कोकणात नारळाच्या पिकाकडे दुर्लक्ष – डॉ. श्रीरंग कद्रेकर

रत्नागिरी : कोकणात चांगले उत्पन्न देणाऱ्या नारळाच्या लागवडीकडे दुर्लक्ष केले जाते, अशी खंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी व्यक्त केली.

येथील स्वराज्य अॅग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस या नारळविषयक संस्थेच्या आठव्या वर्धापनदिन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. येथील विवा एक्झिक्युटिव्हमध्ये हा कार्यक्रम झाला. स्वराज्य अॅग्रोचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक तुषार आग्रे यांनी डॉ. कद्रेकर यांचे स्वागत केले.

डॉ. कद्रेकर म्हणाले, कोकणातील लोक नारळाच्या झाडांवर प्रेम करतात. पण केवळ प्रेम करून चालणार नाही. प्रत्येक घरात माडाचे एक झाड असतेच. पूर्वी नारळाच्या झाडाखाली अंघोळ करायची पद्धत होती. घरातील एकेकाला एकेक झाड त्यासठी वाटून दिलेले असायचे. तेथे जाऊन प्रत्येक जण अंघोळ करत असे. नारळाला नियमित पाणी मिळावे, हा त्याचा उद्देश होता. राहणीमानातील बदलामुळे आता ती पद्धत बंद पडली आहे. आता नारळाला पाणी दिले जाते. पण तेवढे करून चालत नाही. खत, पाणी वेळच्या वेळी देणे, रोगराईवर उपचार करणे आवश्यक आहे. आंबा, काजूचे उत्पादन हंगामी असते. नारळाचे उत्पादन बारमाही मिळते. प्रत्येक झाडाला दरमहा एक पोय, दरमहा एक झावळ आले पाहिजे. तरच ते झाड योग्य उत्पादन देते. त्यासाठी निगा करावी लागते. ती केली, तर नारळापासून नियमित उत्पन्न मिळते. त्यासाठी तुषार आग्रे करीत असलेले प्रयत्न स्तुत्य आहेत, असेही ते म्हणाले.

रत्नागिरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अॅड. सुजित झिमण म्हणाले की, तुषार आग्रे यांच्या स्वराज्य कंपनीशी बँकेने समझोता करार केला आहे. त्यानुसार जे सामान्य शेतकरी पैसे नाहीत, म्हणून नारळाच्या झाडाची निगा राखू शकत नाहीत, त्यांच्यासाठी बँक कर्ज उपलब्ध करून देणार आहे. केरळमध्ये शेतकरी संघटित आहेत. आपल्याकडे संघटन होत नाही. तसे होणेर काळाची गरज आहे. पण तोपर्यंत बँकेच्या कार्यक्षेत्रात बँक नक्कीच मदत करील. अगदी छोटी जमीन असलेल्या छोट्या शेतकऱ्यांना मदत केली जाईल. त्यामुळे दरडोई उत्पन्न वाढेल. जिल्ह्यातील इतर कोणतीही बँक मदत करायला तयार नव्हती. पण ही आपली जबाबदारी आहे, असे समजून रत्नागिरी अर्बन बँकेने कर्जपुरवठा करायचे ठरविले आहे. नारळाची उत्पादनक्षमता कशी आहे, त्याचा अभ्यास श्री. आग्रे यांनी केला आहे. त्यांच्याकडून नारळाचे शिस्तबद्ध व्यवस्थापन केले जाते. त्याचा फायदा करून घ्यावा. अर्थपुरवठ्याची अडचण येणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी आणि आणखी दोघा शेतकऱ्यांनी स्वराज्य कंपनीच्या उत्तम व्यवस्थापनाविषयी गौरवोद्गार काढले. मुचकुंदी माचाळ पर्यटन संस्थेचे अध्यक्ष विवेक सावंत यावेळी उपस्थित होते.

स्वराज्य कंपनीतर्फे यावेळी ग्राहकांसाठी कोकोनट कमांडो आणि अन्य माध्यमातून विविध योजना जाहीर करण्यात आल्या. नारळाच्या झाडाचे अर्थकारण, मशागत, उत्पन्न, नियोजित कारखान्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी, तीन लाख रोजगारक्षमता असलेला नारळाचा उद्योग याविषयी श्री. आग्रे आणि त्यांचे सहकारी चंद्रकांत राऊत यांनी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृक्षवल्ली नर्सरीचे प्रतीक कळंबटे यांनी केले.

वर्धापन दिन कार्यक्रमाचा व्हिडीओ

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply