रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या मी भारतीय या दीर्घांकाची अमृतमहोत्सवी प्रयोगाकडे वाटचाल सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या दीर्घांकाचे आजपासून विविध ठिकाणी प्रयोग होणार आहेत.
भारताच्या इतिहासात १५ ऑगस्ट १९४७ हा एक सुवर्णक्षण होता. त्या दिवसाची पहाट मंगलवाद्याच्या सुरेल सुरावटीने उगवली. सूर्याचे किरण स्वतंत्र झालेल्या देशावर प्रथमच अवतरले. प्रत्येकजण त्या सूर्याकडे नव्या आशेने, नव्या प्रेरणेने आणि विजयी मुद्रेने पाहत होते. कारण तो भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विजयाचे, यशाचे हास्य होते. कारण पारतंत्र्याचे दुःख, वेदना अन्याय याच्याशी सामना करून हे स्वातंत्र्य मिळाले होते. असंख्य क्रांतिकारकांची आहुती पडून मिळालेल्या, असंख्य संसार, घरदार उद्ध्वस्त करून मिळालेल्या, खूप काही गमावून मिळालेले, विविध रंगांच्या रांगोळ्यांखाली रक्ताचे सारवण लपवलेल्या, १०० वर्षांच्या अथक प्रयत्नांती मिळवलेल्या या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. स्वातंत्र्यानंतर देशाने खूप प्रगती केली. अनेक क्षेत्रांत देश सक्षम झाला. स्वयंपूर्ण झाला. विविध भाषा, विचार, आचार यांनी एकवटलेल्या भारताने एक बलशाली, कायम प्रगतिपथावर असलेली आणि इतरांकरिता एक आदर्श अशी प्रतिमा जगावर उमटवली.
ज्या पिढ्यांसाठी हे कष्ट क्रांतिकारांनी उपसले, त्या सक्षम, बुद्धिमान तरुण पिढीने आता या देशाची धुरा सांभाळायला हवी. मात्र ती पिढी आपल्या हुशारीचे दान परदेशाच्या झोळीत टाकत आहे. आपल्या देशाकडे पाठ फिरवून परदेशाकडे डोळे लावून बसली आहे. देशप्रेमाची भावनाच लोप पावल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे या या पिढीसाठी नव्या जाणिवेची, नव्या जागृतीची आवश्यकता आहे. या पिढीला नवी दिशा दाखवण्याचे एक पाऊल म्हणून ‘मी भारतीय` हा दीर्घांक तयार करण्यात आला आङे. दीर्घकाळ लक्षात राहणारा स्वातंत्र्य लढ्याच्या उजळणीचा हा धडा आहे. नव्या पिढीच्या मनातील देशप्रेमाच्या रोपट्याला खतपाणी घालण्याचा एक प्रयत्न आहे. त्याची संकल्पना आणि दिग्दर्शन रवींद्र देवधर यांचे असून लेखन प्रदीप तुंगारे यांनी केले आहे. दीर्घांकात रवींद्र देवधर आणि हृषिकेश कानडे यांच्या भूमिका आहेत.
भारतीय स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षात या दीर्घांकाचे ७५ प्रयोग येत्या १४ ऑगस्ट रोजी पूर्ण होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून (दि. २० जुलै) १४ प्रयोग होणार आहेत. त्यांचे वेळापत्रक असे – २० जुलै – दुपारी १२ वाजता उर्दू हायस्कूल खेड, दुपारी २ वाजता ज्ञानदीप विद्यामंदिर, खेड. २१ जुलै – सकाळी ११.३० वाजता नेने हायस्कूल, शिरगाव. दुपारी ३ वाजता महात्मा गांधी विद्यालय, साखरपा. २२ जुलै – दुपारी १.३० वाजता फाटक प्रशाला, रत्नागिरी. २३ जुलै – दुपारी १२ वाजता जागुष्टे हायस्कूल, कुवारबाव. सायंकाळी ५.३० वाजता नगर वाचनालय, रत्नागिरी. २४ जुलै – सकाळी ११ वाजता बालसुधारगृह, रत्नागिरी. सायंकाळी ७ वाजता स्वामी समर्थ मठ, रत्नागिरी. २५ जुलै – सकाळी ११ वाजता कुरतडे हायस्कूल, ता. रत्नागिरी. दुपारी ३ वाजता – पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी. २६ जुलै – सकाळी ११ वाजता राधा पुरुषोत्तम माध्यमिक विद्यालय, कुर्धे, ता. रत्नागिरी. दुपारी ३ वाजता स्वामी स्वरूपानंद विद्यालय, पावस, ता. रत्नागिरी. येत्या २८ जुलैपासून गोव्यात २० प्रयोग, तसेच पुणे आणि खेड (दापोली) येथे ४ प्रयोग, तर १३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता मालवण, १४ ऑगस्ट रोजी रात्री पुण्यात असे पंचाहत्तरावा प्रयोग होणार आहे. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.१५ वाजता पुन्हा पुढील प्रयोगांना सुरुवात होणार आहे.
या दीर्घांकाच्या प्रयोगासाठी रवींद्र देवधर (९४२२३४४५५५), प्रदीप तुंगारे (९८५०१३०४३४) किंवा शिरीष कुलकर्णी (९८२३०५७८३२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
(एक झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत…)

