मुंबई : महाराष्ट्राला नैसर्गिक, ऐतिहासिक, पौराणिक, भौगोलिक असे विविधांगी पर्यटनवैभव लाभले आहे. राज्यात जंगले, पुरातन गडकिल्ले, गुंफा, मंदिरे, समुद्रकिनारे, वन्यजीव असे पर्यटन वैविध्य असून हे जगाभरापर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यातून देशातील आणि जगभरातील पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होतील आणि त्याद्वारे राज्याचा पर्यटनविकास होऊन रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) विविध उपक्रमांचा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी, १७ ऑगस्ट रोजी वर्षा या त्यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

एमटीडीसीने जलद आणि अधिक कार्यक्षम सेवा देण्यासाठी सुधारित बुकिंग इंजिन तसेच राज्यातील पर्यटनस्थळांच्या तपशिलवार माहितीसह नवीन संकेतस्थळ सुरू केले आहे. तसेच सिंहगड (जि. पुणे) येथील एमटीडीसीच्या पर्यटक निवासाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. गणपतीपुळे (जि. रत्नागिरी) येथे बोट क्लब सुरू करण्यात येत असून या तिन्ही उपक्रमांचा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते यावेळी शुभारंभ करण्यात आला.

एमटीडीसीच्या पर्यटक निवासांचे बुकिंग अधिक सुलभ होणे आणि जगभरातील पर्यटकांसाठी ही बुकिंग सुविधा उपलब्ध होण्यासाठी मेक माय ट्रिप आणि गो आय बिबो या नामांकित संकेतस्थळांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे एमटीडीसीची पर्यटक संकुले आता ही संकेतस्थळे वापरून कोठूनही बुक करता येणार आहेत. महाराष्ट्रात स्काय डायव्हिंग साहसी क्रीडाप्रकार सुरू करण्याच्या दृष्टीने स्काय-हाय सोबत सामंजस्य करार करण्यात आला. तसेच एमटीडीसी कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटसोबतही सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील आणि संबंधित संस्थेच्या प्रतिनिधींनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

आज सुरू करण्यात आलेल्या गणपतीपुळे येथील बोट क्लब तसेच स्काय-हायसोबत करण्यात आलेल्या करारासारख्या उपक्रमांमुळे कोकणातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, साहसी पर्यटनासारखा नवीन उपक्रम कोकणात यशस्वी ठरेल, असा विश्वास यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्यासह कोकणाच्या पर्यटन विकासासाठी शासनाने मोठा पुढाकार घेतला आहे. आपण कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याबाबत नेहमी बोलत असतो. पण कोकणाचा पर्यटनासह इतर सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे कॅलिफोर्नियाने कोकणासारखे होण्याबाबत बोलले पाहिजे, अशा पद्धतीने कोकणाचा विकास करू. सध्या करोनामुळे ठप्प झालेल्या पर्यटन क्षेत्राला नव्या उपक्रमांमुळे चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार-सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या प्राचार्य डॉ. अनिता मुदलीयार, मेक माय ट्रिपचे हरजित कुमार, स्कायहायचे रुद्र बंधू सोळंकी, हर्षिल कोरिआ आदी मान्यवर उपस्थित होते. परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, खासदार विनायक राऊत यांच्यासह पुणे आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.


