शेकडो ‘आयएएस’घडविणार्‍याचा जन्मदाता

नऊ मार्चच्या सकाळीच फोन वाजला, पाहतो तो संजीव कबीरचं नाव. मी गुड मॉर्निंग म्हटलं, पलीकडून संजीवचा गंभीर आवाज आला, ‘‘बाबा गेले!’’

मोहन गणेश कबीर. सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक. वय सत्तरीच्या घरात. दोन महिन्यांपूर्वी कॅन्सरचं निदान झालेलं. बघता बघता आजार बळावला नि त्यांनी अखेरचा निरोप घेतला.

मोहन गणेश कबीर, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक…… एवढी ओळख पुरेशी नाही, त्यापलीकडे खूप काहीतरी असणारं व्यक्तिमत्त्व होतं ते. ‘एमजी’ कबीर या नावाने त्यांना बरेचजण ओळखत. तेच नाव लावून ते ‘सारस्वत मित्र’ या मासिकाचं गेली बारा वर्षं व्यवस्थापन सांभाळत होते.

संजीव हा माझा वृत्तपत्र क्षेत्रातील सहकारी. मी संपादकीय पृष्ठ आणि बातमीदारीची काही जबाबदारी सांभाळत असे आणि त्याची नुकतीच सुरुवात झाली होती. त्याचं महाविद्यालयीन शिक्षणही सुरू होतं. एक-दोन वर्षांतच मी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात पत्रकारिता विषय शिकवू लागलो, तिथे संजीव आणि त्याचे दोनतीन मित्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसण्यासाठी अभ्यास करत होते. या परीक्षेच्या मार्गदर्शनाची काहीच व्यवस्था तेव्हा रत्नागिरीत नव्हती, म्हणून संजीव दिल्लीला जाऊन राहिला. थोड्याच दिवसांनी सुटीत आला तेव्हा आम्ही सर्वांनी या परीक्षांच्या मार्गदर्शनाचा उपक्रम म्हणून रत्नागिरी, चिपळूण आणि राजापूर या ठिकाणच्या शाळा-महाविद्यालयांत एकेका दिवसाची प्रशिक्षण शिबिरं घेतली. पुढे संजीव दिल्लीत जाऊन स्थायिक झाला.

या उपक्रमाच्या कामानिमित्ताने संजीवच्या वडिलांचा परिचय झाला. एक प्राथमिक शिक्षक आपल्या मुलाला ‘आयएएस’ बनवण्यासाठी दिल्लीत ठेवतो, या गोष्टीतलं मोठेपण माझ्या ध्यानी आलं. ही १९९९ च्या आसपासची गोष्ट आहे. ‘एमजी’ तेव्हा सेवानिवृत्तीच्या आसपास होते. करिअर म्हणून डॉक्टर-इंजिनिअर यापलीकडे पाहण्याची माहिती आजही आम्हाला फारशी नाही. त्यातून एका मराठी, त्यातही कोकणातल्या युवकाने ‘आयएएस’ होण्याचं स्वप्न पाहावं आणि ते पूर्ण करण्यासाठी, त्यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी दिल्लीस पाठविण्यास त्याच्या वडिलांनी तयार व्हावं हे माझ्या दृष्टीने मोठं अप्रूप होतं. निवृत्ती जवळ आली असताना आपल्या जेमतेम बारावी झालेल्या मुलाला एखादा दुकान गाळा किंवा ‘वडाप’साठी ट्रॅक्स गाडी घेऊन देण्यात धन्यता मानणारे अनेक शिक्षक मी पाहिले होते.

सामान्यपणे मराठी माणूस मोठी स्वप्नं पाहत नाही, महत्त्वाकांक्षा मनात धरत नाही. एखाद्याच्या मनात असं काही आकांक्षेचं बीज रुजतंय असं दिसलं की जराही वेळ न दवडता ते उकरून काढून नष्ट करायचं आणि त्या मुलाला/माणसाला त्या आकांक्षेपासून अगदी दूर घेऊन जायचं, हे काम करण्यात मराठी पालकांचा हात कोणी धरणार नाही. त्यातूनही मुलाला त्याच्या मनाप्रमाणे एखादी नोकरी लागली तर ‘‘इतक्या लांब तू एकटा कसा राहणार, किती खर्च येईल’’, असं रडगाणं गाऊन मुलाच्या भवितव्याचं मातेरं करायचं आणि मग ज्याच्या-त्याच्याकडे मुलाला जवळपास कुठेतरी नोकरी असली तर बघा अशी याचना करायची, ही हल्ली कोकणात स्वतःला सुशिक्षित म्हणविणार्‍यांची मानसिकता बनली आहे.

या पार्श्वभूमीवर संजीवचे वडील – एमजी कबीर सर मला खूप मोठे भासले. धाकटा मुलगा तुषार इंजिनिअर झाला, राज्य वीज मंडळात अधिकारी म्हणून तो पुण्याला राहतो. आज भारताच्या राजधानीत – नव्या दिल्लीत – संजीवची ‘करिअर क्वेस्ट’ नावाची स्वतःची स्पर्धा परीक्षेचं प्रशिक्षण देणारी संस्था आहे. नुसती उभी नाही तर ‘आयएएस’सारख्या परीक्षांच्या उमेदवारांना मुलाखतीचं तंत्र शिकविणारी सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून ‘करिअर क्वेस्ट’चा लौकिक आहे. तिथे प्रशिक्षण घेतलेले शेकडो अधिकारी आज देशभर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक वगैरे हुद्द्यांवर कार्यरत आहेत. रत्नागिरीचे माजी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आयआरएस होऊन प्राप्तिकर खात्यात उच्च पदावर निवड झालेली मधुलिका देवगोजी ही त्यातली रत्नागिरी जिल्ह्याशी निगडित उदाहरणं आहेत. यामागे संजीवचा अभ्यास, साहस आणि परिश्रम जितके महत्त्वाचे, तितकंच त्यांच्या वडिलांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला हेही महत्त्वाचं आहे. खर्‍या अर्थाने एमजी हे ‘शेकडो आयएएस घडविणार्‍याचे जन्मदाते’ म्हणता येतील.

नव्या दिल्लीत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाच्या व्यवसायाची उभारणी करत असतानाच संजीवने ‘सारस्वत मित्र’ नावाचं मासिक सुरू करण्याचं ठरवलं. मराठी माणसांच्या दृष्टीने मासिक बिसिक चालवणं हे भिकेचे डोहाळे असतात. एखादा बाप म्हणाला असता, ‘‘बाबा रे, ही भांडवलदारांची कामं… आत्ता कुठे तुझा जम बसतोय. मी रिटायर्ड, हे व्याप कशाला करतोस?’’ पण तसं काही न बोलता एमजींनी ‘सारस्वत मित्र’च्या व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. मासिकाचं कार्यालय रत्नागिरीत, छपाई लांज्यात, संपादक दिल्लीत. पण मासिकाच्या कामात कधीही विस्कळितपणा आला नाही. अशा स्थितीत एमजी सरांचं अकाली निघून जाणं म्हणजे या तपपूर्ती केलेल्या मासिकाचा मध्यवर्ती खांबच कोसळल्यासारखं आहे.

व्यवस्थापक म्हणून मासिकाचं काम पाहताना ते अनेकांशी संपर्क साधत. दूरदूर पायी जात, मासिकाची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी त्यांनी फार परिश्रम केले. मासिकासाठी लेख मिळवणं हेही जिकिरीचं काम. हे सगळं करताना त्यांच्या चेहर्‍यावर कधी थकवा किंवा निराशा दिसली नाही. मी सुरुवातीपासून त्यात लिहीत आलो, पण लेख द्यायला उशीर झाला म्हणून ते कधी चिडून बोलले नाहीत की वैतागले नाहीत. गुढघेदुखीमुळे ‘सारस्वत मित्र’च्या तिसर्‍या मजल्यावरच्या ऑफिसमध्ये जाणं मला महाकठीण वाटत असल्याने, लेख लिहून झाला की तो माझ्या मुलाच्या ऑफिसमध्ये ठेवायला सांगत, तिथून ते स्वतः घेऊन जात. या आदरणीय मनुष्याला चालत येऊन लेख घेऊन जावा लागतो, याचं मोठं वैषम्य वाटे, पण त्यांनी त्यात कधी कमीपणा मानला नाही किंवा तिथे पाठवून द्या असं म्हणाले नाहीत.
स्वभाव अत्यंत विनम्र, बोलण्यात ऋजुता, त्यामुळे त्यांची लेखाची मागणी कोणत्याही परिस्थितीत वेळेवर पूर्ण केली पाहिजे, असं एक नैतिक बंधन आपोआपच पडलं.

त्यांचा स्वभाव इतका शांत होता आणि बोलणं इतकं हळुवार असे की आयुष्यभर शिक्षकी केलेल्या या मनुष्याने शाळेतल्या नाठाळ आणि गोंगाट घालणार्‍या मुलांना कसं धाकात ठेवलं असेल, हा प्रश्न पडावा. मुळात अतिशय आतिथ्यशील असल्याने कार्यालयात गेलो तरी घरच्यासारखी उठबस करण्याची त्यांची इच्छा लपत नसे. अशा या मनुष्याने वयाच्या जेमतेम सत्तराव्या वर्षी आम्हा सर्वांना सोडून जावं, हा कबीर कुटुंबावर जसा आघात आहे, तसा त्यांच्या मोठ्या मित्रपरिवारालाही धक्का आहे.

  • राजेंद्रप्रसाद स. मसुरकर, रत्नागिरी
    (संपर्क : 9960245601)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply