रत्नागिरी : हस्तलेखनाची प्राचीन परंपरा जपत येथील जनसेवा ग्रंथालयाने ‘शब्दांकुर’ हस्तलिखित दिवाळी अंक प्रकाशित केला.
भारतीय संस्कृतीत हस्तलेखनाची परंपरा खूप प्राचीन आहे. आज टॅब, कॉम्प्युटर ते अगदी व्हाईस टायपिंग आले. या साधनांमुळे हस्तलेखन मागे पडते की काय, अशी परिस्थिती शाळा-महाविद्यालयातूनही निर्माण झाली आहे. अशावेळी हस्तलेखनाची प्राचीन परंपरा जोपासावी, ती जोपासताना नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळावे, या हेतूने जनसेवा ग्रंथालयातर्फे गेली २१ वर्षे ‘शब्दांकुर’ हे हस्तलिखित प्रसिद्ध केले जाते. दीपोत्सवाच्या निमित्ताने काढण्यात येणार्या या हस्तलिखिताचे प्रकाशन बालवाचकांच्या हस्ते करण्यात आले.

साहित्य आणि वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी, यासाठी सात्यत्याने उपक्रमशील असणार्या जनसेवा ग्रंथालयातर्फे यावर्षीही ‘शब्दांकुर’ हे हस्तलिखित साकारण्यात आले. हस्तलेखन ही भारतीय संस्कृतीची महान देणगी आहे. आधी चित्रलिपी आणि नंतर हस्तलेखन अशी भारतीय साहित्यसंपदेची वाटचाल सुरू झाली, ती आज टायपिंगपर्यंत येऊन पोहोचली आहे. हस्तलेखनातून सुलेखन जन्माला आले. याच सुलेखनामुळे विविध आकार-उकाराचे मोत्यासारखे अक्षर व्यक्तिगणिक पाहायला मिळते. या हस्तलेखनाच्या सरावामुळे काहीजण संगणकालाही लाजवतील, असे टपोरे अक्षर काढतात. हे अक्षरधन संगणकाच्या युगात जपण्याची गरज आहे, अन्यथा टंकलेखनाच्या सरावाखाली हे मोत्यासारखे अक्षर कालबाह्य होईल आणि एकदा का लिहित्या हातांना टंकलेखनाची सवय जडली, की हस्तलेखन करताना हात थरथर कापायला लागतील, यामुळे हस्तलेखनाची फार हानी होईल. त्यासाठी हस्तलेखन हे धन जपावे, या हेतूने जनसेवा ग्रंथालय शब्दांकुर हे हस्तलिखित काढत आहे.
आजपर्यंत २२ हस्तलिखिते दीपोत्सवानिमित्ताने प्रसिद्ध झाली. कथा विशेषांक, बोलीभाषा विशेषांक, जन्मशताब्दी विशेषांक असे विशेषांकही काढले. हस्तलिखित काढताना सारे काही स्वहस्ते करायचे, त्यामुळे लिहणे-चित्रे रंगविणे यांपासून सारी कामे ही हातानेच करण्यात येतात. यासाठी गणेशोत्सवाआधी शब्दांकुरचे लेखन सुरू करावे लागते. ग्रंथालयाच्या कर्मचारी सुजाता कोळंबेकर गेली कित्येक वर्षे हस्तलिखिताचे एकटाकी लेखन करत आहेत. वाचक चित्रकार श्रीनिवास सरपोतदार हस्तलिखितासाठी देखणी व्यक्तिचित्रे काढून देत असतात. या व्यक्तिचित्रांमुळे हस्तलिखित विशेष बोलके होते.
शब्दांकुरचे मुखपृष्ठ हेही विशेष असते. यावर्षी हस्तलेखनाची प्राचीन परंपरा दाखविणारे महर्षी व्यास साकारण्यात आले आहेत. बालसभासदांनी लिहिते व्हावे, यासाठी शब्दांकुरमध्ये बालसभासदांसाठी राखीव जागा ठेवण्यात येते. बालवाचकांच्या कविता, कथा, चित्रे यांना प्राधान्य दिले जाते. यावर्षी याही पुढे जात उत्कृष्ट बालवाचक पुरस्कार विजेता हर्ष पाटील या बालवाचकाच्याच हस्ते शब्दांकुरचे प्रकाशन करण्यात आले.
गेली तीन-चार वर्षे अमोल पालये हे या हस्तलिखिताचे संपादन करत आहेत. याबाबत ते म्हणाले की, हस्तलिखित साकारण्याचा, लिहिण्याचा आनंद अवर्णनीय असतो. यावर्षीच्या शब्दांकुरसाठी बालसभासदांनी चांगला सहभाग घेतला. महाविद्यालयीन तरुणही लिहिते झाले. कथा-कविता-ललित, पुस्तक परिचयाबरोबरच मान्यवरांचे जन्मशताब्दीचे लेख आणि आकर्षक रंगचित्रे यांनी यावर्षीचा शब्दांकुर सजला आहे.


