पहिल्या पाच क्रमांकांत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव राहील – उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी : भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष राज्यभर विविध कार्यक्रमांनी साजरे करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यातून हा महोत्सव साजरा करताना पहिल्या पाच क्रमांकात जिल्ह्याचे नाव राहील अशा पद्धतीने काम करू या, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

येथील पोलीस कवायत मैदानावर भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्यावेळी ते बोलत होते. श्री. सामंत यांनी देशाची एकता अखंडता, स्वातंत्र्य आणि सार्वभौमता राखण्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शूर सैनिकांना आणि वीर पुत्रांना आदरांजली अर्पण करून जिल्हावासीयांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी पोलीस दलाने मानवंदना दिली. यानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांना भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा रुग्णालय आणि आरोग्य विभागातील कोविड काळात उत्कृष्ट काम करणारे डॉक्टर्स, कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम पाटील, डॉ. परमेश्वरी रेड्डी, परिचारिका मानसी गावडे, संतोषी देसाई, गीतांजली झोरे, वाहन चालक केतन पारकर, संदीप कदम, सचिन परब, सफाई कामगार विश्राम जाधव, मानसी वेझरे, सुनील तांडेल यांचा त्यात समावेश होता. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कुडाळचे तालुका आरोग्य अधिकारी संदेश कांबळे, पणदूरच्या आरोग्य सहाय्यिका कुंदा पवार, कुडाळ आरोग्य अधिकारी कार्यालयातील आरोग्य सहाय्यक चंद्रशेखर नाईक, प्राथमिक आरोग्य केंद्र गोळवण, उपकेंद्र सुकळवाडच्या आरोग्य सेविका ग्लोरिया व्रिटो, प्राथमिक आरोग्य केंद्र वरवडे उपकेंद्र कलमठचे आरोग्य सेवक चंद्रमणी कदम यांचाही सन्मान करण्यात आला. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या एसएसपीएम रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि गोवा मेडिकल कॉलेज या रुग्णालयांचाही गौरव करण्यात आला.

यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख आणि नागरिक उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply