रत्नागिरी : लोकमान्य टिळकांच्या १०१ व्या स्मृतिदिनानिमित्ताने अ. के. भागवत आणि ग. प्र. प्रधान लिखित साधना प्रकाशनाच्या लोकमान्य टिळक चरित्र या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी येथील उपकेंद्राचे चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर नामकरण आणि लोकमान्य टिळक अध्यासनाचे उद्घाटन रत्नागिरीत झाले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, मुंबई विद्यापीठाच्या उपविभागाचे संचालक डॉ. किशोर सुखटणकर, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ बळीराम गायकवाड, टिळक अध्यासनाच्या प्रमुख डॉ. सुचित्रा नाईक, दूरदर्शनचे निवृत्त सहसंचालक जयू भाटकर, डॉ राजेंद्रप्रसाद मसुरकर आणि साधना प्रकाशनाचे प्रतिनिधी समीर शेख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. त्याच समारंभात या चरित्राचे प्रकाशन झाले. लोकमान्य टिळकांचे विस्तृत आणि महत्त्वाचे असे सहाशे पानांचे इंग्रजी चरित्र ६५ वर्षांनंतर मराठीत उपलब्ध झाल्यामुळे टिळकांच्या अभ्यासकांना मोठा दस्तऐवज उपलब्ध झाला आहे, अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. मूळ इंग्रजीत प्रसिद्ध झालेल्या आणि नवी दिल्लीतील जयको पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या या इंग्रजी पुस्तकाला १९५६ साली अखिल भारतीय काँग्रेस समितीने टिळक जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेत इतर दोन मराठी पुस्तकांसह प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले होते. पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीला तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची प्रस्तावना आहे.
या चरित्राचा मराठी अनुवाद रत्नागिरीच्याच अवधूत डोंगरे यांनी केला आहे. पुस्तक मराठीत आणताना मूळ पुस्तकातील सर्व मजकूर समाविष्ट केला असून, मराठी आवृत्तीला डॉ. सदानंद मोरे यांची विवेचक प्रस्तावनाही आहे. आगरकरांकडे कल असलेल्या दोन लेखकांनी लिहिलेले आणि आशिया खंडाला केंद्रस्थानी ठेवून आणि जागतिक भूमिकेतून लिहिले गेलेले, अशी या पुस्तकाची दोन प्रमुख वैशिष्ट्ये डॉ. मोरे यांनी प्रस्तावनेत नोंदवली आहेत.
हे पुस्तक ई-बुक स्वरूपातही उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी खालील लिंकवर जा –
https://amzn.to/37rxJLS

