विधवा मातांचा आशीर्वाद घेऊन पन्नासावा वाढदिवस साजरा

जुवाठी (ता. राजापूर) : येथील माध्यमिक विद्यालयाचे सहायक शिक्षक बी. के. गोंडाळ यांनी आपला वाढदिवस जुवाठी गावातील १५ विधवा मातांना साडीचोळी देऊन सत्कार आणि हळदीकुंकू कार्यक्रमाने साजरा केला.

जुवाठीच्या आनंदवन येथील अक्षरमित्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुवाठीच्या सरपंच सौ. रिया राजेंद्र मयेकर, कणकवलीतील ज्येष्ठ साहित्यिका आणि राष्ट्र सेवा दल विचारांच्या कार्यकर्त्या सौ. सरिता पवार, ओणीतील वात्सल्य मंदिरच्या सौ. आशाताई गुर्जर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

यावेळी महिलांचे वैचारिक प्रबोधन करताना सौ. सरिता पवार म्हणाल्या की, आपल्या धर्मातील कोणत्याही रूढी-परंपरा देवाने निर्माण केलेल्या नाहीत, तर त्या स्वार्थी माणसांनी तयार केल्या आहेत. पूर्वी पतीच्या निधनानंतर सती जाणे, केशवपन करणे या क्रूर प्रथा त्या काळातील कोणाच्या तरी धाडसी पुढाकारामुळेच बंद झाल्या. क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी निर्णयामुळे मुलींना शिक्षण मिळू लागले. त्यामुळे पतिनिधनानंतर आपली होणारी अवहेलना थांबवण्यासाठी, विधवा महिलांनीच पुढे आले पाहिजे. क्रूरपणे केल्या जाणाऱ्या प्रथा-पद्धतींविषयी आवाज उठवला पाहिजे. तरच या समाजात आपल्याला सन्मानाने आणि आनंदाने जगता येईल.

बी. के. गोंडाळ यांची आई अकाली गेल्यामुळे आपल्या शिक्षकी पेशातील, नोकरीतील एकही रुपया त्यांना आईसाठी खर्च करता आला नाही. यामुळे त्यांनी कधीच आपला वाढदिवस साजरा केला नाही किंवा कोणाकडून करून घेतला नाही. म्हणूनच आपल्या आईची आठवण म्हणून जुवाठी गावातील १५ विधवा मातांचा प्रातिनिधिक स्वरूपात साडीचोळी देऊन त्यांनी सन्मान केला. यामध्ये सत्यवती अनंत महंकाळ, चंद्रभागा चंद्रकांत मयेर, लक्ष्मी दत्ताराम मयेकर, निरंजनी महादेव मयेकर, प्रतिभा प्रकाश खानविलकर, रुक्मिणी श्रीपत भिवंदे, शुभांगी संतोष तरल, श्रुतिका शरद गिरकर, सुनीता रामचंद्र शिर्के, यशोदा यशवंत घेवडे, शोभना विनायक दाणी, हेमलता अशोक मालपेकर, लीलावती प्रकाश घेवडे, सोनल सतीश गिरकर, रूपाली रमेश नेवरे यांचा समावेश आहे.

यावेळी वात्सल्य मंदिर संस्था, भीमराव कोंडविलकर, मेघनाथ गोसावी, सौ. सुहासिनी गिरकर, सौ. सुनंदा मयेकर यांनी विविध भेटवस्तू देऊन तसेच शाल आणि श्रीफळ देऊन श्री. गोंडाळ यांचा सत्कार केला. सौ. सरिता पवार यांनी श्री. गोंडाळ यांच्या अक्षरमित्र उपक्रमाला वाढदिवसानिमित्त १५ पुस्तकांची भेट दिली.

सरपंच सौ. रिया मयेकर आणि सौ. सुहासिनी गिरकर यांनी मनोगत व्यक्त केले. वात्सल्य मंदिरचे डॉ. महेंद्र मोहन, संचालक रूपेश रेडेकर, कविता रेडेकर, संविधान संवादक सुजल जाधव (कणकवली), उमेश शिवगण, रुपाली जाधव (राजापूर हायस्कूल), सौ. मालती गोंडाळ, जुवाठी येथील बचत गटाच्या मुख्य आय. सी. आर. पी. सौ नेत्रा मयेकर, उपजीविका आ. सी. आर. पी. वैशाली मोहरकर तसेच क्रांती आणि भरारी बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून तसेच माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही प्रार्थना गाऊन झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक माजी विद्यार्थिनी साक्षी विजय मोहरकर (फर्गसन कॉलेज, पुणे) हिने केले. बी. के. गोंडाळ यांनी आभार मानले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply