आरोग्य सुविधांसाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण

सिंधुदुर्गनगरी : करोनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बिघडलेली आरोग्याची परिस्थिती सुधारावी आणि इतर आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी वसई सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी दिली.

याबाबत त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यात देश स्वातंत्र्यापासून आजपर्यंत देशात आणि महाराष्ट्रात अनेक सरकारे आली आणि गेली. प्रत्येक पक्षाला या दोन्ही जिल्हावासीयांनी भरभरून साथ दिली आहे. आजसुद्धा देत आहेत. तरीसुद्धा आजपर्यंतच्या एकाही सरकारने या जिल्ह्यांच्या आरोग समस्येवर लक्ष दिलेले नाही. आज इतर सर्व जिल्हे योग्य आरोग्य सुविधा मिळाल्याने करोना महामारी कमी करण्यात यशस्वी होत आहेत. उलट आरोग्य सेवा उपलब्धच नसल्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हे करोना संक्रमित झाले आहेत. या जिल्ह्यात मृत्युदरही वाढलेला आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, या परिस्थितीला दोन्ही जिल्ह्यांतील आजी आणि माजी लोकप्रतिनिधी सर्वात जास्त जबाबदार आहेत. करोनामुळे योग्य उपचार न मिळाल्याने कोणी बाप, भाऊ, काका, काकी, बहीण, वहिनी, मुलगा, मुलगी गमावली आहे. यातूनच लोकांच्या मनात कोकणातील लोकप्रतिनिधींविषयी चीड निर्माण झाली आहे. लोक हतबल झाले आहेत. म्हणूनच कोकणातील अनेक समाजसेवक, सामाजिक संस्था, प्रवासी संघटनांनी जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य विभाग, राज्य शासन, मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, खासदार, आमदार यांना दोन्ही जिल्ह्यात आरोग्य समस्या सोडविण्यासाठी निवेदने दिली आहेत. आजची परिस्थिती गंभीर असल्यामुळे आजपर्यंत दुर्लक्षित असलेल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने हे प्रयत्न चालू केले आहेत. वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे गेल्याच आठवड्यात आरोग्य विषयाशी संबंधित सर्वांनाच निवेदन देऊन आग्रही मागणी केली आहे. अशाच प्रकारे इतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीही मागणी केली आहे.

भविष्यात या दोन्ही जिल्हावासीयांना योग्य आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी मेडिकल कॉलेज, केईएम, जेजे हॉस्पिटलसारख्या सर्व सुविधांनी संपन्न हॉस्पिटल बांधून हा जीवनमरणाचा संघर्ष कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सरकार आणि प्रशासकीय अधिकारी यांना जाग आली नाही, तर नाइलाजाने कोकणवासीयांना गाव, तालुका, जिल्हा आणि मुंबईत एकाच वेळी मोर्चांचे आयोजन करावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. वेळ पडल्यास हा लढा मुंबई उच्च न्यायालय, राज्यपाल यांच्यापर्यंत न्यावा लागेल. आज सनदशीर मार्गाने हा ज्वलंत विषय सर्वांसमोर ठेवण्यासाठी आरोग्य हक्क कृती समितीतर्फे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेष उपोषण सुरू करण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य हक्क कृती समितीचे अध्यक्षबाळासाहेब सावंत, सचिव श्री. रेडकर आणि इतर सर्व कार्यकारिणी प्रतिनिधी उपोषणात सहभागी झाले आहेत. सरकारकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत वादळ पाऊस चालू असतानासुद्धा हे आंदोलन चालूच राहणार आहे, असे श्री. नाईक यांनी स्पष्ट केले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply