theater interior

नाट्यसंस्था आणि कलाकारांना संधी

सध्याचा हंगाम जत्रा, यात्रा आणि महोत्सवांचा आहे. करोनाचा कालखंड मागे पडल्यामुळे सर्वसामान्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहेत. त्यामुळे या महोत्सवांना दीड-दोन वर्षांच्या कालावधीनंतर आता पुन्हा एकदा गर्दी होऊ लागली आहे. मंदिरांमधील धार्मिक कार्यक्रम आणि यात्रांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमही लोकांचे लक्ष वेधून घेऊ लागले आहेत. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दर वर्षी घेतल्या जाणाऱ्या हौशी राज्य नाट्य स्पर्धांचा हीरक महोत्सव या वर्षी साजरा होत आहे. त्यामध्ये गद्य नाटकांचा महोत्सव पडला आहे. रत्नागिरीला असलेली संगीत नाटकांची परंपरा आणि स्पर्धेविषयीचा उत्साह लक्षात घेऊन राज्य स्तरावरच्या प्राथमिक फेरीतल्या नाटकांसाठी रत्नागिरी हे एकच केंद्र राज्यभरातून मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार आता संगीत नाट्य महोत्सव सुरू आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचे हरवलेले दिवस पुन्हा एकदा रसिकांच्या उत्साहामुळेही फुलू लागले आहेत.

हे महोत्सव साजरे होत असले तरी त्यामध्ये अनेक अडचणींना संस्था आणि त्यामधील कलाकारांना सामोरे जावे लागत आहे. राज्य नाट्य स्पर्धेच्या गद्य विभागात या वर्षी अगदी मोजक्याच संस्थांनी नाट्यप्रयोग सादर केले. स्पर्धा होते की नाही, अशी शंका सुरुवातीला होती. त्यानंतर स्पर्धा पुढे ढकलली गेली. त्यामुळे त्याविषयीचा उत्साह काहीसा कमी झाला. पण त्यापेक्षाही या अनिश्चिततेमुळे या स्पर्धेत सहभागी व्हायचे की नाही याबाबत नाट्यसंस्थांमध्ये संभ्रम होता. स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी नाटकांच्या तालमी कराव्या लागतात. त्यांची जुळवाजुळव करणे फारच कठीण होते. त्यापैकी सर्वांत महत्त्वाची अडचण असते ती रंगीत तालमींना आवश्यक असलेल्या जागेची. स्पर्धेत सहभागी होणारे सर्व कलाकार आपला रोजगार आणि व्यवसाय सांभाळूनच तालमी करत असतात. नेमके कोठे जमावे आणि नाटकाची तयारी कशी करावी, हा प्रश्न असतो. रत्नागिरीपुरता तरी हा प्रश्न उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोडविला आहे.

नागपूर येथील संस्कृत विश्वविद्यालयाचे उपकेंद्र रत्नागिरीत सुरू झाले आहे. या उपकेंद्राला भारतरत्न डॉक्टर पां. वा. काणे यांचे नाव देण्यात आले आहे. नामकरणाचा हा समारंभ श्री. सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमातच त्यांनी जाहीर केले की, या उपकेंद्रातील जागेचा उपयोग कलाकारांना झाला पाहिजे. त्यातही स्थानिक कलाकारांना अधिक वाव देण्यासाठी उपकेंद्राने प्रयत्न करायला हवेत. उपकेंद्र आणखी सुसज्ज करण्याकरिता आवश्यक असलेला निधीही राज्य शासनातर्फे पुरविला जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. या केंद्राच्या ताब्यातील सभागृहाच्या नूतनीकरणासाठी ८० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असून हे मिनी नाट्यगृह अल्पदरामध्ये रंगकर्मींना नाटकाच्या तालमीसाठी आणि छोट्या कार्यक्रमांसाठी देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. उपकेंद्रात कर्मचारी भरती करताना ९९ टक्के स्थानिकांना संधी देण्याची सूचनाही त्यांनी केली. उदय सामंत यांच्या या सूचनांचे पालन होईलच, पण ज्या नाट्य संस्थांना तालमींसाठी जागेची उणीव भासत होती, त्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. रत्नागिरीत विविध १३ नाट्यसंस्था आहेत. त्या क्रियाशील आहेत. त्यांना एक हक्काचे ठिकाण या केंद्राच्या निमित्ताने उपलब्ध झाले आहे. त्याचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. पुढच्या वर्षीच्या नाट्य स्पर्धांमध्ये संस्थांच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब उमटणे म्हणजेच सहभागी होणाऱ्या नाट्यसंस्थांच्या संख्येत चांगलीच वाढ होणे अपेक्षित आहे. त्यामुळे हंगामी स्वरूपात सुरू असलेले संगीत राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र कायम व्हायलाही मदत होणार आहे.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ११ मार्च २०२२)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply