पहिल्या सागर महोत्सवाची रत्नागिरीत जय्यत तयारी

रत्नागिरी : साऱ्या जगात सर्वाधिक व्यापून राहिलेले महासागर जपण्यासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी एक पाऊल टाकत रत्नागिरीत आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आणि सहकारी संस्थांच्या पुढाकाराने प्रथमच सागर महोत्सव होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

या महोत्सवात व्याख्याने, लघुपट, माहितीपटांचे सादरीकरण, वाळूशिल्प पाहण्याची पर्वणी आणि विशेष म्हणजे खडकाळ समुद्रकिनारे व खारफुटी जंगलाची सफर करता येणार आहे. येत्या १३ व १४ जानेवारीला, तसेच २१ व २२ जानेवारी अशा दोन टप्प्यांत महोत्सव होणार आहे.

रत्नागिरीतील आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आणि किर्लोस्कर वसुंधरा, इकॉलॉजिकल सोसायटी आणि विवांत अनटेम्ड फौंडेशन या सहयोगी संस्थांच्या सहकार्याने आयोजित पहिल्या सागर महोत्सवात भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. त्यातून विद्यार्थी, किनारपट्टी भागातील रहिवासी आणि रत्नागिरीकरांमध्ये सागर संरक्षणाबाबत जागृती व्हावी, अशी अपेक्षा आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन १३ जानेवारीला सकाळी ९ वाजता राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सिंग यांच्या हस्ते गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात होईल. त्यानंतर ९.३० वाजता सह्याद्री निसर्गमित्रचे भाऊ काटदरे यांचे कासवांचे संवर्धन या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता खारफुटी संवर्धनाबाबत लक्ष्मीकांत देशपांडे यांचे व्याख्यान होणार आहे.

सकाळी ११.३० ते १.३० या वेळेत समुद्र व पर्यावरण संवर्धनाविषयक माहितीपट, लघुपट प्रदर्शित केले जाणार आहेत. दुपारी २.३० ते ४ या वेळेत या क्षेत्रातील पुरस्कार विजेत्या माहितीपटांचे सादरीकरण होणार आहे. सायंकाळी ४ वाजता खडकाळ समुद्रकिनाऱ्यावरील जैवविविधता या विषयावर डॉ. अमृता भावे व्याख्यान देणार आहेत.

शनिवारी, १४ जानेवारीला सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत माहितीपट दाखवण्यात येतील. दुपारी १२.३० ला शाश्वत मासेमारी या विषयावर डॉ. केतन चौधरी यांचे व्याख्यान होईल. दुपारी २.३० वाजता मानवजातीच्या भविष्यासाठी महासागर या विषयावर डॉ. समीर डामरे, दुपारी ३.३० वाजता स्थानिक पक्षी या विषयावर प्रसाद गोखले व विराज आठल्ये यांचे व्याख्यान होईल. सायंकाळी ४ वाजता प्रश्नमंजूषा स्पर्धा होईल.

जानेवारीच्या उत्तरार्धात २१ आणि २२ तारखेला सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत भाट्ये समुद्रकिनाऱ्याची पायी सैर घडवण्यात येणार आहे. यावेळी प्रदीप पाताडे, अमृता भावे मार्गदर्शन करतील. सकाळी ७ ते ९.३० या वेळेत कर्ला येथील खारफुटी जंगलाची सफर संजीव लिमये आणि संतोष तोसकर घडवतील. दुपारी ३ ते सायंकळी ६ या वेळेत मांडवी येथील खडकाळ समुद्रकिनाऱ्याची सफर प्रदीप पाताडे आणि अमृता भावे घडवतील. प्रत्येकाच्या आवडीनुसार समुद्रकिनारा, खारफुटी या भागात विद्यार्थी, रत्नागिरीकरांना सैर करता येणार आहे. याच कालावधीत देखणी वाळूशिल्पे भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर पाहण्याची संधी पर्यटक आणि रत्नागिरीकरांना मिळणार आहे.

महोत्सवासंबंधी अधिक माहितीसाठी आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशनचे प्रमुख नंदकुमार पटवर्धन (9970056523) यांच्याशई संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply