कोतवडे : कोतवडे (ता. जि. रत्नागिरी) येथे जिल्ह्यातील पहिल्या एकात्मिक शेती प्रभाग प्रकल्प (Integrated Farming Cluster) कार्यालयाचे १९ जुलै २०२२ रोजी उद्घाटन झाले. हा प्रकल्प उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत असून, जिल्हा अभियान व्यवस्थापक आयाझ पीरजादे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन झाले.
शेतीसह दुग्धव्यवसाय, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन अशा पूरक उद्योगांवर आधारित शेतीप्रणाली विकसित करून महिला शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत करणे, हा IFC या उपक्रमाचा उद्देश आहे. उत्पादन खर्च आणि जोखीम करून उत्पादकता वाढवण्यास मदत करणे, उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, समुदायाची क्षमताबांधणी आणि वृद्धी करणे, छोट्या शेतकऱ्यांचे गट करणे, छोट्या उत्पादकांचे गट करून त्यांचे उत्पादक कंपनीत रूपांतर करणे, मूल्यवर्धन, प्रक्रिया, पॅकेजिंग, बाजारपेठेशी जोडणी आदींसाठी साह्य करणे आदी बाबी या प्रकल्पाच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत.
या कार्यक्रमाला कोतवड्यातील एकता महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा सौ. संध्या देवरुखकर, सचिव सौ. स्वरा देसाई, प्रभाग समन्वयक श्री. मोरे, प्रभाग व्यवस्थापक सौ. आरती देवरुखकर, मास्टर सीआरपी सौ. अस्मिता तोडणकर, ब्लॉक को-ऑर्डिनेटर अमृता गोरिवले, सीनिअर सीआरपी दीक्षा जाधव, एलएससी मॅनेजर मयुरी भोसले, कोतवडे ग्रामपंचायत उपसरपंच आणि सदस्य, कोतवडे, नेवरे, धामणसे, भगवतीनगर येथील सर्व आय-सीआरपी, एफएल-सीआरपी, उद्योग सखी, बँक सखी, चैतन्य ग्रामसंघ पदाधिकारी, मंगलमूर्ती ग्रामसंघ पदाधिकारी आणि त्या त्या गावांतील स्वयंसाह्यता समूहात असलेल्या महिला आदींची उपस्थिती होती.
(प्रकल्पाची विस्तृत मार्गदर्शिका वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)



