देवमाणूस – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी केंद्र

आजचे नाटक (१८ मार्च २०२२) – देवमाणूस
सादरकर्ती संस्था – आश्रय सेवा संस्था, रत्नागिरी

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रत्नागिरीत साठावी संगीत राज्य नाट्य स्पर्धा १० मार्च ते २७ मार्च दरम्यान होणार आहे. हौशी रंगभूमीवरील संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या नाट्य कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरते. या वर्षी स्पर्धेत महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या एकूण सोळा संघांनी भाग घेतला आहे. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात दररोज सायंकाळी ७ वाजता स्पर्धेतील नाट्यप्रयोग सुरू होईल. (स्पर्धेचे प्रयोगपंचांग शेवटी दिले आहे.)

आज १८ मार्च २०२२ रोजी देवमाणूस हे नाटक आश्रय सेवा संस्था, रत्नागिरी या संस्थेने सादर केले.

रत्नागिरीतील आश्रय सेवा संस्था २००५ पासून महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली संस्था आहे. संस्थेने अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करून ते यशस्वी केले आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये गोरगरीब विद्यार्थी आणि समाजातील पीडितांना मदत करणे, ग्रामीण भागातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी कार्यशाळांचे आयोजन करणे, तळागाळातील लोककलावंतांना प्रोत्साहन देणे, यांसारखे उपक्रम संस्था राबवत आहे. त्याचबरोबर आजच्या युगातील वैज्ञानिक प्रगती आणि दैनंदिन जीवनातील वैज्ञानिक ज्ञानाची निकड लक्षात घेऊन राष्ट्रीय बालविज्ञान परिषद, ग्रामीण विज्ञान केंद्र, विज्ञान प्रसार, नवी दिल्ली यांचे उपक्रम, असे विज्ञान प्रसारविषयक अनेक उपक्रम संस्था राबवते. संस्थेला नुकतीच पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत.

संस्थेचा कला आणि संगीत विभाग २०१५ पासून यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. संस्थेने सलग सहा वर्षे महाराष्ट्र शासनाच्या हौशी संगीत नाट्य स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असून मत्स्यगंधा, कुरुमणी, एकच प्याला, लावण्यसखी, शारदा, जय जय गौरीशंकर अशी दर्जेदार नाटके सादर केली आहेत. विशेष म्हणजे संस्थेने वैयक्तिक पारितोषिकांमध्ये दिग्दर्शन, अभिनय आणि नेपथ्यासाठीची रौप्यपपदके आणि गुणवत्ता पारितोषिके मिळविली आहेत. विशेष म्हणजे २०२० सालच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये संस्थेने जय जय गौरीशंकर या नाटकासाठी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. या उपक्रमामध्ये प्रतिवर्षी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना संधी देऊन त्यांच्या अंगी असलेले कलागुण समाजासमोर आणले आहेत. मुंबईतील मराठी विज्ञान परिषदेतर्फे आयोजित विज्ञान एकांकिका स्पर्धेतसुद्धा संस्थेने सहभाग घेतला आहे. यंदाच्या नाट्य स्पर्धेत संस्था कै. नागेश जोशी यांच्या लेखणीतून साकारलेले सं. देवमाणूस हे नाटक सादर केले.

साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या एका मध्यमवर्गीय कौटुंबिक व्यवस्थेचे प्रतिबिंब प्रातिनिधिक स्वरूपात या नाटकात पाहायला मिळते. दोन वेगवेगळ्या विचारसरणीची माणसे एकाच प्रसंगात, वेगवेगळ्या स्वरूपात कसे व्यक्त होतात, त्यातील भेद म्हणजे देवमाणूस. आई-वडिलांचे छत्र गमावल्यानंतरही दादा आपल्या विलास आणि नंदिनी या दोन्ही भावंडांना चांगले संस्कार आणि शिक्षण देऊन मोठे करतो. नंतर नंदिनीचे अनिलशी आणि विलासचे रागिणीशी लग्न होते. सुखी संसार सुरू होतात. पण एक दिवस रागिणीचा पूर्वाश्रमीचा प्रियकर सुहास घरात प्रवेश करतो आणि रागिणीच्या मनात दादांविषयी नको त्या गोष्टी भरवून देतो. त्यावर विश्वास ठेवून रागिणी दादांकडे वेगळे होण्याची आणि इस्टेटीतल्या अर्ध्या हिश्श्याची मागणी करते.
सुहास रागिणीचा दादांबद्दलचा गैरसमज का करून देतो? रागिणीच्या मागणीप्रमाणे त्यांना इस्टेटीतला हिस्सा मिळतो की दादांबद्दलचे तिच्या मनातले गैरसमज दूर होऊन पूर्ववत सुखी संसार सुरू होतो? या प्रश्नांची उत्तरे नाटकाच्या शेवटी प्रेक्षकांना मिळतात. कोणत्याही व्यक्तीला पुरावा नसताना, निव्वळ एखाद्या संशयावरून बदनाम केल्यास त्या व्यक्तीच्या पूर्ण जीवनाची कशी वाताहत होते, हे लेखकाने अतिशय सोप्या भाषेत या तीनअंकी नाटकामध्ये मांडले आहे.

श्रेयनामावली :

लेखक : कै. नागेश जोशी

दिग्दर्शक : संदीप थोरात
संगीत मार्गदर्शक : विजय रानडे
ऑर्गन साथ : राजू भडसावळे
तालरक्षक : अमेय भडसावळे
पार्श्वसंगीत : अमेय थोरात
ध्वनिसंयोजक : अरुण जोशी
रंगभूषा : श्रीकृष्ण शिर्के
वेशभूषा : सौ. शुभा जोशी
प्रकाशयोजना : शेखर मुळे
नेपथ्य : अवधूत काळे

रंगमंच व्यवस्था : श्री सिद्धिविनायक मंडळ, सुतारवाडी, वाटद, ता. रत्नागिरी
विशेष साह्य : खल्वायन, रत्नागिरी
निर्मिती प्रमुख : अरुण मुळ्ये

भूमिका आणि कलावंत :
दादा : योगेश जोशी
अनिल : प्रसन्न जोशी
सुहास : उमेश जोशी
जीवबा : हेरंब जोशी
विलास : प्रथमेश गोडबोले
रागिणी : सौ. अश्विनी साठे
नंदिनी : कु. अपूर्वा जोशी

स्पर्धेचे वेळापत्रक

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply