पद्मश्रींनी जोपासलेल्या कळसूत्रीच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा जागर

रत्नागिरी जिल्ह्यातील लोककलांचाही प्रचारासाठी उपयोग

सिंधुदुर्गनगरी/रत्नागिरी : गेल्या दोन वर्षांत राज्यात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लोककलांचा उपयोग करून आजपासून जागर सुरू झाला आहे.

माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय तसेच जिल्हा माहिती कार्यालयातर्फे राज्यात प्रथमच रेल्वेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून ‘आपला महाराष्ट्र आपले सरकार’ ही मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर आजपासून शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून जागर करण्यास प्रारंभ करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कळसूत्री बाहुल्यांची पारंपरिक लोककला पिंगुळी (ता. कुडाळ) येथील परशुराम गंगावणे यांनी जोपासली आहे. त्याची दखल घेऊन त्यांना अलीकडेच पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याच लोककलेचा उपयोग शासनाच्या योजनांचा प्रसार करण्यासाठी करण्यात आला आहे. वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथून त्याला प्रारंभ झाला. लोकांसाठी असलेल्या योजना सोप्या आणि लोकांच्या भाषेत सांगितल्या की, त्या लोकांपर्यंत लवकर पोहोचतात, हे लक्षात घेऊन लोककलांचा उपयोग करण्यात आला आहे. पद्मश्री प्राप्त परशुराम गंगावणे आणि चेतन गंगावणे यांच्या विश्राम ठाकर अदिवासी कला अंगण ट्रस्टच्या माध्यमातून नाधवडे येथे कळसूत्री बाहुल्यांचा खेळ सादर करण्यात आला. शाहीर कल्पना माळी आणि चैतन्य महिला विकास मंडळाच्या माध्यमातून निवडक मोठ्या गावांमधून गर्दीच्या ठिकाणी विशेषतः बाजाराच्या ठिकाणीही लोककलेच्या या कार्यक्रमांना आज प्रारंभ झाला.

तौते चक्रीवादळातील नुकसानभरपाई, मच्छीमारांची डिझेल परतावा योजना, फळझाड लागवड योजना, महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना, पीक कर्ज योजना, शिवभोजन थाळी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भाजीपाला रोपवाटिका योजना, एक शेतकरी – एक अर्ज महाडीबीटी पोर्टल अशा विविध योजनांच्या माहितीचा यात समावेश आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातही आज या प्रचारमोहिमेचा प्रारंभ झाला. भाकर संस्था (लांजा), आधार सेवा ट्रस्ट (रत्नागिरी) आणि शाहीर रत्नाकर महाकाळ लोककला मंच (खेड) या पथकांच्या कार्यक्रमाने या मोहिमेचा प्रारंभ झाला. खेड तहसीलदार कार्यालय, खेड पंचायत समिती कार्यालय, खेडचा तीन बत्ती नाका, वावे तर्फे नातू, राजापूर तालुक्यातील नाटे आणि धाऊलवल्ली तसेच रत्नागिरी तालुक्यातील पाली बाजारपेठ आणि नाणीज येथे लोककलेचे कार्यक्रम सादर करण्यात आले. करोनामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना आणि पाल्यांना मदत, जलजीवन मिशन, ग्राहक संरक्षण कायदा, संजय गांधी निराधार योजना अशा विविध योजनांच्या माहितीचा यात समावेश होता.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply