जनसेवा ग्रंथालयाच्या उत्कृष्ट वाचक पुरस्कारांचे वितरण

रत्नागिरी : रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालयातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रसिद्ध लेखिका कै. स्मिताताई राजवाडे यांची मूळ संकल्पना असलेल्या उत्कृष्ट वाचक पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

रत्नागिरीत लक्ष्मी चौकातील जनसेवा ग्रंथालयाच्या चौतिसाव्या वर्धापन दिनानिमित्त उत्कृष्ट वाचक पुरस्कार सोहळा पार पडला. सुमारे साडेतीनशेहून अधिक वाचकांमधून पुरस्कार निवड समितीने दोन गटांत चार वाचकांची पुरस्कारांसाठी निवड केली. प्रौढ गटात अनुराधा चांदोरकर यांना प्रथम, शारदा अभ्यंकर यांना उत्तेजनार्थ तर बालगटात हर्ष पाटील याला प्रथम, ऋषिकेश केळकर याला पुरस्कार देण्यात आला. कार्यकारिणी सदस्य अमोल पालये आणि ग्रंथपाल सौ. सिनकर यांच्या पुरस्कार निवड समितीने ही निवड केली.

पुरस्कार निवड समितीचे प्रमुख अमोल पालये यांनी उत्कृष्ट वाचक पुरस्कार निवड प्रक्रियेबाबत भूमिका मांडली. हा पुरस्कार सदोदित चालू ठेवून यामुळे वाचकांना वाचण्यास प्रवृत्त करण्याचे काम होईल, असा विश्वास जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष दळवी यांनी व्यक्त केला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावेळी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, कोमसापचे कार्यवाह माधव अंकलगे, कोमसापचे सल्लागार अरुण नेरूरकर, जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी, कार्याध्यक्ष राहुल कुळकर्णी, लेखक डॉ.शरद प्रभुदेसाई, डॉ. श्रीकृष्ण जोशी, विवेक भावे, वाचक-सभासद, साहित्यप्रेमी, कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

फोटो ओळी – जनसेवा ग्रंथालयातर्फे उत्कृष्ट वाचक पुरस्कार विजेता ऋषिकेष केळकर याला सन्मानित करताना जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी, सोबत गजानन पाटील, माधव अंकलगे, अरुण नेरूरकर

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply