theater interior

कलाकारांची घुसमट

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी गद्य आणि संगीत नाट्य स्पर्धा घेतल्या जातात.  करोनामुळे दोन वर्षे खंडित झालेल्या या स्पर्धा यावर्षी पार पडल्या. या स्पर्धा हीरक महोत्सवी आहेत. गद्य नाट्यस्पर्धा रत्नागिरीच्या केंद्रावर पार पडल्यानंतर संगीतसूर्य केशवराव भोसले राज्यस्तरीय संगीत नाट्य स्पर्धाही रत्नागिरीत सुरू झाली आहे. ती येत्या २७ मार्चपर्यंत चालणार आहे. ही स्पर्धा सुरू असताना १४ मार्च रोजी रंगभूमीवर एक वेगळाच प्रकार घडला. सुदैवाने तो जीवघेणा ठरला नाही, पण नाट्य कलेने प्रेरित झालेल्या कलाकारांची किती घुसमट होते, याचे प्रत्यंतर त्यातून आले. सावंतवाडीतील क्षितिज इव्हेंट्स या संस्थेचे मत्स्यगंधा हे नाटक सुरू होते. पहिले दोन प्रवेश सुरळित पार पडले. तिसरा प्रवेश मात्र सुरू होण्यात अडचण आली. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्या नाट्य संस्थेचे सर्वेसर्वा आणि नाटकातील भीष्माची प्रमुख भूमिका निभावणारे कलावंत बाळ पुराणिक यांना रंगमंचावरच अस्वस्थ वाटू लागले. दुसऱ्या प्रवेशात अखेरच्या भागातच ते जाणवू लागले होते, पण दुसऱ्या प्रवेशाचा पडदा पडल्यानंतर जेव्हा ते विंगेत गेले, तेव्हा त्यांना तो शारीरिक अस्वस्थपणा प्रकर्षाने जाणवू लागला. त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करावे लागले. दुसऱ्या एका स्पर्धक नाट्यसंस्थेच्या कलाकाराने तिसऱ्या प्रवेशातील भीष्माची महत्त्वाची भूमिका पार पाडली आणि नाटकांनी तरून गेले.  पण हे नाट्य कलाकारांच्या उमदेपणामुळे साध्य झाले. श्री. पुराणिक यांची घुसमट मात्र प्रशासकीय गैरव्यवस्थापन किती जीवघेणे ठरू शकते, हेच दाखवून गेली.

रत्नागिरी पालिकेने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह बांधले आहे. नाट्यगृहात अनेक गैरसोयी आहेतच. पण  नाट्यगृहाच्या रंगमंचावर वायूवीजनाची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे रंगमंचावरचे कलाकार अक्षरशः घाम गाळून काम करत असतात. अशा स्थितीमुळेच बाळ पुराणिक घुसमटले. ते अगदी थोडक्यात बचावले.  अन्यथा मोठा अनवस्था प्रसंग ओढवला असता.  रत्नागिरीत  कोट्यवधी रुपये खर्चाच्या विकासकामांची घोषणा दररोज होत आहे. पालिकेच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत आणखी अब्जावधींच्या योजनांची घोषणा होईल. पण असलेल्या सुविधा व्यवस्थित करण्यासाठी त्यामध्ये कोणतीही तरतूद नाही. सावरकर नाट्यगृह हे त्यापैकीच एक दुर्लक्षित ठिकाण आहे. नाट्यगृहाच्या उभारणीसाठी जेवढा खर्च झाला नसेल, तेवढा त्याच्या दुरुस्तीसाठी आतापर्यंत झाला आहे. पण तरीही नाट्यगृह अजूनही सुधारलेले नाही. हे नाट्यगृह ज्यांच्या कारकिर्दीत उभारले गेले, ते स्वर्गवासी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांची आठवण या प्रसंगाच्या वेळी अनेक प्रेक्षकांनी काढली. उमेश शेट्ये असते, तर असा प्रकार घडला नसता, असे त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवले. सध्याची पालिका किती नाकर्ती आहे, याचेच प्रकटीकरण प्रेक्षकांच्या या उद्गारांमधून झाले. कलाकारांबरोबरच प्रेक्षकांची घुसमटही प्रातिनिधिक स्वरूपात प्रकट झाली.

ही झाली रत्नागिरीची स्थिती. पण जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या दुर्दैवाचे दशावतार सुरूच आहेत. जिल्ह्यातील दुसरे सांस्कृतिक केंद्र असलेल्या दापोलीसह कोणत्याच तालुक्याच्या ठिकाणी नाट्यगृहांचा अभावच आहे. नाट्य आणि सांस्कृतिक चळवळ वाढीला लागली पाहिजे, असे घोकत राहणारे राजकारणी  कलेच्या समृद्धीसाठी आवश्यक असलेल्या किमान मूलभूत सोयींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. अभिनेत्यांपेक्षा या नेत्यांना विकासकामांची नाटके वठवायची असतात. जीवघेणी घुसमट सहन करून खरेखुरे कलाकार मात्र आपली कला सादर करत असतात. रसिक प्रेक्षकही निमूटपणे गैरसोयी सहन करत कलाकारांना दाद देत असतात. तेवढेच त्यांच्या हाती असते.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १८ मार्च २०२२)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply