रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात गेल्या नऊ महिन्यांत साडेसहा हजाराहून अधिक ग्रंथांची देवाणघेवाण झाली, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
ते म्हणाले, गेले दीड वर्ष करोना लॉकडाउनमुळे त्रासदायक ठरले. तरीही वाचकांची वाचन तृष्णा कमी नव्हती. गेल्या नऊ महिन्यांत १२३७ वाचकांनी ६५५३ पुस्तके वाचली. या काळात वाचकांच्या वाचन अभिरुचीचा मागोवा घेताना मला खूप रोचक माहिती उपलब्ध झाली. अजूनही व्यक्ती आणि वल्ली हे पु. ल. देशपांडे यांचे पुस्तक सर्वात अधिक २५ वाचकांनी वाचले. प्रेमरज्जू पुस्तक २१ वाचकांनी वाचले. गोष्टी माणसांच्या, आहे मनोहर तरी, मन में है विश्वास, पडघवली, महाश्वेता, ययाति, शोध, कोसला ही पुस्तके १७ वाचकांनी वाचली. अजूनही जुने साहित्य वाचकांमध्ये लोकप्रिय आहे हे मागोवा घेता स्पष्ट होते.
लोकप्रिय लेखकांमध्ये व. पु. काळे यांच्या पुस्तकांना सर्वांत जास्त मागणी जाणवते. विजया वाड, नारायण धारप, पु. ल. देशपांडे, सुहास शिरवाळकर, मारुती चित्तमपल्ली, अच्युत गोडबोले, जयंत नारळीकर, चंद्रकांत काकोडकर, बाबा कदम, वीणा गवाणकर, प्रवीण दवणे, मीना प्रभू, निरंजन घाटे, वि. स. खांडेकर, रणजित देसाई, ह. मो. मराठे, ना. सं. इनामदार या लेखकांच्या पुस्तकांना अजूनही वाचकांमध्ये फार मोठी मागणी आहे. विविध १८३० कादंबर्या वाचल्या गेल्या. ११३८ कथांचा आस्वाद वाचकांनी घेतला. ६६२ इंग्रजी भाषेतील पुस्तके वाचकांनी वाचली. ६४० चरित्रे वाचकांनी अभ्यासली. बालविभागातील २४५ पुस्तके बालवाचकांनी वाचली. इतर पुस्तकांमध्ये इतिहास विषयाशी संलग्न १९०, १५१ प्रवासवर्णनपर पुस्तके, ८ कोशवाङ्मय, प्राणीशास्त्र, अध्यात्म, लघुनिबंध, ललित वाङ्मय, विनोदी वाङ्मय, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, नाटके, अर्थशास्त्र, भूगोल, तंत्रज्ञान, कविता संग्रह अशा एकूण ६० प्रकारची पुस्तके वाचकांनी भरभरून वाचली. वाचनालयामध्ये विपुल ग्रंथसंपदा आहे. वाचक काय वाचतात, त्यांची आवड काय आहे, त्यांच्या अभिरुचीप्रमाणे पुस्तके उपलब्ध आहेत ना, हे पाहण्यासाठी घेतलेला मागोवा खूप रोचक ठरला. उच्च अभिरुची जोपासणारा मोठा वाचक वर्ग डिजिटल युगातही पुस्तकांची साथ सोडत नाही. जुनी पुस्तके, जुने लेखक अद्यापही लोकप्रिय आहेत. त्यांनी मांडलेले विषय कालौघात वाहून गेलेले नाहीत. हे या मागोव्यात जाणवले. नवनवीन साहित्य प्रकार, नवनवीन प्रकाशित पुस्तकांनाही चांगली मागणी आहे.
नगर वाचनालयाच्या १ लाख ८ हजार पुस्तकांचा वाचकांनी भरभरून लाभ घ्यावा. त्यासाठी वाचनालयाचे सभासदत्व घ्यावे, असे आवाहन अध्यक्ष अॅड. पटवर्धन यांनी केली आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media