गणपतीचा आदर्श ठेवला, तर वृद्धाश्रमाची गरज राहणार नाही : अंकलगे

रत्नागिरी : विश्वविजेत्या गणपतीचा आदर्श तरुणांनी ठेवला, तर वृद्धाश्रमाची गरज राहणार नाही, असे प्रतिपादन सामाजिक शैक्षणिक व्याख्याते आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह माधव अंकलगे यांनी केले.

बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद प्रभुदेसाई यांनी वृद्धत्वकालीन समस्या, अडचणी याबाबत वृद्धांपासून तरुणांपर्यंत सर्वांना समुपदेशन करणारे ‘जरामरण’ हे पुस्तक लिहिले आहे. जनसेवा ग्रंथालयाच्या चौतिसाव्या वर्धापन दिन कार्यक्रमात या पुस्तकाचे प्रकाशन माधव अंकलगे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. एका पौराणिक कथेचा आधार घेऊन श्री. अंकलगे म्हणाले, एकदा सगळे देव विश्वविजयी होण्यासाठी पृथ्वी प्रदक्षिणेला निघाले. जो जिंकेल, तो विजेता होणार, म्हणून सारे देव धावू लागले. मात्र गणपतीने आपले आई-वडील हेच पृथ्वीसमान आहेत, आई-वडीलच जगात श्रेष्ठ आहेत, असे मानून त्यांनाच प्रदक्षिणा घातली आणि स्पर्धा जिंकली. ग्रामीण भागातील तरुण, कष्टकरी शेतकरी कधीच आपल्या आई-वडिलांना वार्‍यावर सोडत नाही. एकाही शेतकर्‍याचा बाप वृद्धाश्रमात दिसणार नाही, हे डॉक्टरांनी केलेले निरीक्षण अचूक आहे. लेखक जेव्हा लिहितो, तेव्हा त्याच्याभोवतालची सृजनशीलता तो मांडत असतो. समाजातील हेच चित्र लेखकाने पुस्तकात मांडले आहे. त्यातील एक उदाहरण देताना श्री. अंकलगे म्हणाले, एक वृद्ध असतो. तो मोबाइलच्या दुकानात जातो आणि फोन बंद असल्याचे सांगतो. दुकानदार मोबाइल तपासतो आणि परत देतो. दुसर्‍या दिवशी परत तो वृद्ध दुकानात जाऊन मोबाइल बंद पडलाय सांगतो आणि दुरुस्तीला देतो. असे सलग तीन..चार.. पाच दिवस होते. दुकानदार कोड्यात पडतो, कारण मोबाइल बंद पडलेला नसतो. तो व्यवस्थित चालत असतो. अखेर तो त्या वृद्धाला विचारतो, तुमच्या मोबाइलला नेमकं काय होतंय..?, तेव्हा तो वृद्ध म्हणतो, मला तीन मुलगे, आणि चार मुली आहेत. ती दूर आहेत, पण मला गेल्या आठ दिवसांत त्यापैकी एकाचाही फोन आलेला नाही. मला वाटलं फोन बिघडलाय वृद्धाबाबतची ही वेदना, आक्रोश लेखकाने अगदी योग्यरीतीने टिपला आहे.
आपणही म्हातारे होणार आहोत. आपल्याही हातात काठी येणार आहे. आपल्यालाही चष्मा लागणार आहे, हे तरुण पिढी विसरत चालली आहे. अशावेळी त्यांना जाणीव करून देणे गरजेचें आहे. ज्या काळात तुजपुंजा पगार होता, त्या काळात त्यांनी आपल्याला पायावर उभे केले. याची जाणीव आपल्यालाला मोठेपणी होत नसेल, तर आपल्यासारखे करंटे आपणच, अशी खंत श्री. अंकलगे यांनी मांडली. आपल्या मर्यादा आपण ओळखल्या तर नक्कीच आपल्या आयुष्याचा शेवट चांगला होईल, हे सांगताना त्यांनी समई आणि चंदनाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, समईतील वात जळून गेली. तेव्हा समई वातीला म्हणाली, वाती तू जळून संपून चाललीस. तुला वाईट नाही का वाटत? तेव्हा वात समईला म्हणाली, मी नष्ट झाले तरी मला त्याचे काही वाटणार नाही. कारण मी जोपर्यंत जिवंत होते, तोपर्यंत जगाला प्रकाश दिलाय. ती जळणारी वात म्हणजे आपली आई असते, हे ज्यादिवशी तरुण पिढीला कळेल, त्यादिवशी खर्‍या अर्थाने राष्ट्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे उद्गार श्री. अंकलगे यांनी काढले.

यावेळी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, कोमसापचे सल्लागार अरुण नेरूरकर, जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी, कार्याध्यक्ष राहुल कुळकर्णी आदी मान्यवर व्यासपीठावर होते. गजानन पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. जनसेवा ग्रंथालयाच्या इमारतीबाबतचा प्रश्न मंत्री महोदयापर्यंत पोहोचवून तो सोडविण्यासाठी मी जनसेवा ग्रंथालयाला मदत करीन, असे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले. भाग्यश्री पटवर्धन यांनी ‘जरामरण’ या पुस्तकाचा थोडक्यात परिचय करून दिला, तर प्रतिभा प्रभुदेसाई यांनी अभिप्राय वाचन केले.

लेखक डॉ. शरद प्रभुदेसाई मनोगत मांडताना म्हणाले, माझ्या वडिलांमुळे मी ‘जरामरण’ हे पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त झालो. त्यांनी वृद्धत्वासंबंधीच्या वडिलांच्या आठवणी जागविल्या. वृद्धत्वावरील लेखन वाचताना मला इंग्रजी साहित्य हाती लागले. ते वाचताना असे लक्षात आले की, परदेशातील वृद्ध आणि भारतीय वृद्ध यांच्या समस्या, जीवनमानात फरक आहे. त्यामुळे पुस्तक अनुवादित न करता भारतीय वृद्धांच्या समस्या जाणून घेऊन स्वतंत्र लेखन सुरू केले. वृद्धत्व आणि मरण या दोन जवळच्या अवस्था आहेत, त्यामुळेच पुस्तकाला जरामरण हे नाव दिले, असे प्रभुदेसाई म्हणाले.

कार्यक्रमाला कोमसाप रत्नागिरी शाखाध्यक्षा तेजा मुळ्ये, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी, विवेक भावे, कार्यकारिणी सदस्य, वाचक, सभासद, ग्रंथालयीन कर्मचारी उपस्थित होते.

‘जरामरण’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात राहुल कुलकर्णी, प्रकाश दळवी, माधव अंकलगे, अरुण नेरूरकर, गजानन पाटील, डॉ. शरद प्रभुदेसाई.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply