रत्नागिरी : अभ्यासू पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर, शिक्षक प्रसाद काकिर्डे, उद्योजिका सीमा आठल्ये, कीर्तनकार महेश सरदेसाई, खेळाडू ईशा पवार, उद्योजिका पूर्वा प्रभुदेसाई, वेदमूर्ती नारायण जोगळेकर, डॉक्टर मोहन किरकिरे यांना रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण संघाचे २०२१ या वर्षाचे पुरस्कार दिले जाणार आहेत. आज (९ डिसेंबर) संघाकडून या नावांची घोषणा करण्यात आली. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, पुस्तक भेट, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरणाची तारीख लवकरच कळवण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी दिली. अर्ज न मागवता विविध माध्यमांतून माहिती मिळवून गेली अनेक वर्षे हे पुरस्कार दिले जातात.
दर्पण पुरस्कारासाठी साप्ताहिक कोकणी माणूस, तसेच मोटार जगतचे संपादक असलेले ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांना जाहीर झाला आहे. ते ३५ वर्षांहून अधिक काळ विविध वृत्तपत्रांमध्ये लेखन करत आहेत. मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये ते लेखन करतात. त्यांनी चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर यांचे मराठी व इंग्रजी चरित्र लिहिले. कीर यांनी लोकमान्य टिळकांवर इंग्रजीत लिहिलेल्या चरित्राचे मराठीत भाषांतर केले. कवी अनंततनय यांनी १०० वर्षांपूर्वी रचलेल्या ‘झोंपाळ्यावरची गीता’ या बालसुलभ मराठी काव्यरचनेचा त्यांनी समश्लोकी इंग्रजी अनुवाद केला आहे. त्यांची आणखी दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात त्यांनी बीए व एमएच्या विद्यार्थ्यांना पत्रकारिता व इतिहास हे विषय ११ वर्षे शिकवले आहेत. पत्रकारिता, सुरक्षित वाहतूक, मराठी भाषा, मोटारगाड्यांतील अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांचा व्यासंग असून, त्यावर त्यांनी आतापर्यंत सव्वाशेहून अधिक व्याख्याने दिली आहेत.
आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार कोळंब शाळेचे शिक्षक प्रसाद काकिर्डे (ताम्हाणे, राजापूर) यांना जाहीर झाला आहे. २००८पासून ते ताम्हाणे धनगरवाडी, तुळसवडे, जांभवली आणि आता कोळंब शाळेत शिकवत आहेत. गेले वर्षभर ते करोना योद्धा म्हणून सेवा बजावत आहेत. वाडीवस्तीवरील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणून शिकवण्याचे काम ते करत आहेत.
आदर्श पौरोहित्य पुरस्कार रत्नागिरीतील वे. मू. नारायण जोगळेकर यांना जाहीर झाला. गोकर्ण, कर्नाटक, पुणे, रत्नागिरी या ठिकाणी त्यांनी दशग्रंथांचे शिक्षण पूर्ण केले. वे. मू. घैसास गुरुजी, वे. मू. आठल्ये गुरुजी यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. 1985 पासून ते पौरोहित्य करत असून, पुण्यातील वेदशास्त्रोत्तेजक सभेतर्फे घेण्यात येणार्या वैदिक परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केल्या आहेत.
नारदीय कीर्तनकार महेश सरदेसाई (मोर्डे, संगमेश्वर) यांना आदर्श कीर्तनकार पुरस्कार देण्यात येणार आहे. गेल्या २७ वर्षांत त्यांनी महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक या राज्यांत दोन हजारांहून अधिक कीर्तने केली आहेत. ज्येष्ठ कीर्तनकार दत्तदासबुवा घाग, गंगाधरबुवा व्यास यांची अनेक कीर्तने ऐकून ही कला आत्मसात करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ते ह. भ. प. श्रीपादबुवा ढोले यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत.
सावर्डे येथील आंतरराष्ट्रीय तिरंदाजपटू (आर्चरी) खेळाडू ईशा पवार हिला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार जाहीर झाला आहे. ईशाने आंतरराष्ट्रीय आर्चरी चँपियनशिपमध्ये रौप्य व कास्यपदक पटकावलं आहे. तिसर्या दक्षिण आशियायी धनुर्विद्या चँपियनशिपमध्ये तिने सुवर्ण व रौप्यपदके पटकावली आहेत. याशिवाय खेलो इंडिया स्पर्धांमध्ये सलग तीन वर्षे सुवर्णपदक आणि एका स्पर्धेत कास्यपदक मिळवण्याची कामगिरी तिने केली आहे. राष्ट्रीय पातळीवर तिने आतापर्यंत नऊपेक्षा अधिक पदके मिळवली आहेत.
उद्योजिका पुरस्कार लांज्यातील सौ. पूर्वा प्रभुदेसाई यांना जाहीर झाला. घरात खाण्यासाठी आईंनी बनवलेली कढीपत्ता चटणी लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने २०१५पासून त्यांनी संकल्प फूड्स या उद्योगाची सुरुवात केली. नंतर तीळकूट, लसूण चटणी, गोडा मसाला, पारंपरिक पद्धतीने बनवलेली लोणची अशी सुमारे ३५ ते ४० उत्पादने बाजारात आणली. रत्नागिरीसह मुंबई, पुण्यात ही उत्पादने विकली जातात. कोरोना काळात दीड वर्षे समस्या होत्या. परंतु त्या काळात त्यांनी हापूस आंबा मोदक, दिवाळी फराळ, आयुर्वेदिक उटणे यांचा व्यवसाय केला.
उद्योगिनी पुरस्कार सौ. सीमा आठल्ये (शिपोशी, लांजा) यांना जाहीर झाला आहे. सुरुवातीला त्या लहानसहान खाद्यपदार्थ तयार करून ओळखीच्या लोकांमध्ये विक्री करायच्या. त्यानंतर श्री समर्थ कृपा या नावाने हा व्यवसाय त्यांनी वाढवत नेला. २०१४ साली त्यांनी आवळा सरबत बनवण्याकरिता मशिनरी घेतली. त्यानंतर आवळ्यापासून सरबत, मावा, पेठा, सुपारी, लोणचे, तसेच आंबा, लिंबू, मिरची लोणचे, सरबते, आमसुले, कोकम, कुळीथ पीठ अशी उत्पादने त्या करत आहेत. ही सर्व उत्पादने रत्नागिरी जिल्ह्यासह पंढरपूर, पुणे, मुंबईत विकली जातात.
डॉ. मोहन शंकर किरकिरे यांना यंदाचा धन्वंतरी पुरस्कार दिला जाणार आहे. नाणार (ता. राजापूर) येथील डॉ. किरकिरे १९८५पासून वैद्यकीय सेवा बजावत आहेत. आतापर्यंत त्यांनी हजारो रुग्णांवर अगदी कमी शुल्कामध्ये उपचार केले आहेत.
पुरस्कार जाहीर झालेल्या सर्वांचे कर्हाडे ब्राह्मण संघाने अभिनंदन केले असून, पुरस्कार वितरणाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्या वेळी संघाचे सदस्य आणि ज्ञातिबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केले आहे.