रत्नागिरीत जानेवारीत पहिला सागर महोत्सव

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या जानेवारी महिन्यात पहिला सागर महोत्सव साजरा होणार आहे. त्याविषयीची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.

रत्नागिरीतील आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशनने या सागर महोत्सवासाठी पुढाकार घेतला असून किर्लोस्कर वसुंधरा, इकॉलॉजिकल सोसायटी आणि विवांत अनटेम्ड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

कोकण किनारपट्टीचे भारतात एक विशिष्ट स्थान आहे. रत्नागिरी शहराला किनारपट्टीचे वरदान लाभले आहे. मात्र या अथांग सागराची आपल्याला फारशी ओळख नसते. जेवणाच्या ताटातील चविष्ट मासे हाच उदार समुद्र देत असतो, हे ज्ञात असते. परंतु दैनंदिन जीवनामध्ये या समुद्राचे काय योगदान आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे घेऊन रत्नागिरीत सागरी महोत्सव साकारणार आहे. आपल्या आयुष्यात आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यात समुद्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच सागराची गुपिते उलगडून सांगणारी तज्ज्ञ मंडळी महोत्सवाच्या निमित्ताने भेटीस येणार आहेत. समुद्र आणि निगडित विषयांवर आधारित जागतिक कीर्तीचे लघुपटसुद्धा दाखविले जातील. पुळण किनारा, खडकाळ किनारा आणि खारफुटी अशा परिसंस्थांची ओळखसफरही आयोजित केली आहे. महोत्सवात स्थानिक शाळा, महाविद्यालये, तसेच नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सागरी महोत्सवात पर्यटकांनीही यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

जानेवारीत १३ आणि १४ तसेच २३ या तीन दिवसांचा हा सागरी महोत्सव रत्नागिरीत प्रथमच होत आहे. या तीन दिवसांच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि कार्यस्थळे याची महिती लवकरच दिली जाईल. त्याचबरोबर महोत्सवाची अधिक माहिती, तज्ज्ञांची ओळख आणि लघुपटांचे ट्रेलरही सोशल मीडियावर लवकरच येतील. महोत्सवाच्या कालावधीत किनाऱ्यावर वाळूशिल्प स्पर्धा घेण्याचा मानस असून प्रख्यात वाळूशिल्पकार शिल्प साकारण्याबरोबरच या स्पर्धेचे परीक्षण करतील.

आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनचे संस्थापक नंदकुमार पटवर्धन, विवांत-मुंबईचे डॉ. संजीव शेवडे, किशोर ठाकूर, मुंबईच्या कोस्टल कॉन्झर्वेशनचे प्रदीप पाताडे, पुण्याच्या इकॉलॉजिकल सोसायटीचे डॉ. गुरुदास नूलकर पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

महोत्सवाविषयी अधिक माहितीसाठी तसेच महोत्सवात सक्रिय सहभाग घेण्यासाठी नंदकुमार पटवर्धन (9970056523) यांच्याशी संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply