सावंतवाडीतील संस्थेचा मत्स्यगंधा
नाटकाचा प्रयोग रत्नागिरीने सावरला
रत्नागिरी : `शो मस्ट गो ऑन
` हा रंगभूमीच्या संदर्भातील वाक्प्रचार रत्नागिरीत सध्या सुरू असलेल्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रंगभूमीवर प्रत्यक्षात आला. जणु या वाक्प्रचाराचा प्रयोगच रंगभूमीवर सादर झाला. स्पर्धेच्या परीक्षकांनी या प्रयोगाला जाहीरपणे उत्स्फूर्त दाद दिली.
हीरक महोत्सवी संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत राज्य नाट्य स्पर्धा रत्नागिरीत सध्या सुरू आहे. स्पर्धेत महाराष्ट्र आणि गोव्यातील एकंदर १६ संस्था सहभागी झाल्या आहेत. सोमवारी, १४ मार्च रोजी सावंतवाडीतील क्षितिज इव्हेंट्स या संस्थेचे मत्स्यगंधा
नाटक होते. नाटकाचे पहिले दोन प्रवेश उत्तम रीतीने पार पडले. तिसऱ्या प्रयोगाला रंगमंचीय व्यवस्था बदलावी लागणार असल्यामुळे मोठ्या अवधीचे मध्यंतर देण्यात आले होते. मात्र मध्यंतराच्या तो अवधी टळून गेला तरी तिसऱ्या प्रवेशाची तिसरी घंटा काही होईना.
एवढ्यात रसिक प्रेक्षकांना साद घातली गेली. प्रेक्षकांना नाटक पुढे सुरू होण्याची प्रतीक्षा होती, पण त्याची उद्घोषणा होण्याऐवजी प्रेक्षागृहात कोणी डॉक्टर आहे का, अशी विचारणा झाली. तेव्हा पडद्याच्या आतल्या बाजूला कोणीतरी आजारी पडले असावे, असा प्रेक्षकांचा समज झाला. तो खराच होता. क्षितिज इव्हेंट्स नाट्यसंस्थेचे सर्वेसर्वा आणि मत्स्यगंधा नाटकात भीष्माची महत्त्वाची भूमिका साकारणारे बाळ पुराणिक यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने वैद्यकीय सेवा गरजेची होती. त्यासाठी डॉक्टरांचा पुकारा करण्यात आला होता. आपल्या आईवडिलांना भेटायला कोल्हापूरहून आलेल्या डॉक्टर सौ. जोशी त्यावेळी नाट्यगृहात होत्या. त्यांनी श्री. पुराणिक यांच्यावर तातडीचे उपाय केले आणि लगेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.
हे सारे होत असताना नाटकाचे पुढे काय, हा प्रश्न निर्माण झाला. भीष्माची अत्यंत महत्त्वाची भूमिका त्यामध्ये होती. ती साकारली नाही, तर तिसरा प्रवेश होणार नाही आणि नाटक स्पर्धेतून बादही होऊ शकले असते. अशावेळी रत्नागिरीच्या कलाकारांची तळमळ दिसून आली. परिस्थिती लक्षात आल्यानंतर काहीही झाले तरी पुढचा प्रवेश आणि नाटक पूर्ण करायचेच, असा निर्धार रत्नागिरीतल्या कलाकारांनी केला आणि सावंतवाडीच्या कलाकारांना मोठाच दिलासा दिला.
हा दिलासा सर्वार्थांनी मोठा होता. कारण याच स्पर्धेतील दुसऱ्या एका स्पर्धकाच्या संस्थेतील दिग्दर्शकाने सावंतवाडीतील स्पर्धक नाट्य संस्थेला सावरून घेतले. ज्या नाटकाचा प्रयोग तिसरा प्रवेश अडचणीत आला होता, त्याच मत्स्यगंधा
नाटकाचा पुढचा प्रयोग बुधवारी, १६ मार्च रोजी सावरकर नाट्यगृहातच होणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शक वरवडे (ता. रत्नागिरी) येथील कलारंग नाट्यप्रतिष्ठानचे नितीन जोशी यांनी भीष्माची ती भूमिका करायचे ठरवले. जो मोजका वेळ मिळाला होता, तेवढ्यात त्यांनी तिसऱ्या प्रवेशाची संहिता वाचून काढली. याआधीच्या नाटकात त्यांनी पाच-सहा वेळा भीष्माची भूमिका साकारली होती. त्यामुळे त्यांना भूमिका माहीत होती, पण अलीकडे प्रयोग झालेला नसल्यामुळे किंवा त्यांनी ती भूमिका साकारली नसल्यामुळे ते थोडे अवघडही होते. मात्र तिसऱ्या प्रवेशाचा पडदा उघडला आणि कुणालाही भीष्माची भूमिका करणारा कलाकार तिसऱ्या प्रवेशामध्ये बदलला आहे, याची किंचितही जाणीव होणार नाही, इतक्या समर्थपणे श्री. जोशी यांनी ती भूमिका निभावली. प्रवेश आणि नाटकही पूर्ण झाले. रसिकांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
विशेष म्हणजे परीक्षकांनी या साऱ्या प्रसंगाबद्दल जाहीर गौरव केला. परीक्षकांतर्फे मुकुंद मराठे यांनी शो मस्ट गो ऑन
च्या या प्रयोगाचे मनःपूत कौतुक केले. यापूर्वी सौभद्र किंवा मानापमान नाटके वेगवेगळ्या संस्थांतर्फे संयुक्तपणे झाली आहेत. पण यावेळी स्पर्धेत असूनही मत्स्यगंधा या नाटकाचा सावंतवाडी आणि रत्नागिरी अशा दोन संस्थांचा संयुक्त प्रयोग पार पडला. रत्नागिरीतील रसिक आणि कलाकार किती उमद्या स्वभावाचे आहेत, दिलदार आहेत, ते यावरून दिसून आले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. राज्य नाट्य स्पर्धेसाठी रत्नागिरी हेच केंद्र असले पाहिजे, अशी सूचना आपण वारंवार सांस्कृतिक कार्य संचालनालयाला करत होतो. ती यावर्षी मान्य झाली आणि त्याला रसिक आणि कलाकारांनी आज आपल्या कृतीतून उत्तम दाद दिली आहे, असे उद्गार श्री. मराठे यांनी काढले.
श्री. मराठे यांच्या भाषणाचा व्हिडीओ


2 comments