‘टपरीवरसुद्धा वाइनविक्रीची परवानगी हवी; पण शेतकरीहितासाठी सध्याचे नियम जाचक’

कोळथरे (दापोली) : किराणा दुकाने आणि सुपरमार्केट्समध्ये वाइन विक्रीला ठेवण्याचा निर्णय अलीकडेच राज्य मंत्रिमंडळाने घेतला. त्यावरून बरीच उलटसुलट चर्चा सध्या सुरू आहे. या निर्णयावर बरीच टीका होत आहे. हा निर्णय शेतकऱ्यांचे हित पाहणारा असल्याचा दावा सरकारकडून आणि या निर्णयाच्या समर्थकांकडून केला जात आहे; मात्र वाइन उत्पादनाचे नियम आणि निकष केवळ बड्या उद्योजकांना अनुकूल ठरतील असेच आहेत. केवळ द्राक्षांपासूनच नव्हे, तर अनेक फळांपासून वाइन करता येते. वाइननिर्मितीची ही प्रक्रिया कोणताही छोटा शेतकरी किंवा उत्पादक घरच्या घरी करू शकतो; मात्र सरकारचे सध्याचे नियम त्याला तशी परवानगी देत नाहीत, असा दावा झीरो बजेट वाइननिर्मितीचे अनेक यशस्वी प्रयोग केलेले दापोलीतील उद्योजक माधव महाजन यांनी केला आहे. वाइन म्हणजे दारू नव्हे, तर ते पोषणमूल्य असलेले पेय असल्याने अगदी चहा टपरीवरसुद्धा वाइनविक्रीची परवानगी मिळायला हवी, असेही त्यांचे म्हणणे आहे. (मुलाखतीचा संपूर्ण व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)

वाइनबद्दलचा मंत्रिमंडळाचा निर्णय, त्यावरची टीका वगैरे सगळे होण्यापूर्वी सुमारे दीड महिना आधी कोळथरे (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथील आगोम औषधालयाचे माधव श्रीकृष्ण महाजन यांच्याशी ‘कोकण मीडिया’ने संवाद साधला होता. कोकम, आंबा, फणस वगैरे अस्सल कोकणी फळांवर प्रक्रिया करून नानाविध प्रकारची औषधे आणि खाद्यपदार्थ बनवण्यासाठी आगोम औषधालय उद्योग ओळखला जातो. माधव महाजन यांनी पेरू, करवंदे, फणस, जांभूळ इत्यादींसह सोळा फळांपासून वाइन बनविण्याचे यशस्वी प्रयोग केले. नारळाच्या पाण्याचीही वाइन तयार केली. महाजन यांनी या पेयांची निर्मिती करण्यासाठी एक ते सव्वा लाख रुपये ओतले. घरच्या घरी करण्यासारखी प्रक्रिया विकसित केली; मात्र याच्या उत्पादनासाठी परवानगी मिळविण्यासाठी असलेल्या जाचक अटींमुळे प्रत्यक्ष उत्पादन करणे शक्य झालेले नाही. ते वाइन निर्मितीसाठी शासकीय परवानगी घेण्याच्या प्रयत्नात आहेत. परवान्यासाठी असलेले कठोर निकष आणि केवळ प्रचंड प्रमाणात उत्पादन करण्यासाठीच परवाना देण्याच्या धोरणामुळे लहान उद्योजकांना येणाऱ्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत, अशी त्यांची मागणी आहे.

ते म्हणाले, ‘एकीकडे फळांपासून दर्जेदार वाइन बनविण्याच्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासंबंधी शरद पवार बोलतात; मात्र त्यासाठी घ्यावयाच्या परवानगीकरिता सरकार अत्यंत कठोर निकष ठेवते, हा विरोधाभास आहे. वाइन बनविण्याचा लहान उद्योग थाटायचा असेल तरीही प्रचंड प्रमाणावर उत्पादन करण्याचा परवाना घेण्याच्या अटींची पूर्तता करावी लागते. हे म्हणजे फाइव्ह स्टार हॉटेल काढायचे आणि दहा कप चहा विकायचा असे आहे. त्यामुळे प्रमाणीकरणाचा (स्टँडर्डायझेशन) बाऊ करू नये. अवाढव्य कारखान्यांची उभारणी न करता वाइनचे व्यावसायिक उत्पादन करणं शक्य आहे. वाइन निर्मितीसाठी वीज लागत नाही. पंचवीस हजार लिटर वाइनही विजेशिवाय तयार करता येते, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. FSSAIने ज्याप्रमाणे छोट्या अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी १२ लाख रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्यांचा आणि त्यापेक्षा जास्त उलाढाल असलेल्यांचा असे दोन गट केले आहेत, त्याप्रमाणे वाइनसाठीही करणे शक्य आहे.’

‘रेडी टू सर्व्ह सरबतात फ्रूट कंटेंट जास्तीत जास्त १६ टक्के असतो; वाइनमध्ये मात्र तो १०० टक्क्यांपर्यंत असू शकतो. त्यामुळे वाइनमध्ये भरपूर पोषणमूल्ये असतात. अशी वाइन बनवणे हा जन्मसिद्ध हक्कच आहे. कारण वाइन शरीराला पोषक आहे. शरीराचे पोषण करणारे पदार्थ घरीच बनविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या परवानगीची गरज नसते. आपल्याला आवश्यक खाद्यपदार्थ तयार करणे हा मनुष्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्याच न्यायाने पोषक अशी वाइन घरच्या घरी वापरायची असेल, तर ती बनविण्यासाठी परवानगीची गरज असू नये. तसेच, वाइनच्या व्यावसायिक उत्पादनाचे नियम छोट्या उत्पादकांना लक्षात घेऊन केले पाहिजेत,’ असेही महाजन म्हणाले.

‘वाइन म्हणजे दारू नव्हे. ते पोषणमूल्य असलेले पेय असल्याने अगदी टपरीवर चहा विकला जातो, तशी वाइन विकायला परवानगी दिली गेली पाहिजे. वाइनमध्ये स्वतःहून तयार झालेले (सेल्फ जनरेटेड) आणि आंबवण्याच्या प्रक्रियेने (फर्मेंटेशन) तयार झालेले अल्कोहोल असते. वाइनमधील अल्कोहोलचे प्रमाण जास्तीत जास्त १० ते १२ टक्के असते. वाइन पिऊन माणूस झिंगला असे क्वचितच होते. साधारणपणे एका वेळी १८० मिलिलीटर वाइन पिण्याने मनुष्याला झिंग चढत नाही, तर त्यातून शरीराला पोषक द्रव्ये मिळतात. ज्या पेयातील अल्कोहोल डिस्टिलेशन प्रक्रियेने तयार झालेले असते, ते पेय म्हणजे दारू. त्यातील अल्कोहोलचे प्रमाण ४० ते ९५ टक्क्यांपर्यंतही असू शकते. ते शरीराला निश्चितच घातक असते,’ असे महाजन यांचे म्हणणे आहे.

आपण केलेल्या प्रयोगांची माहिती देताना ‘अल्कोहोल असलेले द्राक्षासव चालते, तर तेवढेच अल्कोहोल असलेली वाइन का चालत नाही?’ असा बिनतोड सवाल त्यांनी केला. वाइन प्याल्याने अशक्त मनुष्याच्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत असल्याचेही महाजन म्हणाले.

‘अजिबात पोषणमूल्य नसलेला चहा पिण्यापेक्षा वाइन पिणे प्रकृतीसाठी चांगले. या उत्पादनास परवानगी मिळाली तर शेतकऱ्यांच्या पिकांना अधिक चांगला दर मिळेल. फळांना इतका दर कुठल्याच प्रक्रियेत मिळणार नाही. कॅनिंगपेक्षाही वाइनसाठी फळांना जास्त दर मिळेल. कोकणात डोंगरात फिरून करवंदे गोळा करून कुठेतरी दोनशे किलोमीटर दूरवर नेऊन विकायची, त्यापेक्षा तीच इथे वाइनसाठी वापरायला काय हरकत आहे? शासनाला प्रजेची काळजी असेल तर बारा टक्क्यांच्या वर अल्कोहोल असलेले कुठलेही पेय बाजारात येता कामा नये,’ असेही महाजन यांनी सांगितले.

वाइन उत्पादन हे शेतकरी, उत्पादक, विक्रेता आणि ग्राहक या सगळ्यांसाठीच फायदेशीर पेय आहे; मात्र या सगळ्या बाबी घेऊन नियम निश्चित झाले, तर त्याचे फायदे प्रत्यक्षात दिसू शकतील, असे महाजन यांचे म्हणणे आहे.

(प्रमोद कोनकर आणि राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी घेतलेल्या माधव महाजन यांच्या सविस्तर मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply