राजापूर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून अनाथ मुलांना मदत

राजापूर : करोनाच्या काळात पितृछत्र हरपलेल्या राजापूर तालुक्यातील काही मुलांना राजापूर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी मदतीचा हात दिला.


माय राजापूर सामाजिक संस्थेने अलीकडेच पितृछत्र हरपलेल्या मुलांना मदत केली होती. त्यापासून प्रेरणा घेऊन १९७९-८० साली दहावीला असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी माय राजापूर संस्थेचे प्रवर्तक आणि वर्गबंधू प्रदीप कोळेकर यांच्या पुढाकारातून मदत द्यायचे ठरवले. करोनाकाळात ज्या लहान मुलांचे वडील दगावले आहेत, अशा चार कुटुंबांमधील सात मुलांना पन्नास हजाराची मदत, अन्नधान्य, खेळणी, चॉकलेट बिस्किटे, दप्तर असे साहित्य दिले.

या विद्यार्थ्यांनी वडदहसोळमधील गितयेवाडी, शेंबवणे मधली वाडी, शेंढे वरचीवाडी तसेच वडदहसोळ खालीलवाडी येथील सात मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या आईशी संवाद साधून त्यांना धीर दिला. घरातील इतरांशी बोलून या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तसेच मुलांच्या शिक्षणाकरिता राजापूर हायस्कूलची ही तुकडी भविष्यातही यथाशक्ती मदत करेल, असा दिलासा दिला आणि कुटुंबाचे मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न केला. या कुटुंबातील सातपैकी पाच मुले चार वर्षे वयाच्या आतील आहेत, तर एकाच कुटुंबातील दोन मुले दहा आणि बारा वर्षे वयाची आहेत.

या असहाय कुटुंबांना शासकीय लाभ मिळवून देता येतील का, याची माहिती घेण्याचेदेखील तत्कालीन दहावीच्या या तुकडीचे उद्दिष्ट आहे. सर्व कुटुंबांशी यापुढेही फोनद्वारे सतत संपर्कात राहू, असे प्रदीप कोळेकर यांनी सांगितले.
माजी विद्यार्थी आणि नानिवडे हायस्कूलचे मुख्याधपाक शिरीष शेंबवणेकर, राजापूर तालुका रा. स्व. संघाचे संघटक आणि अर्बन बॅंकेचे माजी चेअरमन राजेंद्र कुशे, राजापूर हायस्कूलमधील सहाय्यक शिक्षक राजन लिगम, राजापूरचे प्रतिष्ठित व्यापारी गुरुनाथ भोगटे यांनी मदतकार्यात प्रत्यक्ष मदत केली. मदत निधीमध्ये ३५ विद्यार्थ्यांनी सहयोग दिला.


(संपर्कासाठी – प्रदीप कोळेकर – 82751 34404)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply