नानिवडेकर, हरकत होतीच पण ऐकला नाहीत!

श्रद्धेय मधुसूदन नानिवडेकर यांना,

तुझ्या घराच्या कोपऱ्यात मी अडगळ झालो

शोधायला पुन्हा नवे घर

हरकत नाही!

आज सकाळपासून आपल्या असंख्य गझलेतल्या याच `हरकत नाही` ओळी आमच्या सर्वांचेच मेंदू बधिर करून टाकत आहेत. मधुसूदनजी, हरकत तर सर्वांचीच होती. एवढे असताना ते नवे स्वर्गीय घर आपण एवढ्या लवकर का निवडलेत? न सांगता न सवरता! आपल्या गालावरील त्या खळीनेही सर्वांनाच दगा दिला…

आता तर संपर्काचे साधन म्हणजे तुमच्या मागे राहिलेल्या गझला आणि आठवणी!

मित्र हो! गझलभूषण मधुसूदन नानिवडेकरांना वरील मी चार ओळी लिहिल्या…. जरा रागावूनच लिहिल्या! त्याला कारण गेल्या वीस वर्षांचा आमचा स्नेहबंध! म्हणूनच वयाने माझ्यापेक्षा आठ वर्षांनी लहान असूनही त्यांच्या नावासमोर मी `श्रद्धेय` हा शब्द योजिला! आज जरी ते नवे घरे शोधायला गेलेले असतील, तरीही गझलभूषण माझ्यासाठी श्रद्धेय आहेत! श्रद्धेय होते… आणि श्रद्धेयच राहणार!

मी साधारणतः वीस वर्षांपूर्वी एका वृत्तपत्रातील रविवारच्या आवृत्तीत एक व्यक्तिचित्र लिहिले होते. त्याचे नाव होते, `फुगडीची अदाकारी ताया श्रावणची` लहानपणी जिच्या फुगड्या आम्ही अनुभवल्या, त्या आचऱ्याजवळील श्रावण गावच्या एका ग्रामीण स्त्रीचे ते व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाल्यावर मधुसूदन नानिवडेकरांचा पहिला फोन! माझे झालेले साहित्यातील अधिकारी व्यक्तीचे ते पहिले कौतुक! ते म्हणाले, “ठाकूर, तुम्ही लिहीत राहा. हात नेहमी लिहिता ठेवा! आपल्या लिखाणात कोकणची खरी संस्कृती जाणवते!“ त्यांच्या या प्रेरणेनेच माझे पहिले पुस्तक `शतदा प्रेम करावे` साकार झाले. त्यानंतर माझे माझ्या परीने साहित्य क्षेत्रात जे कार्य झाले, त्यात लिहिता हात माझा होता, त्यामागील सर्व प्रेरणा मधुसूदन नानिवडेकर यांचीच होती.

माझ्यासारख्या असंख्य लिहित्या हातांचे आज अतोनात नुकसान झाले आहे. कारण नवलेखकांना प्रेरणा देणारेच आज सर्वत्र अल्पसंख्याक झालेले असताना मधुसूदन नानिवडेकरांसारखा ध्रुव तारा सर्वांना केंद्रस्थानी होता!

गेल्या अनेक वर्षांच्या अनेक आठवणींनी आज नजरेसमोर मांदियाळी केली आहे. नवी मुंबईत वाशी येथे ११ नोव्हेंबर २०१७ रोजी भरलेले नववे अखिल भारतीय गझल संमेलन! कोकणातून अध्यक्षस्थानी प्रथमच मधुसूदन नानिवडेकर यांना अध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण संधी! आचरे येथून मी, कपिल गुरव, अशोक पाडावे, सचिन कुबल आदी अनेक जण वाशीला पोहोचलो. कपिल गुरवने तेथेच चित्रपट दिग्दर्शक राजदत्त आणि नाट्यअभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या हस्ते मधुसूदन नानिवडेकर यांचा सत्कार अध्यक्षस्थानी विराजमान होण्यापूर्वीच केला. आचरे गावच्या भूमीचा तो वाशी येथे झालेला सत्कार पाहून मधुसूदन नानिवडेकर यांचे हृदय भरून आले! पुढील अध्यक्षीय भाषणात त्यांच्या तोंडून ते कौतुक वारंवार आले! “माझे अध्यक्षीय भाषण गाजले, याला कारण रंगमंचाची पायरी चढताना आपलला संस्थान आचरेचा सत्कार!“ असे ते म्हणत. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉ. विद्याधर करंदीकरांच्या निधनानंतर कोणताही साहित्यिक संदर्भ विचारण्याचे आमचे एकच ठिकाण म्हणजेच मधुसूदन नानिवडेकर!

गेल्या वर्षी आम्ही कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने `सिंधुसाहित्यसरिता` हे पुस्तक प्रकाशित केले. कोकणातील २१ साहित्यिकांचा परिचय आमच्या मालवण कोमसापच्या १६ नवलेखकांनी केलेला आहे. आमचे ते पहिले अपत्य आज सर्वत्र गाजत आहे. त्यातील कारणांपैकी नानिवडेकर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आणि सत्त्वश्री प्रकाशनची आकर्षक निर्मिती!

या पुस्तकाचा संकल्प सोडतानाच मी मधुसूदन नानिवडेकर यांना दोन बाबी सांगितल्या होत्या. “नानिवडेकर, या पुस्तकाची ज्यावेळी निर्मिती होईल, त्यावेळी त्याला प्रस्तावना आपलीच असेल!“ नानिवडेकर यांनी त्या पुस्तकाला `जाणिवेचा अनोखा सरित्सागर संगम` या शीर्षकाखाली प्रस्तावना लिहिली. आज ती प्रस्तावनाच एक अभ्यासाचा विषय होऊन राहिली आहे, असे अनेकांचे मत आहे. ते पुस्तक मला कोकणचे सुपुत्र कै. नाथ पै यांच्या पवित्र स्मृतीला अर्पण करकायचे होते. माझी अर्पणपत्रिका तयार झाली. मी नानिवडेकरांना फोन केला, “सर! नाथ पैंना माझं पुस्तक अर्पण करायचं आहे. चार ओळी सुचवा ना!“ पलीकडून त्या चार ओळी तयार होऊनच माझ्या कानी आल्या,

आम्ही कोकणातील हे लोक, समृद्ध झालो, तुझे हे खरे थोरपण

आदर्श वक्ता हे नाथ, त्यांना या भूमीचे खूप अपुलेपण

किती थोरवी आज सांगू तयांची, गुणांचेच आम्हा आकर्षण

हिऱ्यासारखे तेज ज्यांचे तयाला, `साहित्यसरिता` करू अर्पण!

नानिवडेकर, तुम्ही असे नवे घर शोधायला गेलात! आता अशा हिऱ्यामाणकांसारख्या ओळी आम्ही कोणाजवळ मागणार हो!

म्हणूनच आमची हरकत होती! तुम्हीच ऐकला नाहीत!

तुमच्या अशा असंख्या पवित्र स्मृतींना आमचे अभिवादन!

  • सुरेश ठाकूर,

आचरे, ता. मालवण

वाशी येथील तो सत्कार.. डावीकडून सुरेश ठाकूर, कपिल गुरव, नानिवडेकर, राजदत्त, अशोक पाडावे

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply