राणेंचे मंत्रिपद कोकणाला कितपत लाभदायक?

भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार आणि कोकणातील नेते नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. या घटनेमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना कोकणात राबवायला आता चालना मिळेल, अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे, तर श्री. राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्याविरोधात बोलणाऱ्या शिवसेनेच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांनी राणे यांची नेहमीप्रमाणेच खिल्ली उडविली आहे. कोणी त्यांच्या उंचीविषयी बोलले, तर कुणी कर्तृत्वाविषयी. त्यांच्यासारखा कोकणातील नेता पंतप्रधान झाला, तरी शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही, असेही वक्तव्य करण्यात आले. ते काहीही असले तरी श्री. राणे यांची धडाडी, रोखठोकपणा यापेक्षाही त्यांची अभ्यासू वृत्ती कोकणासाठी लाभदायकच ठरण्याची शक्यता अधिक आहे.

नारायण राणे हे मुंबईसह कोकणात कायम चर्चेत असलेले नाव आहे. राणे सत्तेत असोत अथवा नसोत, त्यांच्याकडे मंत्रिपद असो अथवा नसो, राणे कायम चर्चेत असतात. यावेळी अर्थातच राणेंना केंद्रीय मंत्रिपद मिळाले आणि या चर्चांना उधाण आले. अनेक कारणांनी राणेंचे स्वतःचेच राजकीय अस्तित्व आणि मूल्य धोक्यात आले होते. ते सारे लक्षात घेऊन श्री. राणे यांनी आता भारतीय जनता पक्षात बस्तान बसविण्याचे नक्की केले आहे, असे सध्याचे तरी चित्र आहे. मात्र कोकणातील राजकीय स्थिती, वातावरण आणि इतिहास पाहता त्यामध्ये कोणाचा फायदा होणार, भाजपची वाटचाल सुकर होणार का, की शिवसेनेचा गड अभेद्य राहणार, रिफायनरीचे काय होणार, आरएसएस आणि भाजपचे जुने कार्यकर्ते राणेंशी, त्यांच्या कार्यशैलीशी जुळवत घेऊन काम करू शकतील का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

त्यांनी केंद्रात मंत्रिपद मिळविले आहे. मिळालेले मंत्रिपद ते टिकवतील, यात शंका नाही. पण ते टिकवताना पक्ष म्हणून भाजपने त्यांच्याकडे कोणती जबाबदारी सोपवली असेल, तर तीही त्यांना निभावावी लागणार आहे. श्री. राणे यांच्या रूपाने अनेक वर्षांनी केंद्रीय मंत्रिपद सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि भाजपला मिळाले आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील जुने-नवे सर्वच कार्यकर्ते श्री. राणे यांच्याशी जुळवून घेतील, यात शंका नाही. संघटनेच्या आधारे श्री राणे आपले स्वतःचे स्थान बळकट करण्याचाही नक्कीच प्रयत्न करतील. मुळात श्री. राणे प्रशासनावर पकड असलेले नेते आहेत. मुख्यमंत्रिपद आणि त्यानंतरच्या महसूल, तसेच उद्योग मंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी ते दाखवून दिले आहे. आता केंद्रात मंत्रिपद सांभाळताना त्यांच्या अभ्यासूपणाचा कस लागणार आहे. श्री. राणे यांनी मंत्री म्हणून अतिलघु, लघु आणि मध्यम उद्योग खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच घेतलेल्या आपल्या खात्याच्या बैठकीत आपल्या कार्याची चुणूक अधिकाऱ्यांना दाखवून दिली आहे.

त्यांच्या लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या कार्यकक्षेत रिफायनरी प्रकल्प येत नाही. मात्र स्वतःचे पक्षातील आणि कोकणातील स्थान पणाला लावून श्री. राणे हा प्रकल्पही पूर्ण पुनरुज्जीवित करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. कारण रिफायनरी प्रकल्प उभा राहिला तर जे पूरक उद्योग उभे राहणार आहेत, त्या उद्योगांशी श्री. राणे यांच्या खात्याचा थेट संबंध येतो. रिफायनरी प्रकल्प झाला तर श्री. राणे यांच्या अखत्यारीतील केंद्रीय खात्याचा उपयोग करून अनेक उद्योग उभारायला चालना मिळू शकते. भूतकाळात झालेल्या चुका टाळत भविष्यावर लक्ष केंद्रित करणे आता श्री. राणे यांना आवश्यक आहे. श्री. राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची नावे निघताच हे तिन्ही नेते उसळून येतात. आता तो इतिहास समजायला हवा. छोट्या छोट्या नेत्यापासून उद्धव ठाकरेंपर्यंत कोणीही टीका केली, तर त्यावर उसळून येऊन प्रतिक्रिया द्यायलाच हवी असे नाही, हे पथ्य आता राणे कुटुंबीयांनी पाळायला हवे.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १६ जुलै २०२१)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा १६ जुलैचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
स्थानिक उपलब्ध साधनांच्या साह्याने कमी खर्चात टिकाऊ पाणीसाठवण टाक्यांच्या निर्मितीचे उल्हास परांजपे यांचे तंत्र. त्यांची पुस्तके ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी लिंक्स
‘चला पाणी साठवू या… अर्थात फेरोसिमेंटची किमया’ : shorturl.at/mrsM2
नैसर्गिक धागे-सिमेंट तंत्रज्ञानाने चला पाणी साठवू या!’ : shorturl.at/dFR37

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply