भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासाठी दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा

मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज (रविवार, ६ फेब्रुवारी) सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाबद्दल दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावरच फडकविला जाईल. भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस इत्यादी मान्यवरांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.

मध्य प्रदेशातील इंदूर शहरात २८ सप्टेंबर १९२९ रोजी लता मंगेशकर यांचा जन्म झाला. त्यांचे जन्मनाव हेमा होते. मात्र वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या एका नाटकात लतादीदींनी लतिका नावाचे पात्र साकारले. तेव्हापासून सगळेच त्यांना लता म्हणून हाक मारायचे. नंतर तेच नाव प्रचलित झाले. त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर स्वतः उत्तम गायक, नाट्य-कलावंत आणि संगीत नाटकांचे निर्माते होते. लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या पाच भावंडांमध्ये त्या सर्वांत मोठ्या होत्या. त्यांच्या भावंडांनीही आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत संगीत आणि गायन क्षेत्रात नावलौकिक मिळवला. वयाच्या तेराव्या वर्षापासून स्वरांची आराधना करणाऱ्या लतादीदींनी विविध भाषांमधील ३० हजारांहून अधिक गाणी आपल्या सुरांनी अजरामर केली आहेत. वयाच्या ९२व्या वर्षीही करोनावर त्यांनी मात केली; मात्र त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आणि आज हा दैवी सूर शांत झाला. गेल्या ८ जानेवारीपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते.

लतादीदींच्या निधनाची सर्वप्रथम माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. गडकरी आज सकाळी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात आले आणि त्यांनी रुग्णालय प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर रुग्णालयाबाहेर येऊन त्यांनी लतादीदींच्या निधनाची माहिती दिली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “लता मंगेशकर यांच्या जाण्याने देशाची हानी झाली आहे. पिढ्यान् पिढ्या त्यांची गाणी लोक ऐकतील. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही प्रार्थना करतो. त्यांचं जाणं धक्का आहे. त्याला सहन करण्याची आपल्याला शक्ती मिळो.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हटले आहे, “लतादीदींचं जाणं शब्दातीत आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न येणारी आहे. भारतीय संस्कृतीच्या पाईक म्हणून येणाऱ्या पिढ्या त्यांना स्मरणात ठेवतील. चाहत्यांच्या मनावर गारूड घालणारा त्यांचा मंत्रमुग्ध आवाज स्तिमित करतो. लतादीदींची गाणी आपल्या मनात विविध भावनांची रुंजी घालतात. भारतीय चित्रपटांचं स्थित्यंतर त्यांनी अनुभवलं. चित्रपटांच्या पलीकडे, भारताच्या विकासासाठी त्या सदोदित आग्रही असत. विकसित आणि सक्षम भारत त्यांना पाहायचा होता. लतादीदींचा वैयक्तिक स्नेह मला मिळाला हे मी माझं भाग्य समजतो. त्यांच्याशी झालेलं बोलणं मी कधीच विसरू शकणार नाही. लतादीदींच्या जाण्याने देशवासीयांना झालेल्या दु:खात मी सहभागी आहे. त्यांच्या कुटुंबीयांशी बोललो आणि शोकभावना व्यक्त केल्या.”

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे. भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यात नाही, ही कल्पनाच करवत नाही. ईश्वराने भारताला दिलेली अमूल्य देणगी हिरावून घेतली आहे. आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक हरपला आहे. ‘ऐ मेरे वतन के लोगो’तून प्रत्येकाच्या अश्रूंना वाट मोकळी करून देण्याचे सामर्थ्य जसे त्यांच्या सुरांमध्ये होते, तसेच अनेकांच्या आयुष्यातील स्वप्नांना आणखी उंच भरारी घेण्यासाठी बळ देण्याचे काम त्यांच्या सुरांनी केले. वृद्ध असो की तरुण, लतादीदींच्या सुरात रममाण न होणारा विरळाच! स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निस्सीम भक्ती आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी जपली. वीर सावरकरांच्या विचारांची तन-मन-धनाने सेवा करण्याचे काम लतादीदींनी केले. प्रखर राष्ट्रवाद जपणारे हे संपूर्ण मंगेशकर कुटुंब लतादीदींनी कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून जपले. त्यांची विविध कार्यक्रमांमध्ये अनेकदा भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस असायची. भेट झाली नाही, तर फोन करून ‘कसा आहेस देवेंद्र’ हे शब्द मोठ्या बहिणीची उणिव भरून काढणारे असायचे. त्यांचे जाणे, ही माझीसुद्धा वैयक्तिक आणि मोठी हानी आहे. लतादीदींचे स्वर कायम आपल्यासोबत राहणार आहेत, हेच सांगत स्वत:ची समजुत करून घ्यायची, एवढेच आता आपल्या हाती आहे. त्या स्वर्गातूनही सुरांची बरसात नक्कीच करतील. भारतरत्न लतादीदींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! मंगेशकर कुटुंबीय, संपूर्ण भारतवासीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“लतादीदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपलं. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला. स्वरसम्राज्ञी लतादीदी आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार
‘अजीब दास्ताँ है ये…. कहाँ शुरु कहाँ खतम्, ये मंजिलें हैं कौनसी… ? ना वो समझ सके, ना हम…’ सारख्या हजारो सूरमधुर गाण्यांनी कोट्यवधी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे भारतीयांनाच नव्हे, तर जागतिक संगीत विश्वाला पडलेलं अद्भुत स्वप्न होतं. लतादीदींच्या निधनानं ते स्वप्न आज भंगलं आहे. संगीतविश्वातला स्वर्गीय सूर हरपला आहे. लतादीदींच्या सुरेल सूरांनी रसिकांचं भावविश्व आणि देशाचं कलाक्षेत्र समृद्ध केलं. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातला, देशातला प्रत्येक जण, प्रत्येक घर आज शोकाकुल आहे. स्वर्गीय आनंद देणारी लतादीदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादीदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादीदी जगात एकमेव होत्या. त्यांच्यासारखी गानकोकिळा पुन्हा होणे नाही… अशा लतादिदी आता पुन्हा होणे नाही.. लतादिदी अमर आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ कधीच येणार नाही, हा भाबडा समज आज खोटा ठरला आहे. महाराष्ट्राच्या मातीला संगीतकलेचा गौरवशाली वारसा आहे. महाराष्ट्राच्या मातीत अनेक दिग्गज गायक, संगीतकार जन्मले. परंतु पंडित दीनानाथ मंगेशकरांच्या पोटी जन्मलेल्या लतादीदींनी भारतीय संगीत क्षेत्रात चमत्कार घडवला. सुरांच्या दुनियेत लीलया संचार करणाऱ्या लतादीदींनी आठ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस गाणी दिली. संगीतक्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळवलं. ‘आद्वितीय’ अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली. भारतीय, जागतिक संगीतक्षेत्र समृद्ध केलं. देव आणि स्वर्ग आहेत की नाही ते माहीत नाही, परंतु लतादीदींमध्ये अनेकांनी देव पाहिला. त्यांच्या सुरांनी रसिकांना स्वर्गीय आनंदाची अनुभूती दिली. लतादीदींनी सामाजिक बांधिलकीही जाणीवपूर्वक जपली. १९६२ च्या चीनविरुद्धच्या युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ त्यांनी गायलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगो…’ गाण्यानं तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. पंडित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णसेवेच्या क्षेत्रातलं त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील. विश्वरत्न, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण लतादीदी महाराष्ट्रकन्या होत्या. त्यांचं निधन ही महाराष्ट्राची, देशाची फार मोठी हानी आहे. लतादीदींचं नसणं कायम सलत राहील, मात्र त्यांची गाणी आपल्याला सदैव त्यांची आठवण देत राहतील. मी लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दु:खद प्रसंगात मी आणि संपूर्ण महाराष्ट्र मंगेशकर कुटुंबीयांसोबत आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या दु:खात सहभागी आहोत.

लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर २०१६ मध्ये वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी साकारलेले वाळूशिल्प

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
भारतरत्न लता मंगेशकर यांनी भारतीय संगीत समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविले. लतादीदींचे निधन ही देशातील प्रत्येक कुटुंबाकरिता दुःखद बातमी आहे.  हा दिवस अटळ आहे, हे माहिती असूनदेखील हा दिवस येऊच नये असे वाटत होते. 
 भारतरत्न लता मंगेशकर यांचे संगीत देश, भाषा व काळ यांच्या सीमा उल्लंघून थेट अंतरात्म्याला जागवणारे होते. 
 आपल्या भावगीतांनी ईश्वराला जागविण्याची, प्रेमगीतांनी तरुणाईला खुलवण्याची, देशभक्तिपर गीतांनी जवानांना स्फुरण देण्याची तर प्रेमळ अंगाईगीतांनी तान्हुल्यांना निजविण्याची अद्भुत जादू त्यांच्या स्वरात होती. 

अभिजात भारतीय संगीत सुलभ करून लतादीदींनी ते समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविले. आपल्या दैवी स्वरांनी त्यांनी असंख्य जनसामान्य, शेतकरी तसेच  कष्टकरी लोकांना सकारात्मक जीवन जगण्याची नित्यनवी उमेद, ऊर्जा आणि उत्साह दिला. 

लतादीदी या तब्बल आठ दशके भारतीय चित्रपटसृष्टीची ओळख होत्या.  चित्रपट आणि संगीत सृष्टीच्या सुवर्ण काळातील साक्षात हिरकणी होत्या.  भारतरत्न लतादीदी महाराष्ट्राच्या कन्या होत्या, याचा संपूर्ण महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. त्या आपल्या जीवनकाळात झाल्या हे आपले सद्भाग्य होते.  लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत विश्वातील देव्हारा रिकामा झाला आहे. त्यांचा दैवी स्वरदीप मात्र मनामनात तेवतच राहील.   या दुःखद प्रसंगी संपूर्ण राज्याच्या वतीने लतादीदींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या शोकसंवेदना आशाताई, उषाताई, मीनाताई, पं. हृदयनाथ तसेच संपूर्ण मंगेशकर कुटुंबीयांना कळवतो.  लतादीदींच्या देशविदेशातील करोडो चाहत्यांनादेखील आपल्या शोकसंवेदना कळवतो.

लता दीदींच्या निधनाची माहिती देताना ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगितले की, कोव्हिडंचं निदान झाल्याने लता दीदी गेल्या २८ दिवसांपासून आजारी होत्या. अनेक अवयवांचं कार्य बंद पडल्याने आज सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी त्यांचं निधन झालं.

आठ जानेवारीपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. याअगोदर तब्येत बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. यापूर्वी २७ जानेवारी रोजी लता मंगेशकर यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यामुळे व्हेंटिलेटरही काढण्यात आले होते. मात्र नंतर त्यांच्या तब्येत खालावली आणि पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

आपल्या मोठ्या बहिणीची तब्येत खालावलेली बघताच आशा भोसले यांनी रुग्णालयात धाव घेतली होती. यानंतर पत्रकारांशी बोलताना लतीदीदींची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र आज सकाळी लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

लतादीदींचं पार्थिव दुपारी साडेबाराच्या दरम्यान ब्रीच कँडी रुग्णालयातून ‘प्रभू कुंज’ या त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे. तेथून संध्याकाळी ४ ते ६ वाजण्याच्या दरम्यान दादर येथील शिवाजी पार्क येथे शाससकीय इतमामानत अंत्यसंस्कार केले जातील.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply