे. सर्व १५ जणांचा मृत्यू शासकीय रुग्णालयांत झाला. मृतांचा तपशील असा –
खेड, पुरुष (वय ८१, १७ एप्रिल), गुहागर, पुरुष (४०, १८ एप्रिल), रत्नागिरी, महिला (७०, १८ एप्रिल), राजापूर, पुरुष (६४, १८ एप्रिल), गुहागर, महिला (५०, १८ एप्रिल), चिपळूण, पुरुष (६४, १८ एप्रिल), रत्नागिरी, महिला (३०, १८ एप्रिल), खेड, पुरुष (५३, १८ एप्रिल), खेड, पुरुष (२५, १९ एप्रिल), खेड, पुरुष (५७, १८ एप्रिल), रत्नागिरी, पुरुष (१८ एप्रिल), खेड, पुरुष (७०, १८ एप्रिल), रत्नागिरी, महिला (४९, १८ एप्रिल), खेड, पुरुष (७७, १९ एप्रिल), गुहागर, पुरुष (७५, १९ एप्रिल). या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ४६४ असून मृत्युदर २.९२ टक्के आहे.

जिल्ह्यात करोनाप्रतिबंधक लशींचा पुरेसा साठा – उदय सामंत

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाप्रतिबंधक लशींचा पुरेसा साठा आहे. सुमारे दहा हजार लशी सध्या शिल्लक आहेत. जिल्ह्यात अठ्ठावीस टन ऑक्सिजन सध्या शिल्लक असून तो सुमारे तीन दिवस चालेल. त्यापुढे ऑक्सिजनची कमतरता जिल्ह्यात भासू नये, यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली.

रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत ही ऑनलाइन पत्रकार परिषद झाली. श्री सामंत यांनी जिल्ह्यातील करोनाविषयक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर घेतलेल्य या पत्रकार परिषदेत शासनाच्या आणि प्रशासनाच्या सज्जतेविषयीची माहिती दिली.

श्री. सामंत म्हणाले, करोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता प्रशासन अधिकाधिक सज्ज राहण्याचा प्रयत्न करत आहे. आवश्यक असलेली रेमडिसिविर इंजेक्शन्स जिल्ह्यात सध्या शंभर उपलब्ध आहेत. ती अधिक प्रमाणात मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी प्रयत्नशील आहेत. जिल्ह्यात सध्या दोन हजार ५५ खाटा करोनाच्या रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लँट येत्या चार दिवसांत सुरू होईल. याशिवाय दापोली, देवरूख, राजापूर आणि खेड या ठिकाणी लवकरच ऑक्सिजनचे प्लँट उभारले जातील. सुमारे एक महिन्यात ते कार्यान्वित होतील.

जिल्ह्यात करोनाविषयक आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजेन टेस्टची संख्या वाढली आहे, सध्या दररोज एक हजार २०० जणांची टेस्ट केली जाते. त्यामध्ये लवकरच आणखी चारशेची वाढ केली जाणार आहे. त्यामुळे टेस्टसाठी लागणारा विलंब टळेल. अधिकाधिक लोकांना टेस्ट घेता येऊ शकेल. टेस्टचा अहवाल मिळण्यासाठी कोणीही जिल्हा रुग्णालयात गर्दी करू नये, असे आवाहन करतानाच श्री. सामंत म्हणाले की, अहवाल प्रत्येकाला त्याच्या मोबाइलवरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यासाठी रुग्णालयात येण्याची कोणतीही गरज नाही. अहवाल पॉझिटिव्ह आला तर आरोग्य यंत्रणा त्या रुग्णासाठी आवश्यक ती उपाययोजना करायला सज्ज आहे. रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी नागरिकांनीच अधिकाधिक प्रयत्न करावेत. करोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही श्री. सामंत यांनी केले.

करोनाविषयक चाचण्यांसाठी होणारी गर्दी तसेच रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी करोनाच्या प्रसाराला कारणीभूत ठरणार नाही का, असा प्रश्न विचारता श्री. सामंत म्हणाले की, करोनाचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनीही सहकार्य केले पाहिजे. सर्व ठिकाणी पोलीस आणि प्रशासन यंत्रणा पुरेशी पडेल असे नाही. करोनाविषयक नियमांचे पालन करण्यासाठी नागरिकांनीही प्रयत्न केले पाहिजेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply