रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात नववर्षापासून अभ्यासिका

रत्नागिरी : येथील रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी, अभ्यासकांसाठी नववर्षाच्या प्रारंभी अभ्यासिका सुरू होणार आहे.

रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वांत जुने सार्वजनिक वाचनालय आहे. वाचनालयाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या अनेकविध उपक्रमांमुळे ते जनमानसात सुपरिचित आहे. त्याचाच आणखी एक भाग म्हणून जानेवारीपासून वाचनालयात अभ्यासिका सुरू होणार आहे.

आजच्या काळात स्पर्धापरीक्षेला अन्यन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेकांच्या मनात सरकारी नोकरी मिळणे, आयएएस, आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न असते. त्यासाठी आवश्यक असणारे परिश्रम घ्यायची तयारी असते. ही जिद्द घेऊन ते नेटाने अभ्यास करतात. केवळ परीक्षेच्या दिवसांतच नव्हे, तर इतर वेळीदेखील अभ्यासासाठी वाचनालयाच्या मुक्त वाचन विभागात विद्यार्थी वाचक सातत्याने जातात. या अनुभवातून प्रेरणा घेऊन अभ्यासिका उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. वाचनालयातील शांत वातावरण, वाचनालयाची मध्यवर्ती जागा अभ्यासासाठी नक्कीच उपयुक्त आहे. मात्र वाचनालयाचा मुक्त वाचन विभागाला वेळेची मर्यादा असल्याने दुपारी वाचनालयाबरोबर वाचन विभागही बंद केला जात होता. त्यामुळे अभ्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्ययनात खंड पडत होता. त्याचा विचार करून येत्या २ जानेवारीपासून नगर वाचनालयाचा वाचन विभाग अन्य ठिकाणी हलवून वाचन विभागासाठी असलेल्या जागेचा वापर अभ्यासिकेसाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना सलग एकमार्गी अभ्यास करता यावा म्हणून ही अभ्यासिका नाममात्र शुल्क आकारून सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल.

वाचनालयात नव्याने सुरू होणाऱ्या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध असतील. अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना संदर्भासाठी लागणारी आणि वाचनालयात उपलब्ध असलेली पुस्तके उपलब्ध करून दिली जातील. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार वाचनालयामार्फत सवलतीच्या दरात पुस्तके मागवून दिली जातील. जागेच्या मर्यादेमुळे प्रथम नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

अभ्यासिकेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी नगर वाचनालयात संपर्क साधावा, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply