आसमंत बेनेवोलेन्स फाउंडेशनतर्फे बोलावे नेटके संवाद कार्यशाळा

रत्नागिरी : येथील आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनतर्फे १२ ते १५ वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांसाठी २७ आणि २८ एप्रिल रोजी बोलावे नेटके संवाद कार्यशाळा रत्नागिरीच्या रा. भा. शिर्के प्रशालेतील रंजन मंदिरात घेण्यात येणार आहे. कार्यशाळा निःशुल्क आहे.

घर असो किंवा शाळा, महाविद्यालय, कार्यालय किंवा समाजमाध्यम आपले विचार, आपले म्हणणे कोणासमोर मांडायचे असेल किंवा अगदी झक्कास गप्पांचा फड रंगवायचा असेल, तर संवाद साधण्याचे कौशल्य आपल्याकडे असायला हवे. आज दिवसातला बराच वेळ आभासी जगात वावरत असल्यामुळे नितांत गरजेशिवाय थेट एकमेकांशी बोलून संवाद साधणे कमी होत चालले आहे. शब्दांनी साधला जाणारा संवाद हे माणूस म्हणून आपले खास वैशिष्ट्य आहे आणि उत्तम मानसिक आरोग्यासाठी एक गरजही आहे.

हा संवाद साधत असताना नेमका आणि नेटका झाला नाही तर अनेकदा वाद निर्माण होतात आणि संवादाचा विसंवाद होतो. हेच टाळण्यासाठी आपल्या दैनंदिन बोलण्यातल्या सहजतेपासून ते कार्यालयीन, मंचीय संवादात अधिक परिणामकारकता येण्यासाठी आपण काय करू शकतो, या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. मूलभूत उच्चारण, आवाजातले चढ-उतार, काही भाषिक खेळ, संवादाची प्रात्यक्षिके यांचा समावेश या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. लेखिका, आकाशवाणी मुंबई, एफएम गोल्ड आणि एफएम रेनबोची आरजे दुहिता सोमण-खेर या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळेत ३० विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. इच्छुकांनी १२ एप्रिलपर्यंत आसमंत फाउंडेशनशी ९९७००५६५२३ किंवा ८७८८९३१९९८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply