दापोली : दापोली सायकलिंग क्लबतर्फे उद्या (१० ऑक्टोबर) जागतिक वन्यजीव सप्ताहनिमित्त सायकलफेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याबाबत जागृती रुजवण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात जागतिक वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. या वन्यजीवांचा जीवनक्रम समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल असणारे गैरसमज दूर करण्यासाठी ही सायकल फेरी असेल. सायकल फेरी आझाद मैदानातील ध्वजस्तंभावरून सकाळी ७:१५ वाजता सुरू होईल. सायकल फेरीचा मार्ग आझाद मैदान – केळस्कर नाका- बुरोंडी नाका- चंद्रनगर- नवभारत छात्रालय- वन विभाग कार्यालय मार्गे पुन्हा आझाद मैदान असा १० किलोमीटराचा असेल. समारोप आझाद मैदानात सकाळी १० वाजता होईल.
सायकल फेरीमध्ये दापोली परिक्षेत्र वन अधिकारी वैभव बोराटे आणि सहकारी, वन विभागाचे अधिकारी, प्राणिमित्र, पक्षिमित्र, सर्पमित्र इत्यादी सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. जंगलातील गमतीजमती सांगणार आहेत. भारतासहित जगातील इतरही पुरातन संस्कृतींमध्ये सांगितल्याप्रमाणे मानव आणि वन्यजीवात मैत्री असणे ही संपूर्ण पृथ्वीची गरज आहे, कारण वन्यजीवांखेरीज मानव सुखाने राहूच शकणार नाही, हेही पटवून देणार आहेत.
सायकल फेरीसाठीच्या सूचना आणि नियम असे – फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. कोणतीही सायकल घेऊन येऊ शकता. सर्व वयोगटातील सायकलप्रेमी सहभागी होऊ शकतात. फेरीमध्ये सायकल हळूहळू, रांगेत एकाच्या मागोमाग एक अशी चालवली जाते. ओव्हरटेक करू नये. दर १ किमीनंतर थोडा वेळ थांबून कोणी पुढे-मागे होणार नाही याची काळजी घेतली जाते. सोबत काही पालक, स्वयंसेवक दुचाकी घेऊन असतात. मास्क आवश्यक आहे. सायकल फेरी मार्गावर काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. तरीही प्रत्येकाने सोबत पाण्याची बाटली, थोडा खाऊ ठेवावा. पाऊस असल्यास सोबत रेनकोट ठेवावा. सायकल हेल्मेट, हातात सायकल ग्लोव्ह्ज असलेले चांगले आहे.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायक बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने सर्वांसाठी दापोली सायकलिंग क्ल मार्फत विनामूल्य अनेक सामाजिक उपक्रम, सायकल दुरुस्ती शिबिर, सायकल राइड, स्पर्धा, शर्यती, सायकल फेरी इत्यादींचे आयोजन केले जाते. सर्वांनी त्यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हावे आणि इतरांनाही सायकल चालवायला प्रेरित करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सर्वांनी सायकल चालवू या, प्रदूषण टाळू या, पर्यावरण जपू या, तंदुरुस्त राहू या, मानसिक ताणतणाव घालवू या, प्रतिकारशक्ती वाढवू या आणि रोगमुक्त होऊ या, असा संदेशही क्लबने दिला आहे.
अधिक माहितीसाठी ८६५५८७४४८६ किंवा ९५४५१९८७१३ या मोबाइलवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media