करोना रुग्णांचे प्राण वाचविणारे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र

त्वरित मागणी नोंदविण्याचे आवाहन

सावंतवाडी : करोनाच्या उद्रेकाच्या काळात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्स करोनाबाधिताचा जीव वाचवू शकतात. सोसायट्या, सामाजिक संस्थांना ही मशीन्स खरेदी करता येऊ शकतील. एका सामाजिक संस्थेच्या सावंतवाडीतील सदस्याने ही मशीन्स मागविली असून रविवारपर्यंत (२५ एप्रिल) मागणी नोंदविल्यास येत्या ५ मेपर्यंत मशीन्स उपलब्ध होऊ शकतील, असे सूचित करण्यात आले आहे.

सध्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यामुळे करोनाच्या रुग्णांची होणारी अडचण सर्वत्र दिसत आहे. नाशिक, विरारसारख्या दुर्घटना ताज्या आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा आणि त्यावर सरकार करत असलेले उपाय, त्यातून वाढतच जाणाऱ्या अडचणी न संपणाऱ्या आहेत. त्याहून मोठी आहे ती या प्रसंगातील असहायता आणि घबराट. त्यातून होणारा दु:खाचा आणि चिडीचा उद्रेक.

मोठ्या हॉस्पिटलमध्ये असणारे ऑक्सिजन व्हेंटिलेटर प्लँट, त्यांच्या किमती, मेंटेनन्स आणि ते सेंट्रलाइज असल्याने त्यामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा शक्य असलेले कंटॅमिनेशन इत्यादी पाहता आणि ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक, रिफिलिंग इत्यादीच्या मर्यादा पाहता “ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर” मशीनचा पर्याय कालसुसंगत आहे. प्राणवायूच्या तुटवड्यामुळे करोनाच्या रुग्णांना नाहक जीव गमवावा लागत आहे. या परिस्थितीत हवेतील प्राणवायू शोषून रुग्णाला नाकावाटे पुरविण्याचे काम ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र करते. ऑक्सिजनच्या सिलिंडरशिवाय या यंत्रातून ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे ते पुन्हा भरण्याची आवश्यकता नसते. दहा लिटरपर्यंत ऑक्सिजन त्यातून रुग्णांना मिळू शकतो. हवेत सुमारे २१ टक्के ऑक्सिजन असतो. तो शोषून घेऊन रुग्णाला पुरविण्याचे काम हे यंत्र करते.

आता मोठ्या प्रमाणावर राजकीय पुढारी, आमदार, मंत्री, रोटरी, लायन्स क्लबसारख्या सामाजिक संस्था, जैन समाज इत्यादी या मशीन्स लोकांना उपलब्ध करून देत आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यावर आश्वासक पर्याय देत आहेत. मात्र दरम्यानच्या काळात मशीनच्या वाढत्या मागणीमुळे किमती प्रचंड वाढल्या आहेत. ४० हजार रुपयांच्या मशीनची किंमत आता ६५ हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

या पार्श्वभूमीवर आषाढी मुक्त उद्यमशीलता नावाच्या एका समाजसेवी संस्थेने मात्र सुमारे ४५ हजार रुपयांत हे मशीन उपलब्ध करून द्यायचे ठरविले आहे. त्यासाठी ही मशीन्स मोठ्या प्रमाणावर मागविण्यात येणार आहेत. मशीनची मूळ किंमत २८५ डॉलर म्हणजे २१ हजार ३७५ रुपये आहे. चिनी वेअरहाउसमधून मुंबईपर्यंतच्या हवाई वाहतुकीचा खर्च ११० डॉलर म्हणजे आठ हजार २५० रुपये होतो. त्यावर १८ टक्के म्हणजे ३८४७ रुपये आयात शुल्क आणि १२ टक्के म्हणजे २५६५ रुपये अॅडव्हान्स टॅक्स भरावा लागतो. त्यामुळे मुंबईत येईपर्यंत या मशीनची किंमत ३६ हजार रुपयांहून अधिक होते. त्यावर १८ टक्के दराने साडेसहा हजार रुपयांचा जीएसटी भरावा लागतो. त्यामुळे मुंबईत या मशीनची किंमत ४२ हजार ५०० रुपयांपर्यंत जाते. ठाणे, पुणे, नाशिक किंवा राज्यभरात अन्यत्र वाहतुकीचा जो प्रत्यक्ष खर्च होईल, तो वेगळा द्यावा लागेल. महाराष्ट्राबाहेर मशीन मागवल्यास १२ टक्के आयजीएसटी भरावा लागेल.

या हिशेबानुसार सुमारे ४५ हजार रुपयांमध्ये ही मशीन्स मिळू शकतील. कोकणातील सोसायट्या, माजी विद्यार्थी संघ, जवळपासची मित्रमंडळे यांनी मशीन्स खरेदी केली, तर अनेकांचे प्राण वाचू शकतील.

व्यक्तिगतरीत्या किंवा सामाजिक संस्थांना हे मशीन हवे असेल, तर आषाढी मुक्त उद्यमशीलता संस्थेचे सावंतवाडीतील सदस्य प्रदीप जोशी यांना 9422429103 या व्हॉट्स अॅप क्रमांकावर त्वरित म्हणजे २५ एप्रिलपर्यंत कळवावे, असे सूचित करण्यात आले आहे. येत्या ५ मेपर्यंत मशीन्स सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात आणण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply