अधिक आव्हानांची पत्रकारिता

मराठी पत्रकार दिन नुकताच साजरा झाला. दर्पण या मराठी साप्ताहिकाचा पहिला अंक ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी प्रसिद्ध केला आणि मराठी पत्रकारितेचा उगम झाला. त्यानिमित्ताने हा दिवस महाराष्ट्रात ठिकठिकाणी साजरा केला जातो. त्यादिवशी पत्रकारांना पुरस्कार दिले जातात. काही पत्रकार संघटना सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातल्या उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांचा सन्मान करतात. अशा तर्‍हेने पत्रकार दिन साजरा करत असताना अलीकडे समाजमाध्यमांचा मुख्य प्रसारमाध्यमांवर झालेला परिणाम हा मोठा चर्चेचा विषय असतो. अलीकडे वाचनाची सवय कमी झाली आहे, असे सांगितले जाते. करोनाच्या काळात तर वर्तमानपत्राचा हात लावला तर करोनाची लागण होऊ शकते, अशा भ्रामक समजुतीमुळे अनेक जणांनी घरचे वर्तमानपत्र बंद केले. त्याचाही मोठा फटका वर्तमानपत्रांना बसला. अनेक पत्रकारांचा रोजगार बुडाला. त्यातून अजूनही पत्रकारिता सावरलेली नाही. समाजाचे दुःख मांडणार्‍या पत्रकारांचे दुःख मात्र पूर्णपणे दुर्लक्षित आहे.

काळानुरुप पत्रकारितेचे स्वरूपही बदलले आहे. एकेकाळची मतपत्रे स्वातंत्रय संग्रामाच्या उद्गार काढत असत. स्वातंत्र्योत्तर काळात त्यामध्ये बदल झाला आणि गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये तर कमालीचा बदल झाला आहे. वृत्तमाध्यमांचे स्वरूप बदलले आहे. तंत्रज्ञान अत्याधुनिक झाले आहे. त्यामध्ये कागदविरहित समाजमाध्यमांचा बोलबाला आहे. परिणामी पारंपरिक पत्रकारितेला धोका पोहोचला आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पत्रकारितेला चांगले दिवस राहिले नाहीत, असे म्हटले जाते, ते मात्र तितकेसे खरे नाही.

जगाचे सोडून द्या, पण भारतापुरता विचार केला, तरी भारताने संसदीय लोकशाहीचा अंगीकार केला आहे. संसद, प्रशासन, न्यायालय आणि पत्रकारिता या चार स्तंभांवर लोकशाहीची इमारत उभी आहे. लोकशाही जिवंत ठेवायचे असेल, तर इतर तीन स्तंभांप्रमाणेच पत्रकारिता या चौथ्या स्तंभालाही मरण नाही. माहिती आणि मनोरंजनाची विविध साधने आधुनिक काळात उपलब्ध झाली आहेत. पण तरीही समाजाचे प्रश्न संपले आहेत, अशी स्थिती नाही. नवनव्या आणि आधुनिक सुविधांबरोबरच असंख्य समस्याही निर्माण होत आहेत. भ्रष्टाचाराची नवनवी कुरणे निर्माण होत आहेत. स्वरूप बदलले असले, तरी घोटाळे सुरूच आहेत. मात्र ते शोधून काढण्याची पत्रकारांची वृत्ती संपली आहे. यात बदल व्हायला हवा. समाजमाध्यमांवर त्यावर चर्चा होण्याची शक्यता नाही. कारण त्यावरील माहिती अभ्यासपूर्ण असतेच असे नाही. समाजमाध्यमांच्या प्रसारामुळे मूळ पत्रकारितेला धोका निर्माण झाला असला, तरी पत्रकारिता संपली असे म्हणता येणार नाही. समाजमाध्यमांच्या मर्यादा आणि लोकशाहीच्या चौकटीला अनुसरून कोणते बदल करायला पाहिजेत, याचा शोध मात्र मूळ पत्रकारितेने घ्यायला हवा. म्हणूनच ते मोठ्या आव्हानाचे काम आहे. विविध पत्रकारांनी आणि त्यांच्या संघटनांनी त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

पत्रकारांनी समाजातल्या इतर घटकांना पुरस्कार आणि पारितोषिके देऊन सामाजिक बांधिलकी जपण्यापेक्षा पत्रकारिता हीच मुळात सामाजिक बांधिलकी आहे, याचे भान ठेवून नव्या बदलांमध्ये पत्रकारितेचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यावर चर्चा, विचारविनिमय व्हायला हवा. नव्या आणि आधुनिक विचारांबरोबरच पत्रकारांची प्रगल्भताही वाढली पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाचा आणि आधुनिक प्रसारमाध्यमांचा पत्रकारितेकरिता कसा उपयोग करून घेतला जाऊ शकतो, याचा विचार करायला हवा. जुन्या काळात पत्रकारिता करताना अनेक आव्हानांना पत्रकारधुरिणांना सामोरे जावे लागले होते. त्यांनी आपली आव्हाने ओळखून वाटचाल केली होती. विकसित तंत्रज्ञानाच्या आधुनिक काळात पत्रकारांनी ही आव्हाने ओळखून वाटचाल करायला हवी.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १४ जानेवारी २०२२)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचा १४ जानेवारीचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply