राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा रत्नागिरीत समारोप

रत्नागिरी : राज्य शासनाच्या एकसष्टाव्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची रत्नागिरी केंद्रावरील प्राथमिक फेरी काल (दि. १२ डिसेंबर) रात्री समाप्त झाली. या फेरीत १० संस्थांची नाटके सादर करण्यात आली.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी गेली ६० वर्षे ही स्पर्धा सातत्याने आयोजित केली जाते. यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या या नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला १५ नोव्हेंबरपासून राज्यभरात सुरुवात झाली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक फेरीदेखील १५ नोव्हेंबरपासून सुरू झाली. त्या दिवसापासून २९ नोव्हेंबरपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धेतील १५ नाट्यप्रयोग मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात सादर करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धा रत्नागिरीतील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात पार पडली. स्पर्धेत निर्वासित (युथ फोरम, देवगड), फेकबुक फ्रेंड्स (श्रीदेव गोपाळकृष्ण प्रासादिक नाट्य मंडळ, जानशी, ता. राजापूर), कळा या लागल्या जीवा (श्रीभैरीदेव देवस्थान, जांभारी, ता. रत्नागिरी), मावळतीचे इंद्रधनु (संकल्प कलामंच, रत्नागिरी), मड वॉक (सहयोग, रत्नागिरी), प्रतिध्वनी (रत्नवेध कलामंच, रत्नागिरी), तुझा माझ्यावर भरोसा नाय काय? (कुणबी कर्मचारी सेवा संघ, रत्नागिरी), मेलो, डोळो मारून गेलो (कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघ, कोतवडे, ता. रत्नागिरी), रात्र संपली पण उजाडलं कुठं? (आश्रय सेवा संस्था, रत्नागिरी) आणि किनारा (अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरी) ही १० नाटके सादर झाली. एकूण ४१ हजार १७५ रुपयांची तिकीट विक्री झाली. त्यापैकी मड वॉक या नाटकाला सर्वाधिक ९ हजार ४२५ रुपयांची तिकीट विक्री झाली. स्पर्धेकरिता दररोज १० आणि १५ रुपयांची तिकिटे ठेवण्यात आली होती. अन्य नाटकांची तिकीट विक्री अशी – ३,०८५, २,०२५, १,८४५, ४,०७५, २,९२५, ३,०६०, २,९१५ ४,८०० आणि ७,३०० रुपये.
स्पर्धेचे परीक्षण ईश्वर जगताप, सतीश शेंडे आणि मानसी राणे यांनी केले आहे. येत्या दोन दिवसांत स्पर्धेचा निकाल जाहीर होणार असल्याचे संयोजकांतर्फे सांगण्यात आले.

असे होते अखेरचे नाटक (१२ डिसेंबर २०२२) : किनारा

सादरकर्ते : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळ, रत्नागिरी

सागरामध्ये भरकटलेले जहाज कधी ना कधी किनाऱ्याला येतेच. कारण किनारा हाच त्यांचा शाश्वत आधार असतो. सामान्य परिस्थितीतील शिरूभाऊ, आता मात्र सोपं फॅक्टरीचा मॅनेजर आहे. वय ५०, पण अजूनही आकर्षक, उत्तम प्रकृती. पत्नी जिजी वय ५४-५५, मुलगी शामा वय २३-२४, मुलगा यदुनाथ वय २०-२१. पोस्टात काम करणारे सरळमार्गी शेजारी फडके, वय ५७-५८.

आणि शिरूभाऊंच्या प्रेमात (?) असलेली रोझी फर्नांडिस काय किंवा अलीकडची शैला काळे काय! बायको आणि बायकांतला फरक न समजणारे शिरूभाऊ, स्वैरपणे उधळततात, त्याची पोझिशन आणि पैशामुळे त्यांच्या भोवती जमणाऱ्या अन्य स्त्रिया, यामुळे बाहेरख्याली शिरूभाऊ, त्यातच दारू पार्ट्या, क्लब यामुळे समाजात त्यांची नाचक्की होते. अर्थातच या सर्वांचा परिणाम म्हणजे त्यांच्या कुटुंबाची होणारी वाताहत, पत्नी जिजीची होणारी घुसमट. पण हेच शिरूभाऊ आजारी पडतात आणि आधारासाठी पुन्हा घरी परततात, तेव्हा कुटुंब टिकविण्यासाठी धडपड करणारी जिजी त्यांना मोठ्या मनाने स्वीकारते. कारण पत्नी ही क्षणकालाची पत्नी आणि अनंतकालची माता असते. माता नेहमीच क्षमाशील असते. शिरूभाऊ नावाचे भरकटलेले जहाज, जिजी नावाच्या बंदरात विसावते. कुटुंब या अर्थाने दळवींनी नाटकाला दिलेले शीर्षक किनारा.

सुमारे ४० वर्षानंतर या नाटकाचा प्रयोग झाला. प्रयोग चांगला झाला. पण बदललेल्या स्थित्यंतरानुसार संहितेमध्ये कालानुरूप काही बदल करायला हरकत नव्हती. यदुनाथ क्रिकेटची मॅच ट्रान्झिस्टवरून ऐकत असतो. तो गावस्कर, गायकवाड, किरमाणी या तेव्हाच्या क्रिकेटपटूंचा उल्लेख करतो. त्याऐवजी आताच्या क्रिकेटपटूंचा उल्लेख करायला हवा होता. पंधरा-वीस रुपयांची भाऊबीज असाही एक उल्लेख होता. त्यातही बदल करायला काहीच हरकत नव्हती. लँडलाइन फोन आता कालबाह्य झाले आहेत. त्याचा वापर न करता मोबाइलचा वापर केला असता, तरी चालले असते. नाटक पौराणिक नव्हते. ते सामाजिक विषयावर आधारित होते. त्यामुळे संहितेमध्ये काही बदल केले असते, तरी चालले असते. नाटकात ताजेपणा आला असता. बाकी नाटक चांगले झाले.

श्रेयनामावली

लेखक – जयवंत दळवी
दिग्दर्शक – वामन जोग
सूत्रधार – श्रीनिवास जोशी
निर्मिती साह्य – अविनाश काळे, अनंत आगाशे
नेपथ्य निर्माण, रंगभूषा – रामदास मोरे
रंगभूषा साह्य – पूर्वा जोगळेकर, प्राजक्ता जोशी
वेशभूषा – दीप्ती पंडित, मनाली जोशी
पार्श्वसंगीत – गणेश जोशी
पार्श्वसंगीत साह्य – अनिकेत आपटे
रंगमंच व्यवस्था – कौस्तुभ सरदेसाई, ओंकार जोशी, अविनाश काळे, मुक्ता जोशी
प्रकाशयोजना – मंगेश लाकडे
प्रकाशयोजना साह्य – संतोष दामले
विशेष साह्य – राजेंद्र पटवर्धन, मनोहर जोशी, उदय जोग

पात्रपरिचय

फडके – विजय जोशी
जिजी – अर्चना जोशी
यदुनाथ – अनिकेत आपटे
शामा – रेणुका सरदेसाई
शैला – भाग्यश्री अभ्यंकर
शिरूभाऊ – वामन जोग

किनारा नाटकातील काही क्षणचित्रे

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply