देणगी प्रवेशिकांबरोबरच देणगी थेट बँकेत जमा करण्याची सोय
रत्नागिरी : येत्या ३ ते ७ जानेवारी या कालावधीत रत्नागिरीत कीर्तनसंध्या रंगणार असून महोत्सवाची जय्यत तयारी आहे. महोत्सवासाठी सर्वांना प्रवेश खुला आहे. मात्र देणगी सन्मानिकांद्वारे उपक्रमाला मदत करता येऊ शकेल. शिवाय देणगी बँकेत थेट जमा करण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यावर्षी कीर्तनसंध्या महोत्सवात राजपुतांचा इतिहास उलगडणार आहेत.
रत्नागिरीत २०१२ पासून कीर्तनसंध्या महोत्सव सुरू आहे. करोनाच्या कालखंडातही या महोत्सवात खंड पडला नाही. मात्र दोन वर्षे प्रत्यक्ष महोत्सव घेणे शक्य नसल्याने यूट्यूबच्या माध्यमातून महोत्सव ऑनलाइन पार पडला. दोन वर्षांच्या खंडानंतर यावर्षी ३ ते ७ जानेवारी या कालावधीत प्रत्यक्ष महोत्सव पार पडणार आहे. रत्नागिरीत आठवडा बाजार येथील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत कीर्तने होतील.
कीर्तनसंध्येला सर्वांना मोफत प्रवेश दिला जाईल. मात्र या उपक्रमासाठी निधीची आवश्यकता असून देणगी सन्मानिकेद्वारे इच्छुकांना मदत करता येऊ शकेल. देणगी सन्मानिका मानस जनरल स्टोअर्स (माळनाका – ९०११६६२२२०), श्री धन्वंतरी आयुर्वेद (मारुती मंदिर – ९४२३२९२४३७), नितीन नाफड (माळनाका- ८३०८८१३१५८), गुरुकृपा रेडिओ हाऊस (टिळक आळी – ९८९०८२७००६), गौरांग आगाशे (साळवी स्टॉप – ९७३०३१०७९९), श्रीकांत सरदेसाई (९४२११४२४९८), श्रीराम गोडबोले (पावस – ९४२१२३८८२४), मकरंद करंदीकर (९२८४७६७३७६) किंवा महेंद्र दांडेकर (७४१०१०४४३३) यांच्याकडे उपलब्ध आहेत.

याशिवाय बाहेरगावी असलेल्या आणि महोत्सवाला आर्थिक हातभार लावू इच्छिणाऱ्यांना आपली मदत क्यूआर कोडच्या मदतीने कीर्तनसंध्या परिवाराच्या थेट बँक खात्यातही जमा करता येऊ शकेल. त्यासाठी सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.
आजवर कीर्तनसंध्येच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांपासून सर्जिकल स्ट्राइकपर्यंतचा भारतीय इतिहास कीर्तनातून लोकांसमोर मांडण्यात आला आहे. यावर्षी आफळे बुवा आपल्या अमोघ वाणीतून राजपुतांचा इतिहास कीर्तनातून मांडणार आहेत. त्यामध्ये पृथ्वीराज चौहान, जयचंद गढवाल, राणा कुंभ, राणा संग, राणा प्रताप, संत मीराबाई यांच्याविषयी बुवा निरूपण करणार आहेत. हेरंब जोगळेकर (तबला), वरद सोहोनी (ऑर्गन), प्रथमेश तारळकर (पखवाज), उदय गोखले (व्हायोलीन) हे साथीदार बुवांना संगीतसाथ करणार असून ध्वनिव्यवस्था उदयराज सावंत, तर मंडप व्यवस्था ओम साई मंडप डेकोरेटर्स सांभाळतील.
सध्या चालू असलेल्या कोविड निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून या कार्यक्रमाला येताना सर्वांनी मास्क लावून यावे, असे आवाहन कीर्तनसंध्या परिवाराने केले आहे.
Follow Kokan Media on Social Media

