अनिल परब यांच्याविरुद्ध कारवाई न केल्यास आंदोलन – नीलेश राणे

रत्नागिरी : दापोली तालुक्यावत मुरूड येथे अनधिकृतपणे रिसॉर्ट उभारणारे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्यावर कारवाई केली नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश चिटणीस नीलेश राणे यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिला.

भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्यात किनारी भागात व्यवसाय करायला पुढे येणाऱ्या अनेकांना परवानगी नाकारली जाते. परब मात्र पालकमंत्री असल्यामुळे त्यांना करोनाच्या या कालावधीतही रिसॉर्ट उभारायला परवानगी मिळाली. त्यांनी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून अनधिकृतरीत्या बांधकाम केले आहे. हे प्रकरण माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुढे आणले असून ते त्याचा पाठपुरावा करत आहेत. यामध्ये जिल्ह्यातील अनेक अधिकारीही सहभागी आहेत. परब मंत्रिपदावरून जाणार आहेत हे नक्की. अधिकार्यांरनी ते मान्य करून कारवाई करावी, अन्यथा त्यांच्यावरही कारवाई अटळ आहे, असे श्री. राणे म्हणाले.

जिल्हाधिकारी सध्या रजेवर आहेत. ते पुन्हा रुजू झाल्यानंतर पुढची कारवाई होईल, अशी अपेक्षा असल्याचे सांगून श्री. राणे म्हणाले, नगरपालिकांमध्ये अनियमित कारभार सुरू आहे. रत्नागिरी शहरात रस्त्यांवर चिखल झाला आहे. ग्रामीण भागात करोनाची परिस्थिती गंभीर आहे. तेथे करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, याकडे कुणीही गांभीर्याने पाहत नाही. याचा फायदा घेऊन अनधिकृत बांधकाम करण्याकडे पालकमंत्री लक्ष केंद्रित करत आहेत. जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीत ७० टक्के कपात झाली आहे. जिल्ह्यात रस्ते होत नाहीत. रस्ते दुरुस्त होत नाहीत. पण अनधिकृत रिसॉर्टकडे जाणाऱ्या रस्त्यावर पैसा खर्च केला आहे. तशी पाटी येथे लावण्यात आली आहे. गावागावांमधील अनेक रस्त्यांना निधी हवा आहे. तो मिळत नाही. अशा स्थितीत परब यांच्यावर कारवाईसाठी पाठपुरावा करत राहणार आहोत. माजी खासदार किरीट सोमय्या न्यायालयीन लढाई लढतील. आम्ही रस्त्यावर उतरून लढाई यशस्वी करू, असा विश्वास श्री. राणे यांनी व्यक्त केला.

अनिल परब यांचा खोटारडेपणा – डॉ. किरीट सोमैया

दरम्यान, डॉ. किरीट सोमैया यांनी अनिल परब यांचा खोटारडेपणा उघड करणारी कागदपत्रे पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, अनिल परब यांनी २ मे २०१७ रोजी १ कोटी रुपये देऊन विभास साठे यांच्याकडून ४२ गुंठे शेतजमीन विकत घेतली, ताबा घेतला. मूळ मालक साठे यांनी सांगितले की, या जागेवर ज्या बिनशेती परवानग्या करण्यात आल्या, त्यासंबंधी कोणतेही कागदपत्र, शपथपत्र, अर्ज, जबाब इत्यादींवर मी सह्या केलेल्या नाहीत. कोणालाही मुखत्यारपत्र दिलेले नाही. श्री. परब यांनी श्री. साठे यांच्याकडून जागा घेतली. त्यावर रिसॉर्टही बांधला. त्यासंबंधीच्या बिनशेती परवानग्या बनावटी सह्या करून सरकारी दस्तावेजाशी खेळ करून घेण्यात आल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे श्री. सोमय्या म्हणाले.

श्री. साठे यांनी हेही स्पष्ट केले आहे की या जमिनीवर मी कधीही कोणतेही बांधकाम केलेले नाही. श्री. साठे यांनी असेही म्हटले आहे की त्यावरील बांधकामासंबंधी मला कोणतीही कल्पना नाही. श्री. परब यांनी श्री. साठे यांच्याकडून घेतलेल्या जमिनीचे खरेदीखत १९ जून २०१९ रोजी रजिस्टर केले आणि २६ जून २०२१ रोजी मुरूड ग्रामपंचायतीला स्वत:च्या लेटरहेडवर स्वत:च्या सहीने पत्र दिले की या जागेवर विभास साठे यांच्या नावाने मोठे व्यवसायिक बांधकाम, रिसॉर्ट आहे. त्याची घरपट्टी साठे यांच्या नावाने आहे. ती आता आपल्या नावाने करावी. २९ जून २०१९ रोजी श्री. परब यांना ग्रामपंचायतनी घर/इमारत क्र. १०७४ नंबर दिला आणि ४६ हजार ८०६ रुपयांची घरपट्टी भरणा केली. त्याचे पैसे श्री. परब यांनी दिले. पावतीही श्री. परब यांच्या नावाने देण्यात आली. खरेदीखताची औपचारिकता पूर्ण करताना १९ जून २०१९ रोजी ही जमीन शेतजमीन आहे, असे स्पष्टपणे लिहिण्यात आले आहे. जमिनीच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र आहे असेही नमूद करण्यात आले आहे. श्री. परब यांनी बिनशेती परवानगी करताना विभास साठे यांच्या नावाने खोट्या सह्या करून या जमिनीच्या पश्चिमेला गाव रस्ता आहे असे म्हटले होते. वास्तविक २ मे २०१७ रोजी ही जमीन अनिल परब यांना ताब्यात दिल्यांनतर त्या जागेवर आणि गावात आपण पुन्हा कधीही गेलो नाही, असे श्री. साठे यांनी स्पष्ट केले आहे.

श्री. साठे यांच्या स्पष्टीकरणानंतर श्री. परब यांनी सरकारी दस्तावेजात खाडाखोड, फसवणूक केली, हे स्पष्ट होत आहे, असे डॉ. किरीट सोमैया यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे. अशा प्रकारची फोर्जरी करणाऱ्या व्यक्तीला मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही. श्री. परब यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी श्री. सोमैया व त्यांच्यासोबत असलेले नीलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, अॅड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply