चिपी विमानतळामुळे कोकणच्या विकासाचा नवा अध्याय – ज्योतिरादित्य शिंदे

सिंधुदुर्ग विमानतळाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

चिपी (वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग विमानतळाच्या उद्घाटनाने कोकणच्या विकासाचा एक नवा अध्याय लिहिला जात आहे. तीन दशकांचे स्वप्न आज साकार होत आहे. पुढच्या पाच वर्षांत २० ते २५ नवीन उड्डाणे तेथून सुरू होतील, असा विश्वास केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला.

नागरी विमान वाहतूक मंत्रालय, महाराष्ट्र शासन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने उड्डाण प्रादेशिक संपर्कता योजना अंतर्गत ग्रीनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी श्री. शिंदे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मराठीतून बोलत होते. कोकणातील कोकम, आंबा, फणस, मासे यांचे उद्योग देशात प्रसिद्ध होतील. कोकणातील सौंदर्य, भौगोलिकता, इतिहास जगभरात पोहोचवता येईल. त्यासाठी माझा विभाग निश्चित काम करेल.

या विमानतळामुळे आजचा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील सोनेरी दिवस ठरला आहे. कोकणच्या विकासाने भरारी घेतली आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. मान्यवरांच्या उपस्थितीत विमानतळावरील कोनशिलेचे अनावरण करून आणि नंतर दीपप्रज्वलन करून मुख्यमंत्र्यांनी विमानतळाचे औपचारिक उद्घाटन केले. यावेळी पहिला बोर्डिंग पास अलायन्स एअरलाइन्सचे सीओ श्री. सूद यांनी केंद्रीय हवाई मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना दिला.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, आता जगभरातील पर्यटक कोकणात येतील आणि कोकणची संपन्नता जगासमोर येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोकणवासीयांचे स्वप्न पूर्ण झाले, याचा आनंद झाला आहे. कोकणचे वैभव मोठे आहे. गोव्यापेक्षाही इथले समुद्र किनारे स्वच्छ, सुंदर आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. इथल्या स्थानिक उद्योजकांना, आंबा, काजू, फणस तसेच मासे निर्यातीला प्रोत्साहन व चालना मिळेल. या विमानतळाच्या निमित्ताने कोकणचे सौंदर्य जगासमोर जाणार असून येथील निसर्गसौंदर्य आणि मातीचा सुगंध जगातील पर्यटकाला आकर्षित करेल. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विमानतळांचा विकास करण्याच्या दृष्टीने शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून सिंधुदुर्ग विमानतळ आंतरराष्ट्रीय होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. येथे विमानाबरोबरच हेलिकॉप्टर सेवाही सुरू झाल्यास पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेता येईल. शासनाने पर्यटनाला प्रोत्साहन आणि गती मिळण्यासाठी उद्योगाचा दर्जा दिेला आहे. त्यामुळे उद्योजकांनाही या भूमीत चांगली संधी आहे. लवकरच मुंबई-गोवा महामार्गाचे काम तसेच राज्यातील अन्य महामार्गाची कामे सुरू करण्यात येणार आहेत, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी कोकणवासीयांना शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे म्हणाले, आजचा क्षण अतिशय आनंदाचा आहे. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा पर्यटनाला उभारी मिळेल. इथल्या लोकांना रोजगार मिळेल. श्री. राणे यांनी आपल्या भाषणात चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबतच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली. विमानतळाला विरोध करणारे इथे स्टेजवरच आहेत. याच जागेवर मी आणि सुरेश प्रभू १५ ऑगस्ट २००९ रोजी भूमिपूजन करायला आलो होतो. तेव्हा समोर आंदोलन होत होते. भूमिपूजन होऊ देणार नाही, आम्हाला विमानतळ नको, असे म्हणत आंदोलन सुरू होते. विरोध होत होता. अजित पवार साहेबांनी सीवर्ल्ड प्रकल्पासाठीच्या अधिग्रहणासाठी १०० कोटी रुपये दिले. पण काय झाले, कोणी रद्द केले, तेथे कोण आंदोलन करत होते, हा प्रश्न आहे. ते सारे स्टेजवर आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोकणवासीयांचे खूप दिवसांचे स्वप्न होते. या विमानतळाच्या उभारणीत अनेकांचे योगदान आहे. कोकणाला निसर्गाचे वरदान आहे. कोकणाचे सौंदर्य आकर्षित करते. पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून हा विमानतळ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जगातून पर्यटक यावेत, तरुणांना रोजगार मिळावा. येथे आर्थिक सुबत्ता नांदावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपण होत आहोत. पुढच्या उज्ज्वल समृद्ध भविष्यकाळाची सुरुवात होत आहे. पर्यटनाची खूप मोठी संधी असून नव्या युगाची सुरुवात होत आहे.

उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले, या विमानतळावरील येथून पुढची उड्डाणे फुल्ल असतील. एमआयडीसीने विमानतळासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा केल्या, याचा मला आनंद आहे. कोकणवासीयांची स्वप्ने साकार होतील.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, जगाला कोकण दाखवू शकतो. कोकण जगप्रसिद्ध आहेच. जगाला आजपासून दरवाजे खुले झाले आहेत. पर्यटक कसे येतील, पर्यटन आणताना पर्यावरण कसे राखले जाईल, याची जबाबदारी आम्ही घेत आहोत.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, या विमानतळामुळे जगभरातील पर्यटक कोकणात येतील आणि स्थानिक लोकांना रोजगार मिळेल.

खासदार विनायक राऊत यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. पालकमंत्री उदय सामंत यांनी आभार मानले. या सोहळ्यास राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलीस महासंचालक संजय पांडे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, आयआरबीचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर, राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्यसभा सदस्य सुरेश प्रभू, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, विधानसभा सदस्य दीपक केसरकर, नागरी विमान वाहतूक सचिव राजीव बन्सल, विधान परिषद सदस्य बाळाराम पाटील, विधानसभा सदस्य वैभव नाईक, अप्पर मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंह, विभागीय आयुक्त कोकण विभाग विलास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, लोकसभा सदस्य विनायक राऊत, विधान परिषद सदस्य अनिकेत तटकरे, आमदार नीतेश राणे, खासदार अरविंद सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, नीतेश राणे, प्रधान सचिव (विमानचालन) वल्सा नायर सिंह, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर आदी उपस्थित होते.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी मराठीतून संवाद साधला, त्याची चित्रफीत

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply