दापोली : क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयातर्फे होणार असलेल्या सायकलिंगच्या शालेय विभागीय स्पर्धेककिता पहिल्यांदाच दापोलीहून ७ विद्यार्थी निवडले गेले आहेत.
क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, रत्नागिरी जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित जिल्हास्तरीय सायकलिंग शालेय क्रीडा स्पर्धेत दापोलीतील ७ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले. याच विद्यार्थ्यांची विभाग स्तरासाठी निवड झाली. या स्पर्धा सावर्डे (ता. चिपळूण) येथे झाल्या.
स्पर्धेत एकोणीस वर्षे मुलगे वयोगटामध्ये दापोलीच्या ए. जी. हायस्कूल (दापोली) यश शिर्के आणि सर्वेश बागकर यांनी पहिले दोन क्रमांक मिळविले. सतरा वर्षे मुलगे वयोगटामध्ये दापोलीतील एन. के. वराडकर कॉलेजचा चा हर्ष लिंगावले याने प्रथम क्रमांक मिळवला. सतरा वर्षे मुलींच्या वयोगटात ए. जी. हायस्कूलच्या संचिता भाटकरने प्रथम क्रमांक मिळवला. चौदा वर्षे मुलगे वयोगटात टाळसुरे येथील न्यू इंग्लिश स्कूल श्री मिलिंद खानविलकर याने पहिला, तर करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल चा साईप्रसाद वराडकर याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. चौदा वर्षे मुली वयोगटामध्ये दापोलीच्या ज्ञानदीप विद्यामंदिरची स्नेहा भाटकरने प्रथम क्रमांक मिळविला. दापोलीतील या सात विद्यार्थ्यांची निवड विभागस्तरावरील स्पर्धेसाठी झाली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक, शिक्षक, क्रीडा शिक्षक, पालक आणि दापोली सायकलिंग क्लबचे विशेष मार्गदर्शन लाभले. दापोलीचे आणि आपापल्या शाळेचे नाव उंचावल्याबद्दल या सर्वांचे कौतुक होत आहे.




