रत्नागिरी : महापराक्रमी झाशीच्या राणीचे चरित्र सर्व लहान मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे. ही मुलेच हा इतिहास वाचून इतिहास घडवू शकतील, असा विश्वास येथील विधिज्ञ अॅड. विलास पाटणे यांनी १९ नोव्हेंबर २०२२ रोजी रत्नागिरीत व्यक्त केला. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी)
झाशीची राणी लक्ष्मीबाईंची जयंती साजरी करण्यासाठी नाचणे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर शाळा क्र. १ आणि कोट येथील रणरागिणी राणी लक्ष्मीबाई स्मारक ट्रस्टतर्फे ओम साई मित्र मंडळ सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, नानासाहेब पेशवे, सेनापटी तात्या टोपे आणि झाशीची राणी एकत्रच लहानाची मोठी झाली आणि १८५७ च्या स्वातंत्र्याच्या संग्रामात पुन्हा एकत्र आली. राणीने इंग्रजांशी निकराचा लढा दिला. देशात तेव्हा ४०० पेक्षा अधिक संस्थाने होती. मात्र त्यातील २-३ छोटी संस्थाने सोडली, तर राणीला कोणीही मदत केली नाही. बहुतेक सर्व संस्थाने इंग्रजांचे बाजूने होती. त्यांची हुजरेगिरी करत होती. म्हणून राणीला एकाकी लढा द्यावा लागला. मूळच्या रत्नागिरी जिल्ह्यातील असलेल्या अशा या पराक्रमी राणीचे चरित्र
लहान मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे. नवा इतिहास घडविण्यासाठी, त्यांचा वैचारिक पाया मजबूत करण्यासाठी ते आवश्यक आहे.
कोट येथील रणरागिणी राणी लक्ष्मीबाई स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष लाड यावेळी म्हणाले की, ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर पहिलाच कार्याक्रम ज्या शाळेत होत आहे, ती शाळा अत्यंत उपक्रमशील आहे. करोनाच्या काळात जेव्हा सर्व शाळा बंद होत्या, मुले घरोघरी मजा मारत होती, शिक्षक आराम करत होते, तेव्हा नाचणे शाळेतील मुले शिबिरांमध्ये रमली होती. मुख्याध्यापिका सौ. आठल्ये आणि उपक्रमशील शिक्षक दीपक नागवेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही शिबिरे चालवून मुलांची उपक्रमशीलता सुरू ठेवली.
रत्नागिरी जिल्ह्यातील महनीय व्यक्तींचा आढावा घेताना श्री. लाड म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात साने गुरुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे, रियासतकार सरदेसाई अशी अनेक नररत्ने जन्माला आली. पण कोकणाचे दुर्दैव म्हणजे सर्व मोठ्या माणसे कोकणातून बाहेर गेल्यावर मर्दुमकी गाजवू शकली. लक्ष्मीबाईंसारखी तेजस्वी राणीही याच मातीत जन्मली. धावडशी आणि पारोळा, त्यानंतर झाशीपर्यंत राणीचे तांबे आणि नेवाळकर कुटुंबीय गेले. पराक्रम गाजविणाऱ्या रघुनाथ नेवाळकरांना झाशीचे संस्थान मिळाले. त्यांच्याशीच लक्ष्मीबाईंचा विवाह झाला. याच राणीला इंग्रजांशी लढा द्यावा लागला. तो लढा भारतभर पसरावा, म्हणून तिने प्रयत्न केला. अनेक संस्थानिकांशी संधान बांधले. पण त्यांना कोणी साथ दिली नाही. राणीची ताकद कमी पडली. अखेर लढता लढता राणीला रणांगणावर वीरमरण आले. तिच्या मरणाने असंख्य क्रांतिकारकांचा जन्म झाला. राणीने १८५७ साली स्वातंत्र्याचा जो स्फुल्लिंग पेटविला, त्याचा स्फोट होऊन १९४७ साली आपण इंग्रजांना घालवून दिले. अशा राणीचा इतिहास पानापानावर लिहिला गेला पाहिजे. तिच्यासाठी भारत सरकारने एक दिवस राखून ठेवला पाहिजे. पण ते अजून झालेले नाही. मात्र तिच्याच भूमीत आपण जन्मलो, याचा आणि राणीचाही आम्हाला अभिमान आहे. राणीचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा, तिचे चरित्र लोकांना समजावून सांगावे, यासाठीच स्मारक ट्रस्टची स्थापना केली आहे. कोट गावात राणीचे वंशज दत्तात्रय नेवाळकर यांनी दोन एकर जागा स्मारकासाठी दिली आहे. तेथे स्मारक उभे राहणार आहे. पण केवळ स्मारक उभे राहून उपयोग नाही. राणीचा इतिहास लहानांपासून शाळा-कॉलेजच्या लहान मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे. नाचणे गावाने त्यासाठी पुढाकार घेतला, हे फारच स्तुत्य आहे.
नाचणे गावचे सरपंच ऋषिकेश भोंगले यांनीही मनोगत व्यक्त केले. चांगले विचार देणारे कार्यक्रम नेहमी घडले पाहिजेत. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य नेहमीच केले जाईल. दूरदर्शनसारख्या प्रभावी माध्यमांमधूनही चांगले कार्यक्रम झाले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी शाळेच्या मुलांनी राणीच्या जीवनावर आधारित दोन नृत्ये सादर केली. कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आठल्ये, कोट गावचे माजी सरपंच आणि लक्ष्मीबाई स्मारक ट्रस्टचे उपाध्यक्ष शांताराम ऊर्फ आबा सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य शुभम सावंत, लांज्यातील कल्पना कॉलेजचे संचालक मंगेश चव्हाण, मुलांचे पालक उपस्थित होते. दीपक नागवेकर यांनी सूत्रसंचालन केले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

