बलोपासक समर्थ रामदास स्वामी

आज श्रीराम नवमी. राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण रामाच्या जन्माच्या दिवशी आणि त्याचवेळी जन्माला आलेले बलोपासक रामदास स्वामी यांचाही जन्मोत्सव बलोपासना करून साजरा केला गेला पाहिजे. आजच्या काळात ते अत्यंत आवश्यक आहे.
………..

ती संध्याकाळची वेळ. चौकात बऱ्यापैकी गर्दी जमलेली. एक गुंड प्रवृत्तीचा तरुण असहाय तरुणीची छेड काढत होता. ती तरुणी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होती. मदतीसाठी ती ओरडत होती.

त्याच वेळी सैनिकी सेवेतून निवृत्त झालेले पाटील काका सहज बघायला तेथे गेले. सारी परिस्थिती त्यांच्या लक्षात आली. ते जमावाला म्हणाले, ‘‘अरे, तुम्ही नुसते बघत काय बसलात? षंढ आहात काय?’’ त्यानंतर त्यांनी त्या गुंडाला जाब विचारला. तो मस्तीत म्हणाला, ‘‘ए म्हाताऱ्या, तू का मध्ये पडतोस? ती माझी लव्हर आहे. तू मध्ये येऊ नकोस.’’ तो काकांवर हात उगारणार, इतक्यात त्वरेने काकांनी त्याचा हात पिरगाळून टाकून जबरदस्त ठोसे लगावले. त्याला खाली पाडले. त्याच्या नाकातोंडातून रक्त येऊ लागले.

‘‘बघितलेस? मी म्हातारा असलो, तरी तुझ्यासारख्या चार जणांना भारी आहे. व्यायामाने हे माझे कमावलेले शरीर आहे. त्याचा प्रसाद तुला मिळाला ना? या तरुणीचे तुझ्यावर प्रेम वगेले काही दिसत नाही. तिचे पाय धर. क्षमा माग आणि परत कधी कुणा मुलीकडे वाकड्या नजरेने पाहूसुद्धा नकोस. घे माझ्यासमोर शपथ’’, असे म्हणून त्याला आणखी दोन रट्टे लगावले.

तेवढ्यातच तेथे आलेल्या पोलिसांच्या ताब्यात त्याला दिले आणि त्या तरुणीची तक्रार नोंदवून घ्यायला सांगितले.
काकांकडे सारे कौतुकाने पाहतच राहिले. नंतर जमावाकडे वळून काका म्हणाले, ‘‘छी: तुमच्या मर्दानगीला. तरुणीला मदत न करता नुसती मजा बघत बसलात? शरम नाही वाटत? शरीराने लेचेपेचे आहात, म्हणून तुम्हाला पुढे यायला धीर नाही झाला. आता उद्यापासून माझ्या व्यायामशाळेत या शरीर कमवायला. मी तुम्हाला शिकवीन. अगदी फुकट. एक राष्ट्रकार्य म्हणून. समर्थ रामदास स्वामींचे कार्य मी चालवतो आहे.’’

तरुणीवरील प्रसंग सर्वांना भलताच प्रेरणा देऊन गेला. बलदंड, पुष्ट शरीरयष्टीच्या काकांकडे सारेजण पाहतच राहिले. बऱ्याच जणांना तर काका म्हणजे समर्थ रामदास स्वामींचा अवतारच वाटू लागले. खरोखरच त्या दिवसापासून अनेक तरुण काकांच्या व्यायामशाळेत दाखल झाले.

ज्यांचा आदर्श ठेवून काकांनी राष्ट्रकार्य सुरू केले, ते रामदास स्वामी रामनवमीच्या दिवशीच जन्मले. चैत्र शुद्ध नवमी शके १५३० म्हणजेच इसवी सन १६०८ मध्ये त्यांचा जन्म झाला. अगदी श्रीरामजन्माच्या वेळीच दुपारी रामाचा दास जन्माला आला. समाजात आमूलाग्र क्रांती करणारे नारायण सूर्याजीपंत ठोसर-कुलकर्णी यांचा जन्म मराठवाड्यातील जांब या गावी झाला. बलोपासनेचा मोठा मंत्र आयुष्यभर देऊन माघ कृष्ण नवमीला इसवी सन १६८२ मध्ये सज्जनगडावर त्यांनी देह ठेवला. त्यांच्या पुण्यतिथीला रामदास नवमी साजरी केली जाते. पण रामनवमीला रामाचे भावभक्तीने स्मरण करतानाच त्यांच्या या निस्सीम भक्ताचे कार्य असलेली बलोपासना करून शक्तीचीही उपासना करायला हवी. त्यातून त्यांची जयंतीही साजरी करायला हवी.

‘चिंता करितो विश्वाची’ या आईला दिलेल्या वचनपूर्तीसाठी अखेरपर्यंत समाजोद्धाराचाच विचार उराशी बाळगून त्यांनी सतत कृती केली. आपल्या एकूण ७४ वर्षांच्या जीवनकाळात त्यांनी पहिली १२ वर्षे जांब गावात, त्यानंतरची १२ वर्षे तपाचरणात आणि आणखी १२ वर्षे भारतभ्रमण करून ३६ वर्षे अध्ययनात व्यतीत केली. त्यानंतरची ३८ वर्षे प्रत्यक्ष कार्य केले. तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीत त्यांना पुढील कार्याला प्रेरणा मिळाली. दुष्काळ, यावनी रयतेवरील सततची आक्रमणे, हिंदू मंदिरांची तोडफोड, आयाबहिणींची विटंबना, आपापसातील भांडणे, पिकांची जाळपोळ, जनावरांची पळवणूक इत्यादी गोष्टींनी जनतेतील राम जणू निघून गेला होता. आत्मविश्वास हरवून बसलेल्याय समाजातील चेतनाच जणू निघून गेली होती. त्या सामजाला कार्यप्रवृत्त करण्यासाठी आणि त्यांच्यातील गेलेला आत्मविश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी समर्थांनी जनतेत एकीद्वारे आणि भक्तीद्वारे मानसिक सुधारणा घडविण्याचा प्रयत्न केले. जनतेला बलोपासनेचा मंत्र दिला. तो कृतीत आणण्यासाठी कृती केली. जनतेत बलसंवर्धनाच्या दृष्टीने रामदास स्वामींचे कार्य फारच क्रांतिकारक म्हणावे लागेल. ठिकठिकाणी त्यांनी मठ स्थापन केले. त्यांच्या या कार्यात त्यांचे अनेक शिष्य सहभागी झाले. राष्ट्रकार्यासाठी सुसंस्कारित, बलदंड, निरोग, प्रतिसेना उभारून छत्रपती शिवरायांच्या कार्याला संपूर्ण सहकार्य करण्याचे त्यांचे व्रत स्वामींनी सदैव पाळले.

त्यांचे शिष्य ठिकठिकाणी जाहीररीत्या समंत्रक सूर्यनमस्कार, दंड, बैठका इत्यादींद्वारे बलोपासना करत होते. त्याची प्रसिद्धीही यावनी सत्तेच्या काळात होत असल्याने साहजिकच स्वामींच्या शिष्यांची पुरती दहशत यावनी सत्ताधाऱ्यांनी घेतली होती. ईश्वरसेवेद्वारे मनोबलाची वृद्धी होत असतानाच बलदंड, निकोप शरीरप्रकृतीची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांच्या कार्यातून दिसून येते. म्हणूनच स्वामींनी जनतेला बलोपासनेचा आग्रह धरला. तोही स्वानुभवातून. ते जाहीररीत्या जनतेत आग्रह धरू शकले. आधी केले मग सांगितले,या उक्तीचे प्रत्यंतर त्यांच्या जीवनात दिसून येते. म्हणूनच त्यांच्या म्हणण्याला वजन प्राप्त झाले होते. सामुदायिकरीत्या त्यांची चाललेली बलोपासना इतरेजनांना प्रेरित करून यवनांमध्ये दहशत निर्माण करत होती.

स्वामींचे एक महत्त्वाचे तत्त्व होते, खटासी व्हावे खट, उद्धटासी उद्धट. जशास तसे वागल्यासच समोरील व्यक्तीवर आपल्या ताकदीचा प्रभाव पडतो. त्यासाठी समोरच्यापेक्षाही तुल्यबळाने आपण अधिक सशक्त, ताकदवानच असायला हवे. आम्ही कुणाच्या वाटेला जाणार नाही, हे खरे असले, तरी समोरच्याला आमच्यावरही वार करू देणार नाही, इतकी दहशत खूप झाली. इतक्या मोठ्या प्रमाणातला आत्मविश्वास आम्ही अंगी बाणवू शकलो, तरी खूप झाले.
बलोपासनेचा, म्हणजे स्वसंरक्षण आणि शारीरिक सुदृढता, निरोगी, निकोप शरीरयष्टी हे सारे खरे असले, तरी आपली शक्ती, ताकद कुणापुढे किती प्रमाणात आणि कशी वापरायची त्याचे भानदेखील असणे गरजेचे आहे. ती जाण असणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी विवेक म्हणजे काय, हे समजणेदेखील आवश्यक असते. चांगले काय आणि वाईट काय, हे जाणण्याची बुद्धी असायला हवी. त्याला नीर-क्षीर विवेकबुद्धी म्हणतात. हंस आणि बगळा हे दोन्ही रंगाने सफेदच असतात. पण पाणी आणि दूध एकत्र करून त्यांच्यापुढे ठेवले, तर हंसच फक्त त्यातील दूध पितो. हीच ती नीर-क्षीर विवेकबुद्धी. अर्थात ती येण्यासाठी संतसहवास, सुसंस्कार सातत्य, ईश्वरी कृपा असणे आवश्यक आहे. सशक्त शरीरात सशक्त मन वास करते, असे म्हटले जाते. त्याची शिकवण देण्यासाठीच स्वामींनी अकरा मारुतींची स्थापना केली.
एक्झर्शन आणि एक्झरसाइज या दोन शब्दांचा अर्थ शरीराला होणारे श्रम हाच आहे. पण त्यात मूलभूत फरक आहे. केवळ पोटभरीसाठी केले जाणारे कष्ट म्हणजे दमणे-भागणे होय. तो व्यायाम नव्हेत. कारण त्या शारीरिक हालचाली व्यक्ती नाइलाजाने करत असते. पण मनात हेतू किंवा उत्तम विचार धरून त्यायोगे शरीराला अत्यंत शास्त्रशुद्ध आणि भक्तिपूर्वक उत्तम मार्गदर्शनाने दिलेले कष्ट म्हणजे व्यायाम होय. शरीर कमावणे, घडविणे, योग्य प्रतिकारक्षम शरीर घडविणे म्हणजेच खऱ्या अर्थाने बलसंवर्धन होय.

स्वामींनी चारशे वर्षांपूर्वी बलोपासनेचा मंत्र दिला. तेव्हाची स्थिती पारतंत्र्याची होती. आज एकविसाव्या शतकात आपण स्वतंत्र असलो, तरी मानसिक आणि शारीरिक स्थिती मात्र तेव्हापेक्षा फारशी वेगळी नाही. समाज म्हणावा तितका विवेकी, बलवान, सशक्त नाही. अलीकडे समाजात चाललेली हिंसक, घृणास्पद कृत्ये पाहिली, की विवेकी बलोपासनेचा रामदास स्वामींचा मंत्र किती त्रिकालदर्शी होता, याची सत्यता पटते. दुर्दैवाने हल्लीची गतिशील जीवनपद्धती, जीवघेणी महत्त्वाकांक्षा, मनस्वी चढाओढ, स्पर्धा, निकृष्ट आहार, अपुरी निद्रा, व्यायामाचा अभाव, शरीराच्या योग्य हालचालींचा अभाव, शीघ्र जीवनपद्धतीनुसार व्याधी झाल्यानंतर किंवा त्याही आधी व्याधीतज्ज्ञांकडे होणाऱ्या वाऱ्या, शरीरावर नको इतका औषधांचा आणि उपचारांचा मारा या आणि अशा पद्धतीनुसार वागल्याने सुदृढ शरीराची मंदावणारी प्रगती इत्यादींमुळे सुदृढ आणि निकोप शरीरावर दुष्परिणाम होतो. साहजिकच आपली प्रतिकारशक्ती कमी होऊन व्याधींच्या वृद्धीला चालना मिळते.

अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाले तर करोनासारख्या संसर्गजन्य व्याधीपासून आपली सुटका करून घ्यायची असेल, तर बलोपासनेला पर्याय नाही. करोनाच्या आजारात इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास सांगितले जाते. त्यामुळे पुढच्या काळात बलोपासनाच किती उपकारक ठरेल, हे लक्षात यायला हरकत नाही. आपल्या शरीराला समर्थांची उपासना खचीतच योग्य आहे. त्यासारखा दुसरा चांगला उपाय नाही. त्याच अनुषंगाने सशक्त आणि सक्षम शरीरासाठी नित्य योगाभ्यास, समतोल आहार, व्यसनांपासून शरीर दूर ठेवणे असे उपाय उपयुक्त ठरतील. आपले शरीर बलशाली बनेल. सुसंस्कारित मन आणि सुदृढ प्रकृती खचीतच नवा समाज घडवायला उपयुक्त ठरेल.

रामनवमीसाठी विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य केले जातात. आरत्या, भजने होतात. मनावरील चांगल्या संस्कारांसाठी ते आवश्यक आहेच. पण रामाच्या जन्माच्या दिवशीच जन्मलेल्या रामदास स्वामींनी दिलेला बलोपासनेचा मंत्र, मनोपासनेचा विचार आणि कृती राष्ट्रप्रवर्तकच ठरेल.

  • रामकृष्ण विनायक अभ्यंकर,
    2-46, भक्तियोग सोसायटी, परांजपे नगर,
    वझिरा नाका, बोरिवली (प.), मुंबई 91
    (संपर्क – 9819844710)
    ……….

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply