मत्स्यगंधा – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी केंद्र

आजचे नाटक (१४ मार्च २०२२) – मत्स्यगंधा
सादरकर्ती संस्था – क्षितिज इव्हेंट्स, सावंतवाडी

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रत्नागिरीत साठावी संगीत राज्य नाट्य स्पर्धा १० मार्च ते २७ मार्च दरम्यान होणार आहे. हौशी रंगभूमीवरील संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या नाट्य कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरते. या वर्षी स्पर्धेत महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या एकूण सोळा संघांनी भाग घेतला आहे. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात दररोज सायंकाळी ७ वाजता स्पर्धेतील नाट्यप्रयोग सुरू होईल. (स्पर्धेचे प्रयोगपंचांग शेवटी दिले आहे.)

आज १४ मार्च २०२२ रोजी मत्स्यगंधा हे नाटक क्षितिज इव्हेंट्स, सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) या संस्थेने सादर केले. गेल्या सुमारे एक तपाहून अधिक काळ सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील क्षितिज इव्हेंट ही संस्था सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेने आतापर्यंत बालगंधर्व ते भैरवी, म्हणे सोहिरा, दीनांची माउली, सुंदर ते ध्यान, मर्मबंधातली ठेव असे अनेक सांगीतिक कार्यक्रम केले आहेत. विद्याहरण, ययाति आणि देवयानी ही संगीत नाटके, तर संत परंपरेवर आधारित रंगी रंगला श्रीरंग हे महानाट्य सादर केले आहे.

महाभारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाची घटना मत्स्यगंधा या नाटकात मांडण्यात आली आहे. प्रा. वसंत कानेटकर यांचे हे नाटक सर्वप्रथम १ मे १९६४ रोजी रंगभूमीवर आले.

महाभारतातील हे कथानक देवव्रत अर्थात भीष्माचार्य आणि त्यांच्या वडिलांची अर्थात राजा शंतनूची पत्नी सत्यवती अर्थात मत्स्यगंधा यांच्या जीवनावर आधारित आहे पराशर मुनींवर प्रेम करणारी सत्यवती प्रेमभंगामुळे निष्ठुर होते. तिच्या निष्ठुर सूडबुद्धीचे अतिशय घातक परिणाम तिच्यासह देवव्रताला आणि खुद्द सत्यवतीसह अनेकांना भोगावे लागतात. राजा शंतनूने सत्यवतीला विवाहाची गळ घातली आणि सत्यवतीच्या बापाने, धीवर राजाने सत्यवतीचाच पुत्र गादीवर बसावा अशी अट टाकली आणि ती मान्य होण्यासाठी भीष्माने आजन्म ब्रह्मचर्य पालनाची प्रतिज्ञा केली. तत्पूर्वी सत्यवतीला पराशर ऋषीपासून पुत्र झाला होता आणि पराशर त्याला घेऊन गेला होता, अशी मूळ कथा आहे. नाटकात कानेटकरांनी धीवर राजाऐवजी थेट स्वतः सत्यवतीच आपला पुत्र हस्तीनापूरच्या गादीवर बसावा ही अट शंतनूला घालते, असे दाखवून एका वेगळ्या नाट्याला जन्म दिला आहे. या नाट्याच्या मुळाशी एका स्त्रीच्या स्वप्नभंगाची व्यथा नाट्यमयतेने गुंफलेली आहे. सत्यवतीने पराशराशी स्वेच्छेने रत झाल्यावर त्याच्याशीच संसार करण्याचे स्वप्न पाहिले, पण संन्यस्तवृत्तीच्या पराशराने संसाराच्या मोहापासून परावृत्त होत हिमालयाची वाट धरली. सत्यवतीच्या कोवळ्या प्रेमभावना भस्मसात झाल्यावर त्यातून एका वेगळ्याच महत्त्वाकांक्षी आणि निष्ठूर स्त्रीचा जन्म झाला आहे. तिच्या मनात पुरुषाच्या भोगलालसेविषयी आणि त्यातल्या अप्पलपोटेपणाविषयी घृणा निर्माण होते. ती शंतनूच्या मागणीकडे एक सौदा म्हणून बघू लागते. त्यातूनच तिची अट जन्म घेते आणि त्या अटीपाठोपाठ तिची शोकांतिका आकार घेते. विवाहापूर्वीच पराशरापासून झालेला पुत्र म्हणजेच व्यास तिच्या भेटीला येतो आणि नाटकाचा पडदा पडतो.

या नाटकात साद देती हिमशिखरे, गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी, गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी, तव भास अंतर झाला मन रमता मोहना, नको विसरू संकेत मीलनाचा, अर्थशून्य भासे मज हा, जन्म दिला मज ज्यांनी, देवाघरचे ज्ञात कुणाला अशी एकाहून एक सरस गीते आहेत.

श्रेयनामावली :
लेखक – प्रा. वसंत कानेटकर
मूळ संगीत – स्व. पं. जितेंद्र अभिषेकी

कार्यकारी निर्माता / दिग्दर्शक/ नेपथ्य – दत्तात्रय गणपती ऊर्फ बाळ पुराणिक

सत्यवती – सौ. दिव्या हृषिकेश पळसुलेदेसाई
भीष्म – दत्तात्रय गणपती ऊर्फ बाळ पुराणिक
(तिसऱ्या प्रवेशात नितीन जोशी, वरवडे, ता. रत्नागिरी)

पराशर – रवींद्र नारायण पणशीकर
शंतनु – दत्तप्रसाद अनंत तेंडोलकर
चंडोल – गणेश नारायण दीक्षित
धीवर – गुरुप्रसाद नारायण चिटणीस
अंबा – पियुषा शशिशेखर प्रभुतेंडोलकर
प्रियदर्शन – केतन उदय सावंत
नेपथ्य – दत्तात्रय गणपती ऊर्फ बाळ पुराणिक, मकरंद दत्तात्रय मुणगेकर
संगीत मार्गदर्शन – स्वप्नील श्रीकृष्ण गोरे
ऑर्गन – प्रसाद गजानन शेवडे
तबला – कु. नीरज मिलिंद भोसले
पार्श्वसंगीत – गणेशप्रसाद बाळकृष्ण गोगटे
प्रकाशयोजना – संतोष विठ्ठल गावकर, शंकर सगुण गावडे
रंगभूषा – विजय रामचंद्र निगुडकर, संजय बापू जोशी
वेशभूषा – सौ. वैभवी दत्तात्रय पुराणिक, मकरंद दत्तात्रय मुणगेकर, कु. जान्हवी चिंतामणी प्रभुतेंडोलकर
रंगमंच व्यवस्था – रावजी केशव पार्सेकर, समीर सूर्यकांत मुळीक, उमेश सहदेव मोघे, राजू शिवराम जाधव, श्रीहरी गोपाळ परब, संदीप गणपत धुरी

शो मस्ट गो ऑन

या नाटकाचा रत्नागिरीच्या स्पर्धेतील प्रयोग सुरू असताना शो मस्ट गो ऑन हा रंगभूमीच्या संदर्भातील वाक्प्रचार प्रत्यक्षात आला. मुख्य कलावंत बाळ पुराणिक यांनाच अचानक रुग्णालयात दाखल करावे लागले आणि तरीही प्रयोग पूर्ण झाला. स्पर्धेच्या परीक्षकांनीही या प्रयोगाला जाहीरपणे उत्स्फूर्त दाद दिली. ‘शो मस्ट गो ऑन’ची अनोखी गोष्ट वाचा पुढील लिंकवर –https://kokanmedia.in/2022/03/15/showmustgoon/

परीक्षक मुकुंद मराठे यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोबतच्या लिंकवर
https://youtu.be/5fFhVKIYAuo

स्पर्धेचे वेळापत्रक

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply