रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारत विस्तारीकरण बांधकामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आभासी पद्धतीने, तर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत आज झाले. सिंधुरत्न योजनेतून रत्नागिरी जिल्ह्याला विशेष निधी मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यांच्या विकासासाठी ३०० कोटी रुपयांची सिंधुरत्न योजना सुरू करण्यात येणार असून या माध्यमातून तीन वर्षे रत्नागिरी जिल्ह्याला दरवर्षी ५० कोटी रुपये विशेष निधी मिळणार आहे. या माध्यमातून कोकणातील नैसर्गिक साधनांचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये पर्यटन, मत्स्य संवर्धन, स्थानिकांना रोजगार आणि वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येणार आहेत. रत्नागिरी तसेच कोकणच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास श्री. पवार यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की, समक्ष येऊन भूमिपूजन करण्यास आवडले असते. मात्र विधिमंडळ अधिवेशनामुळे येता आले नाही. जिल्हा परिषदेच्या या विस्तारित इमारतीचा आराखडा चांगला केला आहे. ग्रीन बिल्डिंग, सौरऊर्जा आदींचा यात समावेश आहे. प्रत्येक शासकीय वस्तू देखणी, आकर्षक, शहराचे सौंदर्य वाढविणारी असेल, याची काळजी आम्ही घेत असतो. इमारतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम करताना उत्साह वाटला पाहिजे, कामासाठी येणारे लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांनाही इमारतीत आल्यावर चांगले वाटले पाहिजे, त्यासाठी ही इमारत हवेशीर, चांगला उजेड असणारी असावी. जिल्हा परिषदेची ही इमारत वेळेत पूर्ण झाली पाहिजे व त्याचा दर्जा चांगला असला पाहिजे. ही इमारत शहराच्या सौंदर्यात भर घालणारी असली पाहिजे, याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे. रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांची मुदत संपली आहे. तेथे प्रशासक आले आहेत. जिल्हा परिषदेचीही मुदत संपल्यानंतर प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी काम पाहणार आहेत. त्यांनी चांगले काम केले पाहिजे. शासनात प्रशासनात काम करत असताना लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी असे काम केले पाहिजे की, लोकांनी त्यांचे नाव काढले पाहिजे, असेही श्री. पवार म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार म्हणून कोकणला भरभरून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. या अर्थसंकल्पातदेखील कोकणला झुकते माप देण्याचा प्रयत्न केला आहे. रत्नागिरीतील मिऱ्या किनाऱ्यावर धूपप्रतिबंधक बंधारा, विमानतळासाठी निधी, जिल्हा परिषदेच्या विस्तारीत इमारतीसाठी निधी, पोलिसांसाठी, कृषी योजनांसाठी लागेल तेवढा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यातील बहुतेक आश्वासने पूर्ण केली आहेत. येणाऱ्या काळात कोकणच्या विकासासाठी महत्त्वाचा निर्णय घेणार आहोत. रत्नागिरी ते गणपतीपुळे या सागरी मार्गावर जेटबोट, रत्नागिरी विमानतळ इमारत व भूसंपादनासाठी १०० कोटी दिले जातील. कोकणातील सर्वोकृष्ट क्रीडा संकुल रत्नागिरीत बांधण्याचा प्रयत्न आहे. तसेच संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी दीड कोटी निधी प्रस्तावित आहे. यासह विविध उपक्रमासाठीही निधी देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

रत्नागिरीचे पालकमंत्री श्री. परब म्हणाले की, पालकमंत्री म्हणून या इमारतीच्या कामांमध्ये कुठेही अडचण येणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. ही जिल्हा परिषदेची इमारत राज्यात आदर्शवत इमारत ठरेल. तिला जिल्ह्यात मानाचे स्थान असेल.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या शासकीय इमारतीचे काम चांगले होईल यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. ग्रामविकास विभागामार्फत आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. सामान्य जनतेचे काम या इमारतीमधून उत्तम प्रकारे होईल असा विश्वास आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यातील विकासात्मक चांगल्या कामांसाठी आपण पाठीशी आहोत. ही इमारत पूर्ण करून आदर्शवत होणे ही सर्वांची जबाबदारी आहे. पर्यटनाच्या विकासातून जिल्ह्याचा अधिक विकास साधून चांगल्या प्रकारचे रोजगार निर्माण होतील. राज्यासाठी जिल्हा परिषदेची ही इमारत आदर्श असेल. जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीची डागडुजी, पोलीस विभाग इमारत, जिल्हाधिकारी प्रशासकीय इमारतीसाठीही निधी देण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी प्रास्ताविकामध्ये जिल्हा परिषदेच्या इमारत विस्तारीकरणाची गरज, त्यासाठी केलेला पाठपुरावा, सर्वांकडून झालेली मदत, होणारी इमारत याबाबतची माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड यांनी आभार मानले.

यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार बाळाराम पाटील, अनिकेत तटकरे, योगेश कदम दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य व बांधकाम सभापती उदय बने, राजन साळवी, अर्थ व शिक्षण सभापती चंद्रकांत मंचेकर, समाजकल्याण सभापती परशुराम कदम, महिला व बालकल्याण समिती सभापती भारती सरवणकर, कृषी, पशुसंवर्धन समिती सभापती रेश्मा झगडे आदी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply