भडकंबा येथील जोशी कुटुंबीय जपतात गणपती नवरात्रोत्सवाची परंपरा

भडकंबा (ता. संगमेश्वर) येथील जोशी कुटुंबीय वर्षानुवर्षे आगळीवेगळी गणपती नवरात्रोत्सवाची परंपरा जपत आहेत.

प्रत्येक कुटुंबाला स्वतःची एक संस्कृती आणि आगळीवेगळी परंपरा असते. भारतीय संस्कृतीत या परंपरा अगदी प्राणपणाने जोपासल्या जातात. संगमेश्वर तालुक्यातील साखरप्याजवळील भडकंबा दत्तवाडी येथील पर्शुराम जोशी आणि कुटुंबीय पिढ्यान् पिढ्या गणेशोत्सवाची अशीच एक आगळी वेगळी परंपरा जोपासत आहेत. साखरपा पंचक्रोशीत भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच सर्वप्रथम आगमन होणारा गणपती म्हणून याची ओळख आहे. प्रतिपदेपासून गौरीविसर्जनापर्यंत गणपतीच्या नवरात्रोत्सवाची म्हणजे नऊ दिवसांच्या गणेशोत्सवाची या कुटुंबाची परंपरा आहे. भडकंबा येथील सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार संतोष जामसंडेकर यांच्या कौशल्यातून ही मूर्ती तयार होते.

प्रतिपदेला ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात या उत्सवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते. गणपती अथर्वशीर्षाच्या एक हजार आवृत्त्या केल्या जातात आणि जोशी कुटुंबासमवेतच संपूर्ण पंचक्रोशीतील गणेशोत्सवाचा आरंभ होतो. मूळचे कृष्णाकाठच्या कराड येथील असणारे जोशी यांच्या अनेक पिढ्या कोकणात वास्तव्यास आहेत. मूळचे ज्योतिषी आणि अपभ्रंशाने जोशी झालेल्या कुटुंबावर गणपतीचा विशेष वरदहस्त आहे. देवघरातील पंचधातूंच्या ठसठशीत गणेशमूर्ती आणि दुर्मिळ नर्मदा गणपतीदेखील त्यांच्याकडे पाहावयास मिळतो. अनेक शुभसंकल्प गणेशोत्सवात पूर्णत्वास गेल्याचे कुटुंबीय सांगतात. म्हणूनच या कुटुंबातील प्रत्येकासाठी तो इच्छापूर्ती गणेश आहे. मागील पिढीत गणपती प्रतिपदेला आणण्याचा नवस बोलला गेला असावा आणि तेव्हापासून प्रतिपदेला गणेशोत्सवाचा प्रारंभ करण्यास सुरुवात झाली.

जोशी कुटुंबातील माहेरवाशिणी, सुना, नातवंडे आपले नोकरी व्यवसाय सांभाळून गणेशाच्या दर्शनाला आवर्जून उपस्थित राहतात. गणपतीला हजर राहण्याकरिता काळही अगदी अनुकूल होतो, असेही सर्व कुटुंबीय आवर्जून सांगतात.

आमच्या घरातील हा गणेशोत्सव उत्तरोत्तर वाढत जावो आणि जोशी कुटुंबीयांप्रमाणेच सर्वांच्या इच्छांची पूर्तता होवो, हीच सदिच्छा.

– सौ. सोनाली लिमये-जोशी,

भडकंबा, साखरपा (संगमेश्वर)

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply